आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमासगिरांच्या मुलांसाठी \'सेवाश्रम\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तमाशा, महाराष्ट्राची लोककला! एकेकाळी मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या या कलेने महाराष्ट्राच्या लोककलेला सातासमुद्रापार ओळख मिळवून दिली. आज या तमाशा कलेवर पडदा पडण्याचीच वेळ आली आहे. त्याला बदलते कालचक्र हे एक कारण ठरले आहे. कालपरत्वे मनोरंजनाची साधनं आणि व्याख्याही बदलली आणि तमाशाच्या दुर्दैवाचा नवा ‘खेळ’ सुरू झाला. यात उघड्यावर आला तो सामान्य तमाशा कलावंत, ज्याची अंगभूत कलाच पोटापाण्याचा आधार होती, ज्या कलेच्या जोरावर तमाशातून तो नावलौकिक मिळवायचा. पण अाज त्याचे हे वैभव लोप पावत चालले अाहे. तमाशाचे फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आणि कलावंतांच्या आयुष्याचाच ‘तमाशा’ सुरू झाला. हाताला काम नाही. कुटुंबासह लेकरांची आबाळ सुरू झाली. आहे त्या तमाशामध्ये अत्यल्प मानधनावर फडमालकांच्या तालावर नाचणे वाट्याला आले. गावोगाव भटकंती करताना पोटच्या गोळ्यांना कुठे सोडायचे, हाही प्रश्नच! त्यांना कुठेतरी सोडून जाताना जिवाची घालमेल व्हायचीच. आपल्या समाजातीलच एक भाग असलेल्या या कलावंतांच्या प्रश्नाकडे ना शासनाचे लक्ष, ना समाजाचे!

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा, वसतिगृहं आहेत. मात्र वर्षातील नऊ महिने भटकंतीचं जिणं जगण्याच्या कळा सोसणाऱ्या तमाशा कलावंतांची ही वेदना जाणली मयूरी व सुरेश राजहंस या दांपत्यानं. त्यांना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाएवढाच तमाशा कलावंतांच्या मुलांचाही प्रश्न महत्त्वाचा वाटला. सामाजिक भान आणि संवेदनशील मन असलेल्या या दोघांनी सारासार विचार करून तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी आयुष्य वेचण्याचे ठाणले. ‘सेवाश्रम’ या छत्राखाली कलावंतांच्या मुलांचा सांभाळ सुरू केला. तोही शासनाच्या कुठल्याही एका मदतीशिवाय. राज्यात अशी तमाशा मुलांसाठी काम करणारी संस्था त्यांच्या माहितीत तरी नाही.

मयूरीताईंनी डोंबारी, घिसाडी, वडारी, पारधी या पालावरच्या मुलांनाही सेवाश्रमाच्या माध्यमातून हक्काचं घर दिलं आहे. अाजघडीला येथे ३० मुलं शिकत आहेत. मुलामुलींची काळजी त्या घेतात तर बाहेरची कामं त्यांचे पती सुरेश करतात. या दाेघांचं लग्न ठरलं तेव्हा पहिल्याच भेटीत सुरेश यांनी ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. तेव्हा प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू होते. ‘लग्नानंतर मीही प्रकल्पाच्या कामात लक्ष घातले. नगर, जामखेड, शेवगाव, पुणे हा परिसर आम्ही पिंजून काढला. १४५ तमाशा कलावंतांच्या कुटुंबीयांना भेटलो, बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर आम्ही त्यांच्या मुलांसाठीच काम करण्याच्या निष्कर्षापर्यंत आलो,’ असं मयूरीताई सांगतात.

शांतिवनाची प्रेरणा
बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आमच्या गावाशेजारच्या आर्वी गावात बाबा आमटे मिशनचे अध्यक्ष दीपक नागरगोजे यांचा शांतिवन प्रकल्प आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ते काम करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सेवाश्रम काम करत आहे. ऊसतोड मजूर सहा महिने स्थलांतरित होतात. मात्र, तमाशा कलावंत नऊ महिने यात्रा, जत्रा, उरुसांची गावे शोधत तेथे तमाशाचे फड रंगवत फिरतात. त्यांनाही मुले आहेत, त्यांचे शिक्षण आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्यासारखाच त्यांच्याही आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये, ही तमासगिरांची तळमळ जाणवली.

कलावंत फड रंगवण्यासाठी जाताना मुलांना नातेवाइकांकडे ठेवतात. ‘अनेकदा त्यांच्या पदरात वेगळेच वाढण पडते - मुलांचे नातेवाइकांकडून शोषण होते, मुलींवर अत्याचार होतात, मुलांना भंगार गोळा करणे, गारेगार विकणे, कचरा वेचणे अशी कामेही नातेवाइकांच्या घरी राहून करावी लागल्याचे अनेक कलावंतांनी आम्हाला सांगितले. आमच्या सर्वेक्षणातही शिक्षणाचा अभाव व वाईट संगतीमुळे तमासगिरांची मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले. एकूण काय तर तमाशा कलावंतांच्या आयुष्याची एक वेगळीच चित्तरकथा समोर आली. एका आयुष्याची फरफट होतेय; पण त्यांच्या मुलांचं भविष्य तरी उज्ज्वल व्हावं, यासाठीच काम करण्याचा निर्णय आज तरी आम्हाला योग्य वाटतो आहे. आमचा सेवाश्रम अाता तीन वर्षांचा झाला अाहे. शासनाच्या अनुदानाशिवाय अाणि केवळ समाजाने दिलेल्या मदतीच्या हातावर प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे. अगदी रोज नव्या समस्यांसह! त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते ती सेवाश्रमातील निरागस चेहऱ्यांवरच्या आनंदातून,’ असं त्या सांगतात.


संपर्क : निर्मिती प्रतिष्ठान संचालित सेवाश्रम सामाजिक प्रकल्प, ब्रह्मनाथ येळंब, ता. शिरूर कासार, जि. बीड

(amol.mule@dbcorp.in)