आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amita Darekar Article About Misunderstanding And Breach Of Trust Because Of Social Networks

मोबाइल वादळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक ही जोडप्यांमधली भांडणाची नवी कारणं आहेत.
संवादासाठी नावाजल्या गेलेल्या या माध्यमांमुळे वैवाहिक जीवनात विसंवाद निर्माण होऊ लागलेत.
पण, खरंच भांडणाचं कारण ही माध्यमं आहेत की आपल्या नात्यातील उणिवा?
सुरेखा लेफ्ट.
आशा - अगं बाई, काय झालं? ही का गेली?
स्नेहा - व्हॉट हॅपन्ड? इथे काही झालं का? मी नव्हते कालपासून?
ग्रुपमधल्या सगळ्यांना हे प्रश्न पडले होते. दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर इतकी अ‍ॅक्टिव्ह असणारी सुरेखा अचानक ग्रुपमधून बाहेर का पडली? कोणी तरी तिच्या पर्सनल अकाउंटवर जाऊन चौकशी केली. उत्तर आलं, ‘अगं, सहजच. जरा ब्रेक. येईन परत.’
पण, थोड्याच दिवसांत तिने व्हॉट्सअ‍ॅपच बंद केलं.
कारण, नवर्‍याशी तिची बरीच भांडणं झाली यावरून.
हो, व्हॉट्सअ‍ॅपवरून दोघं भांडले.
व्हॉट्सअ‍ॅप हे भांडणांचं कारण असू शकतं? हो. असू शकतं. खरं तर, हल्ली अनेक जोडप्यांमध्ये यावरून भांडणं होताहेत. वर दिलेलं उदाहरण प्रातिनिधिक आहे. कधी नवरा बायकोचे मेसेज वाचतो म्हणून, तर कधी बायको नवर्‍याचे मेसेज वाचते म्हणून दोघांमध्ये वाद होतात. तर, काही वेळेला दोघांपैकी एक जोडीदाराऐवजी व्हॉट्सअ‍ॅपला अधिक महत्त्व देतं म्हणून.
व्हॉट्सअ‍ॅप हे मुळात संवादाचं माध्यम आहे. एकमेकांमधील, दूरवर असलेल्यांमध्ये संवाद वाढावा म्हणून व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. फक्त मैत्रिणींचा/मित्रांचा, सोसायटीतला, शाळेतला, ऑफिसातला, भावंडांचा असे अनेक ग्रुप प्रत्येकाच्या मोबाइलवर गुण्यागोविंदाने नांदत असतात. चावडीवर एकत्र जमून गप्पा मारल्याप्रमाणे अनेकांशी एकाच वेळी इथे गप्पा मारता येतात. त्यात कधी तरी चावट जोक पाठवणं, कॉमेंट करणं हे आलंच.
पण, संवादाचं हे माध्यम काही जोडप्यांमध्ये विसंवादाचं कारण बनतंय. एका मैत्रिणीच्या घरातील हा वाद कळल्यानंतर आश्चर्य वाटलं. जरा खोलात जाऊन, अनेक मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतर लक्षात आलं की, खरंच अनेक घरांमध्ये अधूनमधून का होईना, व्हॉट्सअ‍ॅपमुळे वाद होताहेत.
यासाठी एक प्रश्नावलीच सगळ्या मित्रमंडळींना पाठवली, तीही व्हॉट्सअ‍ॅपवरून. अगदी अपवादानेच काहींची उत्तरं ‘आम्ही एकमेकांचे मोबाइल चेक करत नाही’ या प्रकारची होती. अनेक जण जे एरवी सुशिक्षित, समंजस वगैरे वाटतात अशांनी जरा निराशाच केली. अनेक नवरे रोज रात्री नित्यकर्म असल्याप्रमाणे आपल्या बायकोचा मोबाइल तपासतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व ग्रुपमधील सर्व मेसेज वाचून आपली बायको दिवसभरात नेमकं काय करत होती, हे समजून घेण्याचा प्रयत्न असेल कदाचित त्यांचा. काही बायकासुद्धा हे करतात. अनेकींनी आपण लपूनछपून का होईना, नवर्‍याचा मोबाइल चेक करतो, हे मान्य केलं. या जोडप्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज वाचून वाद, भांडणं होतात. काहींच्या घरात वरचेवर भांडणं होतात. जीमेल, फेसबुक, ट्विटरचे पासवर्ड एकमेकांना ठाऊक असणं, ही काही विशेष बाब नाही. अनेकांना प्रोफेशनल कामांसाठी त्याची मदतही होते. पण, अनेक जोडप्यांमध्ये याचा दुरुपयोगही केला जातो. आपल्या जोडीदाराच्या फेसबुकची फ्रेंडलिस्ट, ट्विटरचे फॉलोअर्स कोण आहेत, ते काय मेसेज पाठवतात, हे त्याच्या परोक्ष तपासणारे महाभागही आहेत. अनेक बायकांचे बँकेचे अकाउंटही त्यांचे नवरे सांभाळतात. बाहेर जाताना बायकोने/नवर्‍याने काय घालावं, कसं तयार व्हावं हे प्रेमाने सांगणारे आहेत तसेच आपलं मत न ऐकल्यास भांडणारेही आहेत. अनेक मित्रमैत्रिणींनी तर उत्तरांच्या माध्यमातून जोडीदार कसा सतत आपल्याला दबावाखाली ठेवू पाहतो, हेच सांगण्याचा प्रयत्न केला.
का आपण करतो असं? नवरा-बायकोच्या नात्यात पारदर्शीपणा असायला हवा. पण, या सवयीला पारदर्शीपणा म्हणायचा की एकमेकांच्या ‘स्पेस’वर केलेली कुरघोडी? की अविश्वास?
आपली बायको किंवा आपला नवरा कुणाशी, काय बोलतो, हे सतत आपल्याला कळायला हवंच का? नाही कळलं तर तो/ती आपल्याशी प्रतारणा करताहेत, फसवताहेत, असं का समजावं ?
या मुद्द्यांवरून वाद होत असतील तर आपल्या नात्याकडे एकदा तटस्थपणे पाहण्याची वेळ आली आहे. नात्यातल्या आपल्या अधिकाराला जरा बाजूला ठेवून नात्यातलं प्रेम, जोडीदाराचे हक्क आणि त्याची स्पेस याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे.
नवरा-बायकोमध्ये व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवरून वाद होत असतील तर ते व्हॉट्सअ‍ॅप बंद करून सुटणार नाहीत. फेसबुकचं अकाउंट डिलीट केल्याने वाद डिलीट होणार नाहीत. कारण, या वादांचं मूळ कारण शाबूत राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप वगैरे फक्त प्रासंगिक निमित्त आहेत. तुमच्यातील संशयाला या निमित्ताने पुन्हा एकदा खतपाणी मिळालं इतकंच. जरा आठवून पाहा, या आधीही असे अनेक वाद झाले असतील. तेव्हाची कारणं निराळी असतील. यापुढेही असे वाद होतीलच, नव्या कारणांसह.
हे वाद होतात एकमेकांवरील संशयामुळे, अविश्वासामुळे. आपली बायको, आपला नवरा इतर कोणाशी तरी बोलताना, मैत्री करताना आपल्याशी प्रतारणा करतोय, ही भावना मनात असेल तर कोणतंही अकाउंट बंद करून काहीच फरक पडणार नाही. हे अकाउंट बंद केलंत तरी पुढे तुमच्या संशयाला खतपाणी घालणारं नवं कारण सापडेलच.
हल्ली हॉटेलात गेल्यावर समोर आलेल्या खाद्यपदार्थाचा आधी फोटो काढून तो अपलोड केला जातो, गाण्याच्या मैफलीत बसून ‘मी गाण्याचा आस्वाद घेत आहे’ असं सगळ्यांना कळवलं जातं. इतकं आहारी गेल्यामुळे जोडीदाराला तुमच्या आयुष्याच्या चित्रातून ‘इरेज’ झाल्याची भावना येऊ शकते. याचा शेवटही भांडणात होणार, हे नक्की.
मोबाइल, इंटरनेट वापराचे काही अलिखित नियम, संस्कार आहेत. तसेच, ते दुसर्‍याच्या, अगदी जोडीदाराच्या आयुष्यात डोकावण्यासाठीही असावेत. एकमेकांना स्पेस देत, एकमेकांची स्पेस जपत, तरीही एकत्र राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
तसं केलं तर ही सगळी सोशल कम्युनिकेशनची साधनं आपल्या दोघांमधलं कम्युनिकेशन बिघडवणार नाहीत.
darekar.amita@gmail.com