आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amol Aannadate About Doctor Service, Rasik News In Marathi

अपमानास्पद झाडाझडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अडीअडचणी समजून घेणे, विद्यार्थी-शिक्षकांचे मनोबल उंचावणे, या हेतूने ‘कॉफी वुईथ मिनिस्टर’ हा उपक्रम राबवला गेला. पण प्रत्यक्षात शिक्षकांचे, महाविद्यालयीन व्यवस्थेचे मनोबल खालावणारा नकारात्मक परिणाम संबंधितांनी अनुभवला...
कही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे नवनियुक्त वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण सुधारावे, या हेतूने ‘कॉफी विथ मिनिस्टर’ असा एक उपक्रम सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आखला. या उपक्रमांतर्गत मंत्रमिहोदयांचा फोटो छापलेल्या कपमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना कॉफी द्यायची व त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, असे याचे स्वरूप होते. नंतर या उपक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होत.
हेतू नक्कीच चांगला होता. मंत्रमिहोदयांना त्यांचे ‘पोलिटिकल मार्केटिंग’ करण्याचाही हक्क आहे, हेही महाविद्यालयांना मान्य होते; पण या उपक्रमादरम्यान घडलेल्या काही गोष्टी क्लेशदायक होत्या. विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापक, डीन व ज्येष्ठ शिक्षकांना उभे करून त्यांची झाडाझडती घेतली जात होती. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर मंत्रमिहोदय ज्येष्ठ प्राध्यापकांना झापत व त्यानंतर त्यावर वैद्यकीय विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करत असल्याचेही दृश्य दिसले होते. सरकारी यंत्रणा सोडा, पण आपल्या विद्यार्थ्यांकडूनच असा अपमान झाल्यावर अख्खे आयुष्य अध्यापनात घालवल्यावर डॉक्टर प्राध्यापकांना काय वाटले असेल, हा विषय जरा बाजूला ठेवला तरी एकूणच सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न रुग्णालये हे समाजाच्या सर्वच थरांतून सतत टीकेचे धनी होत असतात. त्यांच्यावर टीकाही व्हायलाच हवी, पण त्यांना सुधारण्यासाठी आपण काय हातभार लावतो, हा विचारही व्हायला हवा. वस्तुत: सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये यांच्यात त्रुटी असतीलही. पण एक गोष्ट मान्य करायला हवी की, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, कॉटेज हॉस्पिटल्स या सर्व मोडकळीला आलेल्या आरोग्य व्यवस्थेत तग धरून असलेली एकमेव व्यवस्था म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न असलेली रुग्णालये. आज खिशात एक पै नसतानाही, एखादा रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात गेला, तर त्याला किमान एम. बी. बी. एस. निवासी डॉक्टर तपासतो. मध्यरात्रीही एम.बी.बी.एस. डॉक्टर उपलब्ध असलेली, ही खासगी-सरकारी मिळून एकमेव आरोग्य व्यवस्था आहे. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतल्या जखमींना सर्व खासगी रुग्णालयांनी नाकारले, तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांना आधार दिला होता. एरवी, नैसर्गिक आपत्तीमध्ये काही मिनिटांमध्ये १५०-२०० डॉक्टर उभे करण्याची क्षमता फक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच आहे.
या व्यवस्थेतील त्रुटी दूर करायच्या असतील तर सर्वप्रथम भरमसाट रुग्ण व त्यांना उपचार देणारे बोटावर मोजण्याइतपत डॉक्टर हे विसंगत चित्र बदलावे लागेल. तसेच आज प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतो आहे. कितीतरी चांगले डॉक्टर शिक्षक त्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाय रोवू लागले, चांगले काम करू लागले, की लगेचच त्यांची बदली केली जाते. अर्थातच, ते नोकरी सोडून देतात. या रुग्णालयातील हृदयशल्य चिकित्सा विभाग बंद पडल्याची टीका आपण सतत ऐकतो. हृदयशल्य चिकित्सकाचा एका महिन्याचा शासकीय नोकरीतील पगार खासगी प्रॅक्टीसमध्ये सर्जनला एका तासात शस्त्रक्रिया करून मिळतो. असे असल्यास तो शासकीय सेवेत कसा टिकेल? वैद्यकीय शिक्षकांचा हा तुटवडा वरवर पाहता साधा वाटत असला तरी भावी डॉक्टर तयार होत असताना, ज्ञानार्जनाचा हा स्रोतच आटला तर भविष्यात आरोग्य व्यवस्था हाताळणारे डॉक्टर कितपत सक्षम असतील, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात एक अभ्यागत समिती असते, या समितीवर रुग्णालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांसह आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते नेमलेले असतात. रुग्णालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हातभार लागणे अभ्यागत समितीकडून अपेक्षित असते. पण या समितीवरील लोकप्रतिनिधी डॉक्टरांवर रुबाब करणे, त्यांना उपचारांसाठी घरी बोलावणे, स्वत:च्या नातेवाइकांना उपचारांमध्ये प्राधान्य देण्यास सांगणे, याच्या पलीकडे अभ्यागत समितीचे सदस्य फारसे काही करत नाहीत.
प्रसारमाध्यमांमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांवर होणारी टीका खासगी डॉक्टरांना हवीच असते. कारण त्यामुळे या रुग्णालयामधून खासगी व्यवस्थेकडे रुग्ण वळतो, पण त्यामुळे आम्ही गोरगरीब रुग्णाचा शासकीय रुग्णालयाचा आधार काढून घेण्याचे काम करतो. खासगी रुग्णालयात पैसे संपल्यावर किंवा तो अतिगंभीर झाल्यावर त्याला ‘डंप’ करण्यासाठी शेवटी आम्ही त्याला याच शासकीय रुग्णालयाची वाट दाखवतो.
या संदर्भात दुसरा एक प्रश्न असा पडतो की, शासकीय महाविद्यालयातल्या या सर्व त्रुटी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही असतातच, पण त्याबद्दल कुठेही ‘ब्र’देखील काढला जात नाही. मंत्रमिहोदय तिथे कोणाचीही झाडाझडती घेऊ शकत नाहीत. कारण, ही महाविद्यालये राजकीय नेत्यांच्या मालकीची असतात. मुळात शासकीय रुग्णालये आपल्याला आपली वाटत नाहीत, म्हणून आपण त्यावर टीका करून मोकळे होतो. प्रत्येक खासगी डॉक्टरने वर्षाचा एक दिवस शासकीय रुग्णालयात सेवा द्यावी, प्रत्येक नागरिकाने वर्षाचा एक दिवस रुग्णांची सेवा करण्यात घालवावा व प्रत्येक लोकप्रतिनिधीने स्वत: व नातेवाईक सोडून एका अनोळखी तडफडणाऱ्या रुग्णासाठी शिफारस करावी, तरच आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयांवर टीकेचा हक्क प्राप्त होईल.
(amolaannadate@yahoo.co.in)