आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोन आणि मल्लिका शेरावत यांचे भाऊ (रसिक)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे भावा-बहिणीचं नातं हे खूपदा ‘घराने की इज्जत’ वगैरे शब्दांखाली विनाकारण दबून गेल्याचं दिसतं. खरं तर अनेकदा हे नातं निखळ मैत्रीचं असतं. एकमेकांशी रिमोट कंट्रोलसारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडता भांडता आयुष्यातल्या मोठ्या संघर्षात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणारं हे नातं आहे. आपल्याकडच्या सिनेमात हे नातं कसं उमटलं आहे? खूपदा भाऊ हा बहिणीच्या प्रेमप्रकरणाच्या विरुद्ध उभा राहणारा खलनायक असतो किंवा बहिणीबद्दल अति पझेसिव्ह असणारा असतो. एखादाच ‘जाने तू या जाने ना’सारखा चित्रपट भाऊ-बहिणीचं सुंदर नातं तरलपणे पडद्यावर दाखवतो. आपल्या माध्यमांमधून भावाचं हे विचित्र चित्रीकरण झाल्यामुळे विनाकारण भावांबद्दल काही स्टेरिओटाइप्स तयार झाले आहेत. पण काही भाऊ असे पण असतात की, ते आपल्या बहिणींच्या मागे, त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहतात. स्वतः त्यासाठी भारी किंमत चुकवतात. हा लेख अशाच दोन भावांबद्दल आहे.

किरकोळ शरीरयष्टीचा शांत स्वभावाचा संदीप वोहरा रस्त्यावर फिरताना तुमच्या बाजूने गेला तर तुमचं त्याच्याकडे कदाचित लक्ष पण जाणार नाही. पण एक गोष्ट त्याला गर्दीपासून वेगळं करते. तो करणजीत कौर वोहराचा सख्खा भाऊ आहे. तुम्ही वैतागून विचाराल, आता करणजीत कौर वोहरा कोण? तर करणजीत वोहरा हे मूळ नाव आहे ते गुगल सर्चमध्ये सगळ्यात टॉपवर असणाऱ्या सनी लियोनीचं. सनी लियोनी हे तिचं पडद्यावरचं नाव. भारतीय पॉर्न अॅक्ट्रेसचा भाऊ असणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट. संदीपने हे ओझं आपल्या स्वभावाप्रमाणेच शांतपणे पेललं. आपण पॉर्न अॅक्ट्रेस आहोत, ही गोष्ट सनीने परिवारात सर्वप्रथम आपल्या समजूतदार भावालाच सांगितली. संदीपने तेच केलं, जे तो आयुष्यभर करत आला होता. तो सनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. करणजीत कौर हे नाव सनीच्या ग्लॅमरस इमेजला सूट होत नाही, असं मत त्या क्षेत्रातल्या लोकांचं होत. संदीपला घरचे लोक प्रेमाने सनी म्हणायचे. मग तिने पण स्वतःचं नाव सनी ठेवलं. प्रख्यात इटालियन दिग्दर्शक सार्जिओ लियोनीच्या आडनावातून लियोनीची उसनवारी झाली. अशा प्रकारे सनी लियोनी नावाचा कल्ट तयार झाला. सनीला लहानपणी हार्मोनियम वाजवण्याची खूप आवड होती आणि संदीपला तबला वाजवण्याची. दोघेही बहीण-भाऊ लहानपणी गुरुद्वारामध्ये दर रविवारी कीर्तनाचा कार्यक्रम जोरात करायचे. त्या नात्यात लागलेला सूर पुढे पण कधीच बेसूर झाला नाही. नुकतंच संदीपचं लग्न झालं. कुठल्याही उत्साही बहिणीप्रमाणे सनीने लग्नाचं नियोजन केलं. संगीत कार्यक्रमात झक्कास नाचली. वोहरा परिवार जरी कॅनडात राहात असला तरी त्यांच्या आजूबाजूचं वर्तुळ नातेवाईक आणि कॅनडास्थित भारतीय यांनीच बनलेलं होतं. त्या वर्तुळाने सनीच्या अॅडल्ट चित्रपटात काम करण्यामुळे वोहरा परिवाराचं नाव टाकलं. त्यांच्यावर अघोषित सामाजिक बहिष्कार टाकला. आपल्या बहिणीला पाठिंबा देण्याची शिक्षा म्हणून संदीप वोहरा त्या वेळेस कसल्या कसल्या अग्निदिव्यांमधून गेला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. पण भावाचं कर्तव्य त्यानं पुरेपूर बजावलं.

संदीप वोहराच्या तुलनेत विक्रम लांबा उंचापुरा आणि रुबाबदार. विक्रमची बहीण म्हणजे मल्लिका शेरावत आणि पूर्वाश्रमीची रीमा लांबा. मल्लिका ही स्त्री-भ्रूणहत्येमुळे बदनाम झालेल्या हरियाणातली. हरियाणामध्ये बायकांकडे बघण्याचा अनेक पुरुषांचा दृष्टिकोन हा सरंजामशाही आणि प्रतिगामी आहे. मोठी स्वप्नं बघणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या महत्त्वाकांक्षी मल्लिकाचा जीव हरियाणात रमणं शक्यच नव्हतं. मग सगळं काही सोडून ती मुंबईला आली. अगदी लग्नाचा सारीपाट उधळून. तिच्या परंपराप्रिय परिवाराला हे पचवणं अवघड होतं. त्यांनी तिचं नाव टाकलं. अपवाद फक्त विक्रमचा. आपल्या बंडखोर बहिणीच्या मागे विक्रम खंबीरपणे उभा राहिला. त्याचे परिणाम पण भोगले. तो मल्लिका शेरावतचा भाऊ आहे, हे कळलं की अगदी सोशल मीडियावर पण लोक त्याच्या प्रोफाईलवर गलिच्छ कॉमेंट्स टाकतात. अगदी बहीण-भावाच्या पवित्र नात्यावर पण चिखलफेक करतात. पण सेलिब्रिटी आणि एक विशिष्ट इमेज असणाऱ्या मल्लिकाचा भाऊ असण्याची किंमत विक्रम कायम मोजत आलाय. बहिणीला ‘सरळ’ करायचं सोडून तिला मदत करणारा भाऊ, म्हणून कायम त्यांच्या नातेवाइकांनी त्याच्या मर्दानगीवरच संशय घ्यायला सुरुवात केली. मल्लिकाला एकटीलाच मुंबईत सर्व प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, म्हणून विक्रमपण मुंबईत डेरेदाखल झाला. स्वतःचा व्यवसाय मग त्याने मुंबईतच उभारला. मल्लिका आपल्या भावाला यशाचं श्रेय द्यायला कधीच विसरत नाही. असं एक निरीक्षण आहे की, डान्सबार बंदीला विरोध केला, पॉर्न बंदीला विरोध केला किंवा कुठल्याही प्रकरणात स्त्रीची बाजू घेतली की, ‘तुमच्या घरातल्या मुलींनी असं केलं तर तुम्ही काय केलं असतं?’ असा एक वैयक्तिक पातळीवर उतरून ‘बिलो द बेल्ट’ प्रश्न सुधारणवाद्यांना विचारला जातो. मला वाटतं, संदीप वोहरा आणि विक्रम लांबा ही या प्रश्नांची चालतीबोलती उत्तरं आहेत. मागे सोशल मीडियावर ‘सैराट’मधल्या प्रिन्सदादाची भलामण करणाऱ्या काही पोस्ट वाचनात आल्या होत्या. बहीण ‘भरकटू’ नये म्हणून तिला धाकात ठेवणारा पुरुष म्हणजे भाऊ, अशी प्रतिमा काही लोकांच्या मनात अजूनही आहे. अनेकदा भाऊ असण्याचे हे भंपक निकष अनेक पुरुषांवर इच्छा नसताना पण लादले जातात. बहुतेक भाऊ हे बहिणींच्या मागे समर्थपणे उभे राहतातच. सेलिब्रिटी बहिणींचे भाऊ असले तरी संदीप आणि विक्रमचं भाऊ असणं महत्त्वाचं. त्या अर्थाने ते तुमचे-आमचे प्रतिनिधीच. स्त्रिया घराची चौकट मोडून बाहेर येत असताना आपल्याला अजून संदीप वोहराची आणि विक्रम लांबाची गरज आहे.

(amoludgirkar@gmail.com)
पुढील स्लाईडवर बघा, मलिका शेरावतचा भाऊ....
बातम्या आणखी आहेत...