आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतरंगी नमुना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नो करीत बॉस त्रास देतोय? बायको किंवा गर्लफ्रेंडशी (किंवा एकाच वेळेस दोघींशी) भांडण झालंय? वाढत्या महागाईने त्रस्त आहात? फेसबुकवर फारसे ‘लाइक’ मिळत नाहीयेत? या सगळ्या तणावांपासून मुक्ती हवी असेल तर मी एक अक्सीर इलाज सांगतो. युट्यूबवर जा आणि जोगिंदर आणि ‘लोटा डान्स’ असा सर्च द्या. मग तुम्हाला जे स्क्रीनवर दिसेल ते पाहून तुमचं टेन्शन दूर होईल, ही माझी हमी. पण जोगिंदरने लोकांचं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तब्बल चार दशकं जोगिंदर शेली या नट, दिग्दर्शक, निर्मात्याने भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. माध्यमं जरी त्याला ‘निझाम ऑफ बी ग्रेड’ या संबोधनाने हिणवत असली तरी एकेकाळी ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनतेने त्याला डोक्यावर उचलून घेतले होते, हे सत्य नाकारता येत नाही.

प्रत्येक क्षेत्रात काही अतरंगी व्यक्तिमत्त्वे असतात. ती व्यक्तिमत्त्वे ज्या क्षेत्रात काम करत असतात त्या क्षेत्रात भलेही काही दर्जात्मक भर टाकत नसतील, पण सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या अतरंगीपणामुळे आणि काहीशा विक्षिप्तपणामुळे लोकप्रिय होत जातात. अभिजन वर्ग त्यांच्याकडे नाकं मुरडून बघत असला, तरी बहुजन वर्ग त्यांच्यावर बेहद्द खुश असतो.

राजकारणात राजनारायण किंवा लालू यादव, क्रिकेटमध्ये श्रीसंत अशी काही उदाहरणं डोळ्यासमोर आणली तर मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला चटकन कळेल. जोगिंदरने नट, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ढिगाने चित्रपट केले. पण त्याचे खऱ्या अर्थाने गाजलेले चित्रपट तसे दोनच. ‘रंगा खुश’ आणि ‘बिंदिया और बंदुक’. या ‘बी’ आणि ‘सी’ ग्रेड सेंटरवर धो धो चाललेल्या चित्रपटांनी जोगिंदरला नाव आणि पैसा मिळवून दिला. खरं सांगायचं तर हे चित्रपट फार कलात्मक, उच्च दर्जाचे नाहीत. बटबटीत संवाद, अति मेलोड्रामा, भरपूर अंगप्रदर्शन घडवणारे बलात्काराचे प्रसंग असा नित्याचाच मसाला या चित्रपटांत ठासून भरलेला होता. पण जोगिंदर गाजला त्याच्या पडद्याबाहेरच्या विक्षिप्त कृत्यांमुळे. आपल्या ‘बिंदिया और बंदूक’ चित्रपटावरून ‘शोले’ सीन-टु-सीन चोरला आहे, असा त्याचा पक्का दावा होता. दावा सिद्ध करण्यासाठी त्याने निर्माता-दिग्दर्शक रमेश सिप्पीविरुद्ध कोर्टात धाव घेतली. ‘शोले’चे लेखक सलीम-जावेद या जोडगोळीने आपली कथा तंतोतंत चोरली, असा दावा तिथे त्याने केला. त्यात काही तथ्य नव्हतंच असं नाही. एका गावचा सरपंच जेलमधून सुटून आलेल्या दोन कैद्यांच्या मदतीने गावाचा कर्दनकाळ असणाऱ्या खुंखार डाकूचा (या भूमिकेत दस्तुरखुद्द जोगिंदर शेली) कसा नायनाट करतात, असं कथाबीज ‘बिंदिया और बंदूक’चं होतं. जोगिंदरने कथाचोरीची केस कोर्टात दाखल केल्यावर रमेश सिप्पी मनातल्या मनात हसले असणार. चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक ना! त्यांची ‘शोले’ची कथा ‘मॅग्निफिसंट सेवन’वर आधारित होती, हे गुपित त्यांनाच माहीत होत ना. जागतिक सिनेमाच्या प्रसाराचा अभाव आणि आजच्यासारख्या जागरूक माध्यमांची अनुपस्थिती यामुळे हे ‘चौर्यकर्म’ एका ठरावीक वर्तुळाच्या पलीकडे कुणाला माहीत असण्याची शक्यता नव्हतीच. पण वस्तुस्थिती ही होती की, जोगिंदर आणि सिप्पी यांच्या प्रेरणेचा ‘स्रोत’ एकच होता. पण, जोगिंदरच्या दुर्दैवाने तो ही केस हरला.

पडद्यावर अजागळ पात्र साकारणारा जोगिंदर हा इसम एकेकाळी चक्क पायलट होता. अशाही काही वदंता आहेत की, इंदिरा गांधी यांच्या विमानाचं सारथ्य तो करायचा. महारद्दड सिनेमे बनवणाऱ्या जोगिंदरला आपला प्रेक्षक कोण आहे, याची मात्र पुरेपूर जाणीव होती. आपल्या चित्रपटांच्या प्रेक्षकांचा उल्लेख तो ‘झुग्गी झोपडी’ असा अभिमानाने करत असे.

जोगिंदरची गाजलेली अजून एक कोर्ट केस आहे. चक्क कमल हासनच्या विरोधात लढलेली. ऐंशीच्या दशकात जोगिंदरने कमल हासनच्या एका गाजलेल्या तामीळ भयपटाचे हक्क विकत घेतले. कमल हासन हा कितीही महान नट असला तरी तो पडद्यावर स्वतःच्या प्रेमात पडलेला असतो, हे एक उघड गुपित आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये आपण दिसावं, यासाठी त्याचा अट्टाहास असतो. असेल कमल हासन मोठा नट; तो पण जोगिंदर होता. त्याने तामीळ चित्रपटाच्या फुटेजमध्ये स्वतःचे मोठमोठे सीन्स ‘इन्सर्ट’ केले. कमल हासनचे मूळ चित्रपटामधले काही सीन जसेच्या तसे ठेवले. हे त्याने अशा कौशल्याने केले की, चित्रपट जेव्हा पडद्यावर आला तेव्हा प्रेक्षकांना वाटलं की, अरे या चित्रपटात जोगिंदर मुख्य भूमिकेत आहे आणि कमल हासन हा चक्क दुय्यम भूमिकेत. जोगिंदरने ही चित्रपटाची ‘तोडमरोड’ संकलनाच्या टेबलवर केली. जेव्हा कमल हासनला हे कळलं तेव्हा भूमी दुभंगून आपण आत का गेलो नाही, असं त्याला वाटलं असेल. एक तर चित्रपट तद्दन ‘बी’ ग्रेड होता. वर कमल हासनला यात निव्वळ दुय्यम अभिनेता बनवून टाकलं होतं. खवळलेला कमल हासन कोर्टात गेला. बरंच आकांडतांडव केलं. पण या वेळेस भाग्यदेवता जोगिंदरवर प्रसन्न होती. कोर्टाने जोगिंदरच्या बाजूने निकाल दिला. जोगिंदरवर ‘शोले’च्या वेळेस झालेल्या ‘अन्यायाचं’ थोडं परिमार्जन झालं. कमल हासन हात चोळत बसला. या चित्रपटाचं नाव ‘प्यासा शैतान’. हा १९८४मध्ये प्रदर्शित झालेला होता.

एड्वर्ड डेविस उर्फ ‘एड’ वुड ज्युनियर हा हॉलीवूडमधला निर्माता आणि दिग्दर्शक. साठ आणि सत्तरच्या दशकात याने परग्रहवासीयांची आक्रमणे, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयांवर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. हॉलीवूडमध्ये गोल्डन टर्की अवॉर्ड‌्स नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड‌्स सर्वात वाईट चित्रपटांना पुरस्कार देतात. त्यांच्या मते, वाईट चित्रपट बनवणे हीसुद्धा एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्डने एड वुडला ‘सर्वकालीन वाईट दिग्दर्शक’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार घ्यायला एड वुड मात्र हजर राहू नाही शकला, कारण काही वर्षांपूर्वीच अति मद्यपानाने तो मरण पावला होता.
काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो, की एड वुडचा कोणी भारतीय वारसदार असेलच की, ज्याने सतत वर्षानुवर्षं वाईट चित्रपट काढले असतील. तर या प्रश्नाचं एक निर्विवाद उत्तर आहे, जोगिंदर शेली! या १५ जूनला जोगिंदर शेलीला पृथ्वीतलावरून गमन करून सात वर्षं पूर्ण होतील. जोगिंदर शरीररूपाने जरी अस्तित्वात नसला तरी त्याची लेगसी मात्र कायम राहणार आहे. ‘रंगा खुश’मधून, ‘प्यासा शैतान’मधून आणि हो, त्याच्या त्या अजरामर ‘लोटा डान्स’मधूनही...
(amoludgirkar@gmail.com)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)