आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amol Udgirkar Article About Bollywood And Real History

इतिहासाची वाट लावली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा बॉलीवूड चित्रपट स्वतःचा ‘नवा’ इतिहास घडवतात. ते कसे, हे काही उदाहरणं देऊन स्पष्ट करतो.
‘टॅगो चार्ली’ नामक एका बॉबी देओल अभिनित चित्रपटात इतिहासाच्या घटनांची पुनर्मांडणी दिग्दर्शक मणी शंकर याने केली आहे. या चित्रपटात गुजरात दंगल ही कारगिलच्या लढाईच्या अगोदर घडलेली दाखवली आहे. दिग्दर्शक नवीन इतिहास घडवू शकतात, हेच मणी शंकर याने पुन्हा सिद्ध केले नाही काय? मणी शंकर नावाच्या लोकांना डोकं नसतं, असा नियम आहे का? सध्या ‘कल्ट’चं स्थान मिळालेल्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटात माहितीपट तयार करणारी ब्रिटिश पोरगी बिनधास्त जनरल डायरची हत्या मदनलाल धिंग्राने केली, असं ठोकून देते. लोक पण टाळ्या पिटतात. वास्तविक उधम सिंगने जनरल डायरची हत्या केली होती, जो जालियानवाला हत्याकांडाच्या वेळेस पंजाबचा गव्हर्नर होता.

सध्या ‘एअरलिफ्ट’ या तिकीटखिडकीवर तुफान चालत असलेल्या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटात बेधडकपणे चुकीचा इतिहास दाखवण्याच्या वृत्तीवर पुन्हा चर्चा झडू लागल्या आहेत. टीकाकारांच्या मते, चित्रपटात केंद्रस्थानी असलेली रणजीत कत्याल नावाची व्यक्तिरेखा खऱ्या जगात अस्तित्वातच नाही. आणि अजून एक गंभीर आक्षेप म्हणजे, चित्रपटात भारतीय परराष्ट्रीय खात्याचे जे चित्रण केले आहे, ते अतिशय चुकीचे आहे. आखाती युद्धाच्या वेळेस तिथे अडकलेल्या भारतीय लोकांची तिथून सुटका करण्यात भारत सरकारने राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते, पण चित्रपटात ते दिसत नाही. विकास स्वरूप आणि निरुपमा राव यांच्यासारख्या परराष्ट्रखात्यामधल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी या चित्रपटाविरुद्ध जाहीर नापसंती व्यक्त केली. पण चित्रपटामधील चुकीच्या इतिहास चित्रीकरीकरणाचा हा पहिला प्रसंग नाही आणि शेवटचा तर नक्कीच नाही.
असा चुकीचा इतिहास दाखवण्यामागे दिग्दर्शक-लेखक यांची काय मजबुरी असेल? रिसर्च करण्याचा आळस, हे एक नक्कीच कारण असू शकतं. त्याची काही उदाहरणे लेखाच्या सुरुवातीला आली आहेत. पण अनेकदा ही चूक चित्रपटाला ‘व्यावसायिक’ चित्रपटाच्या साच्यात बसवण्याच्या अट्टाहासामधून होते. काही दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या संजय लीला भन्सालीच्या चित्रपटात काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र ‘पिंगा’ घालायला लावला गेला, तो याच अट्टाहासामधून. याचं अजून एक ज्वलंत उदाहरण म्हणजे, जे. पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा सिनेमा. हे उदाहरण अनेक ‘राष्ट्रप्रेमी’ लोकांना कदाचित आवडणार नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, या सिनेमात अनेक अक्षम्य चुका आहेत. आणि चित्रपटात दाखवलं गेलं ते युद्ध प्रत्यक्षात घडलेल्या युद्धापेक्षा खूप वेगळं होतं. भारतीय सैन्यामधल्या अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी या चित्रपटावर जोरदार आक्षेप घेतला आहे. पण शेवटी प्रेक्षकांना बॉर्डर आवडला, हे महत्त्वाचं. अतिरंजित इतिहास दाखवून का होईना; पण प्रेक्षक छाती फुगवून बाहेर येतो, हे महत्त्वाचं. खोट्या इतिहासाच्या वेष्टनात गुंडाळून कडव्या राष्ट्रवादाचं ‘चॉकलेट’ दिलं की, आपलं पब्लिक खूश.
यावर अर्थातच निर्माता आणि दिग्दर्शक यांची एक बाजू आहे. त्यांच्या मते, ते डॉक्युमेन्ट्री बनवत नाहीयेत किंवा इतिहासाचे धडे देत नाहीयेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता इतिहासातले एक अपरिचित पान उलगडून दाखवणं हे आमचं काम, असा त्यांचा दावा आहे. उदाहरणार्थ, तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंदरकुमार गुजराल व्यक्तिशः स्वतः सद्दाम हुसेनला जाऊन भेटले आणि त्यामुळे लाखो भारतीय युद्ध क्षेत्रातून बाहेर पडले, असं दिग्दर्शकानं दाखवलं असतं तर किती प्रेक्षकांनी ‘एअरलिफ्ट’ बघितला असता? यात दिग्दर्शकांचं ‘इंटरप्रिटेशन’ असा एक हळवा मुद्दा येतो. म्हणजे दिग्दर्शक हा ‘कॅप्टन ऑफ द शिप’ आहे, हे मान्य केलं की त्याने चित्रपट चांगला होण्यासाठी स्वतःच्या अखत्यारीत काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला असावं. पण हे नाणं मुळातच बद्दू आहे. कारण या बेजबाबदार चित्रीकरणामुळे पडद्यावर दाखवलेला इतिहास हाच खरा इतिहास, अशी प्रेक्षकांची धारणा होण्याची शक्यता असते. आजही अनारकली आणि जोधाबाई या प्रत्यक्ष आयुष्यात होऊन गेलेल्या आहेत, असा लाखो भारतीयांचा समज आहे. ‘बॉर्डर’मध्ये दाखवलेलं युद्ध हे खरं आहे, अशीही अनेक भारतीयांची ‘श्रद्धा’ आहे. उद्या भारतीय परराष्ट्रखात्याच्या नाकर्तेपणामुळे एकट्या रणजीत कत्याल नामक इसमाने भारतीयांना युद्धग्रस्त क्षेत्रामधून बाहेर काढलं, असं अनेक भारतीयांना वाटू लागलं तर काय करायचं? इतिहास आणि फिक्शन यांची योग्य सांगड घालून चांगला चित्रपट तयार करता येतो, याची अनेक उदाहरणं आहेत. स्टीवन स्पीलबर्गचा ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ किंवा अनुराग कश्यपचा ‘ब्लॅक फ्रायडे’ ही याची काही उदाहरणं. शुजित सरकारच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटात पण हे प्रमाण छान जमून आलं होतं.
या सगळ्या वादाला अजून एक रोचक बाजू आहे, ती म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादाची. कारण या सगळ्याला मिळणारा प्रेक्षक प्रतिसाद हा बराच अनियमितता दाखवतो. म्हणजे चित्रपटाचा वषिय देशप्रेमाचा असेल आणि त्यात इतिहासाचा खून जरी पाडला असेल तरी प्रेक्षक त्याला विरोध करताना दिसत नाहीत. पण जिथे जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता दुखावल्या जातात, तिथे चित्रपटाला विरोध सुरू होतो. पण हा विरोध ‘सिलेक्टिव’ असतो. म्हणजे ‘पिंगा’ किंवा ‘दुश्मनची वाट लावली’ या गाण्यांमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्यांच्या भावना शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला तर दुखावतीलच, याची खात्री नाही. नथुरामवरच्या नाटकाला विरोध करणारे उद्या याकुब मेननवर चित्रपट बनला तर त्याला विरोध करतीलच, असं नाही. थोडक्यात, अभिव्यक्तीच्या व्याख्या आणि दिग्दर्शकाचं ‘इंटरप्रिटेशन’ कितपत असावे, याचे आपले निकष हे आपण आपल्या जातीय, धार्मिक आणि राजकीय अस्मितांवरून ठरवतो. आपल्याला हवं असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दुसऱ्याला नाही, अशी आपली ठाम समजूत आहे. स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षं झाल्यानंतर पण आपण एक देश म्हणून आपला सर्वमान्य ‘कॉमन मिनिमम इतिहास’ लिहू शकलो नाही, हे शोचनीय आहे. देशात असलेल्या प्रचंड विविधतेची ही बहुधा किंमत असावी.
amoludgirkar@gmail.com