आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका अन्यायाची तेवीस वर्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडमधील सर्वात पहिली हिट अॅन्ड रन केस कोणती असेल तर ती होती पुरु राजकुमारची...
अर्थात सलमानप्रमाणे त्या वेळीही पुरु राजकुमारचे कोणीही वाकडे करू शकले नाही, कारण तो एक स्टारपुत्र होता. पडद्यावर भलेही पुरुचे नशीब फळफळले नसेल, परंतु रस्त्यावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याच्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडतानाचे त्याचे नशीब भलतेच स्ट्राँग होते.

पुरु जेमतेम रात्रभर पोलिस कोठडीमध्ये होता. नंतर ९५० रुपयाच्या जामिनावर तो बाहेर पडला. दोनच दिवसानंतर तो एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला.
मी एका बड्या प्रोडक्शन हाउसच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो होतो. केबिनमध्ये आमची मीटिंग चालू असतानाच अचानक ज्याच्यासोबत मीटिंग चालू होती, तो काही कामासाठी बाहेर गेला. आता मी केबिनमध्ये एकटाच. तिथे कार्डबोर्डवर एक कसलीशी एक्सेल शीट खोचून ठेवली होती. सहज ती फाईल चाळायला घेतली आणि त्यात जे काही होतं ते वाचून मी नखशिखांत हादरलो. त्यात प्रत्येक स्टारपुत्र आणि स्टारपुत्री यांच्या नावाचे उल्लेख होते. त्यांच्या नावासमोर त्यांचे वय, आवडीनिवडी, त्यांच्या जमेच्या बाजू वगैरे लिहिलेले होते. आणि एका रकान्यात ही मंडळी कुठल्या वर्षी लॉन्च करता येतील, त्या वर्षाचा उल्लेख होता. हजारो स्ट्रगलर्स दररोज या मायानगरीत बॉलीवूडचे दरवाजे ठोठावत आहेत, आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मंडळींसाठी लॉन्चपॅड अगोदरच तयार आहे, त्यांच्यासाठी स्क्रिप्ट्स तयार केली जात आहेत. हे भयावह आहे. आपल्या माथी कोणकोणते नट-नट्या मारल्या जाणार आहेत, याची यादी आणि टाइमटेबल अगोदरच तयार आहे.

ही घटना दोन वर्षांपूर्वीची. मी त्या यादीत वाचलेली काही नावं लॉन्च पण झाली आहेत. त्यामुळे एखादा नवाजुद्दिन, इरफान, शाहरुख किंवा अक्षय याचं इथं असणं आणि टिकून राहणं किती अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे, हे यावरून कळतं. तर आजच्या लेखाचा विषय हा अशाच एका घराणेशाहीमधून आलेल्या नटाबद्दल आहे. तो कधीच त्याच्या पडद्यावरील कामगिरीमुळे गाजला नाही. गाजला तो त्याच्या पडद्याबाहेरच्या ‘कामगिरी’मुळे. त्याचं नाव पुरु राजकुमार. ‘जानी’ राजकुमारचा पुत्र, पुरु राजकुमार.

७ डिसेंबर १९९३. वेळ रात्री साडेतीनची. एक आलिशान इम्पोर्टेड कार वेगाने वांद्र्याच्या रोडवरून सुसाट वेगात निघाली होती. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. गाडी वेडीवाकडी एका फुटपाथवर चढली. तिथे पाच लोक झोपले होते. गाडी त्यांना चिरडून निघून गेली. तिघे जण ठार झाले. दोघे जण गंभीर जखमी. गाडीच्या चाकाखाली अडकलेल्या गंभीर जखमी लोकांना तसंच तडफडत ठेवून चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. ती आलिशान इम्पोर्टेड गाडी पुरुची होती. त्याची ओळख त्या वेळी राजकुमारचा मुलगा आणि पार्ट्यांमध्ये रमणारा श्रीमंत पोरगा, अशी होती. घटना घडली त्या वेळी पुरु दारूच्या अमलाखाली होता, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल किती होतं, हे तपासणारी चाचणी झालीच नाही. त्यामुळे त्या रात्री तो दारू पिऊन होता की नाही, ही बाब शेवटपर्यंत अंधारातच राहिली. पुरु जेमतेम रात्रभर पोलिस कोठडीमध्ये होता. नंतर ९५० रुपयाच्या जामिनावर तो बाहेर पडला. दोनच दिवसानंतर तो एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला.

यापेक्षा भयानक तर पुढे घडले. कोर्टामध्ये खटला उभा राहिला. पुरुचे वकील वीरेन वाशी यांनी असा आक्रमक युक्तिवाद केला की, त्यांचा क्लायंट हा एक उदयोन्मुख अभिनेता असून जर त्याला तुरुंगवास झाला तर त्याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर होईल. कोर्टाने दिलेला निकाल आश्चर्यकारक होता. त्यांनी पुरुच्या गाडीखाली आलेल्या लोकांना पुरुने नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला. किती असेल ही नुकसान भरपाई? मृतांच्या वारसदारांना तब्बल ३०,०००; तर वाचलेल्या एका जखमीला, ज्याचा पाय कापावा लागला, त्याला ५००० रुपये इतकी ‘घसघशीत’ नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने पुरु राजकुमारला दिले. त्या वेळी आजच्यासारखा आक्रमक सोशल मीडिया नव्हता, की चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. काही वर्तमानपत्रांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला; पण फारसा उपयोग झाला नाही. त्या काळात पण बॉलीवूडमधल्या अनेक लोकांनी पुरुची पाठराखण केली. स्वतः राजकुमार यांनी अनेक मुलाखती देऊन पुरुचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (जाणवतंय का, सलमान खान प्रकरणाशी काही साधर्म्य?)

राधा राजाध्यक्ष ही तडफदार महिला पत्रकार हिमतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होती. तिने पोलिस स्टेशन, केसशी संबंधित वकील आणि न्यायमूर्ती, मोटर अॅक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्युनल इथे प्रकरणाचा पाठपुरावा केला. सरकारी यंत्रणांकडून तिला मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड आणि अनुत्साही होता. ज्याचा पाय कापला गेला होता, त्या माणसाला एक दमडीही मिळाली नव्हती. त्याच्यावर कुटुंबाला जगवण्यासाठी अक्षरशः भीक मागण्याची पाळी आली होती. कारण पाय कापला गेल्याने त्याला इतर काम करता येत नव्हते. संवेदनशील पत्रकार असलेल्या राधा राजाध्यक्षने या प्रकरणावर बरेच लिखाण केले. या लेखातले काही संदर्भ तिथूनच आले आहेत. या प्रकरणात अन्याय झाला, हे उघड आहे. पुरुचे वकील म्हणून काम करणाऱ्या वीरेन वाशी यांना पण मनातून हे खात असावं. काही वर्षांनंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पुरु राजकुमार ‘हिट अँड रन’ प्रकरणात ‘न्याय’ झाला नाही, ही खंत बोलून दाखवली.

एवढं सगळं होऊन पुरु राजकुमारला एका मोठ्या बॅनरकडून मोठा ब्रेक मिळाला. करिश्मा कपूरसारख्या त्या वेळच्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत त्याचा पहिला चित्रपट ‘बाल ब्रह्मचारी’ १९९६मध्ये प्रदर्शित झाला. तो आपटला. नट म्हणून तो यथातथाच असल्यामुळे त्याची कारकिर्द फारशी चालली नाही. काही फुटकळ भूमिका करून त्याची कारकिर्द नट म्हणून संपली. शेवटचा तो ‘वीर’ या चित्रपटात २०१०मध्ये दिसला होता. या चित्रपटाचा नायक सलमान खान होता. याला योगायोग म्हणावं का नियतीचा क्रूर न्याय?

भारतीय पुराणामध्ये पुरु राजाचा उल्लेख आहे. मराठी वाचकांना तो माहीत आहे, तो आपले वडील असणाऱ्या ययातीला आपलं तारुण्य देणारा मुलगा म्हणून. या आधुनिक पुरुने मात्र आपल्या बापाला फक्त मनस्ताप दिला. पुरु राजकुमार आणि सलमान खान यांच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात अनेक साम्यस्थळं आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वसामान्य माणसाला घाबरवून टाकणारं साम्य म्हणजे, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता, अगदी ‘व्यवस्थेला’ पण गुंडाळून टाकू शकता, हे समोर येणारं भगभगीत सत्य. सध्या तरी ‘कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा’ असं उद्दाम ट्विट करणाऱ्या अभिजीतसारख्या लोकांचीच ही व्यवस्था बटीक आहे आणि राहीलही.
amoludgirkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...