आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शापित सुपरहिरो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शफीक शेख हे नाव बहुसंख्य वाचकांना अनोळखी वाटेल. पण ‘मालेगाव का सुपरहिरो’चा नायक शफीक शेख म्हटलं की, अनेक लोकांची बत्ती जळेल. तर या शफीक शेखचं आयुष्य अनेक चित्रविचित्र संयोगाने असे भरले आहे की, अनेकांना आपण अगाथा ख्रिस्तीची गूढ कादंबरी वाचत आहोत, असं वाटू शकतं.

काही लोकांचं आयुष्यच अतर्क्य योगायोगांनी भरलेलं असत. नियती नावाच्या जादूगारानेच त्यांचं आयुष्य असं उजळून टाकलेलं असतं की, आपल्यासारख्या साचेबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात झाकून बघितलं तरी नजर चकाचौंध होऊन जावी. मार्क ट्वेनने एके ठिकाणी लिहून ठेवलं होतं, ‘माझा जन्म १८३५ला झाला, ज्या वर्षी हॅलेचा धूमकेतू आकाशात दिसत होता. माझा मृत्यू पण हॅलेचा धूमकेतू आकाशात असताना झाला तर काय बहार येईल.’ मार्क ट्वेन २१ एप्रिल १९१०ला वारला. त्या दिवशी हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जात होता. जया बच्चनने एका मुलाखतीमध्ये एक योगायोगांवर विश्वास बसवणारा किस्सा सांगितला होता. ‘कुली’च्या शूटिंगच्या वेळेस गंभीर जखमी होऊन अमिताभ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. सारा देश अमिताभवरचं हे प्राणघातक संकट जावं, म्हणून प्रार्थना करत होता. त्याच्या बाजूच्या वॉर्डमध्ये अजून एक माणूस गंभीर जखमी होऊन आला होता. त्याच्या आतड्यांना अमिताभप्रमाणेच गंभीर जखम झाली होती. अजून एक योगायोग म्हणजे, त्याची जन्मतारीख पण अमिताभप्रमाणे ११ ऑक्टोबर १९४२च होती. त्याचं बाशिंगबळ कमी पडलं असावं. ज्या दिवशी अमिताभ जिवावरच्या धोक्यातून बाहेर आला, त्याच दिवशी तो अनामिक देवाघरी गेला. नियतीशी जुगार खेळताना तक्रार करायची नसते. शफीक शेखने पण ती कधीच नाही केली.

शफीक शेख हे नाव बहुसंख्य वाचकांना अनोळखी वाटेल. पण ‘मालेगाव का सुपरहिरो’चा नायक शफीक शेख म्हटलं की, अनेक लोकांची बत्ती जळेल. तर या शफीक शेखचं आयुष्य अनेक चित्रविचित्र संयोगाने असे भरले आहे की, अनेकांना आपण अगाथा ख्रिस्तीची गूढ कादंबरी वाचत आहोत, असं वाटू शकतं. पंचविशीतला हा पोरगा मॉलीवूड उर्फ मालेगाव फिल्म इंडस्ट्रीचा अविभाज्य हिस्सा होता. मालेगाव आणि मुंबईमधलं अंतर आहे २५० किलोमीटर. पण मॉलीवूड आणि बॉलीवूडमधलं अंतर (स्केल, बजेट, भव्यता या निकषांवर) पृथ्वी आणि मंगळ यांच्यातल्या अंतराइतकं. पण मॉलीवूड ही गर्दीची नव्हे तर दर्दींची फिल्म इंडस्ट्री आहे. काही पॅशिनेट लोक खिशाला खार लावून प्रेक्षकांसाठी फिल्म बनवत असतात.

शफीक शेख हा बारावी नापास पोरगा. मालेगावमधल्या कुठल्याही पोराप्रमाणे त्याला पण सिनेमाचं वेड होतं. दिग्दर्शक नासीर खानची त्याच्यावर नजर पडली आणि शफीकचं सिनेमात काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. शफीकने मग ‘खानदेश टू गोवा’, ‘मालेगाव की लगान’, ‘खानदेश का डॉक्टर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. पण शफीक जगाला कळला तो ‘मालेगाव का सुपरमॅन’ चित्रपटामुळे. मालेगावमधल्या इतर चित्रपटांना मर्यादित रिलीज मिळत असताना ‘मालेगाव का सुपरमॅन’ला व्यापक प्रदर्शनाची संधी मिळाली. ह्याला कारणीभूत ठरले बोहरा ब्रदर्स आणि प्रेझेंटर म्हणून बोर्डवर आलेला अनुराग कश्यप. पण सुपरमॅन हे पात्र पडद्यावर सर्वशक्तिमान असलं तरी त्या पात्राला एक शाप आहे. सुपरमॅन कर्स. सुपरमॅन हे पात्र छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर उभारण्यासाठी योगदान देणाऱ्या अनेक सर्जनशील लोकांना या सुपरमॅन कर्सचा फटका बसला आहे.

टीव्हीवर सुपरमॅन जिवंत करणाऱ्या जॉर्ज रिव्हजपासून या शापाची सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी डोक्यात गोळी झाडून घेऊन त्याने आत्महत्या केली. ख्रिस्टोफर रीव्ह ज्याने सर्वाधिक वेळा मोठ्या पडद्यावर सुपरमॅनची भूमिका बजावली, तो घोड्यावरून पडण्याचं निमित्त होऊन कंबरेखाली लुळापांगळा झाला. पडद्यावर उड्डाण घेणारा ख्रिस्टोफर रीव्ह नंतर आयुष्यभर व्हीलचेअरवर फिरला आणि एक परावलंबी आयुष्य जगला. मार्लन ब्रँडोने पण एका ‘सुपरहिरो’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण नंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं आली आणि तो मानसिकदृष्ट्या पार उद्ध्वस्त झाला. बालपणीच्या सुपरमॅनची भूमिका बजावणारा ली किंगली हा वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संशयास्पद स्थितीमध्ये मरण पावला. म्हणाल तर ही अंधश्रद्धा आणि म्हणाल तर नियतीचा क्रूर खेळ. ‘मालेगाव का सुपरमॅन’मध्ये सुपरमॅनची भूमिका बजावणारा शफीक पण या सुपरमॅन कर्सला बळी पडला असेल का?

‘मालेगाव का सुपरमॅन’चं शूटिंग संपत आलं असतानाच शफीकला दुर्धर कॅन्सरने गाठले. तंबाखू आणि गुटख्याचा शौकीन असणाऱ्या शफीकला व्यसनाची किंमत चुकवावी लागली. पण त्याच्या कॅन्सर होण्याला पण एका विचित्र योगायोगाची किनार आहे. ‘मालेगाव का सुपरमॅन’चा उद्देश तंबाखूच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती करणे हा होता. चित्रपटामधल्या खलनायकाचं नाव ‘तंबाखू मॅन’ असं होत. शफीकच्या सुपरमॅनने पडद्यावर तंबाखू मॅनला हरवलं. पण प्रत्यक्ष आयुष्यातल्या तंबाखूच्या व्यसनाशी असणाऱ्या लढाईत तो हरला. तंबाखूच्या अतिसेवनामुळे त्याला तोंडाचा कॅन्सर झाला. याच कॅन्सरने अवघ्या पंचविशीतल्या शफीकचा घास घेतला. सुदैवाने शफीकच्या आयुष्यातले सगळेच योगायोग दुर्दैवी नव्हते. या शापित यक्षाला एक उ:शाप मिळाला. शफीकचा कॅन्सर बळावला. शेवटची घटका समीप आली. ‘मालेगाव का सुपरमॅन’ त्याच वेळेस पूर्ण झाला. चित्रपटाचा मोठा प्रीमियर मालेगावलाच झाला. अनुराग कश्यप प्रीमियरसाठी मालेगावला आला. बॉलीवूडची तारकादल मालेगावमध्ये अवतरली. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. शफीक स्ट्रेचरवरच सेंट्रल टॉकीजला आला. नाकात-तोंडात नळ्या असल्याने त्याला बोलता येत नव्हतं. तो सगळ्यांकडे रोखून बघत होता. नजरेनेच काही सांगू इच्छित होता. प्रेक्षकांनी शफीकचं नाव पडद्यावर झळकल्यावर एकच जल्लोश केला.

शफीकने प्रेक्षकांचा छप्परफाड प्रतिसाद डोळे भरून पाहिला. मंगळवारची ती रात्र त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरली. पण नियतीचा खरा ट्विस्ट पुढेच आहे. दुसऱ्याच दिवशी, बुधवारी सकाळी तो अल्लाघरी गेला. आदल्या रात्री मिळालेला अतिआनंद त्याला बहुतेक सहन झाला नसावा. चित्रपटाच्या प्रीमियरसाठी गेलेल्या अनुरागला शफीकच्या अंत्ययात्रेला हजर राहण्याची वेळ आली. अनुरागच्या मनावर आलेला घाव अजून भरलेला नाही. फँटम फिल्म्सच्या ऑफिसमधल्या त्याच्या केबिनमध्ये सुपरमॅनच्या गेटअपमधल्या शफीकचा एक फोटो तिथे लावलेल्या अनेक फोटोंमध्ये वेगळा उठून दिसतो. शेवटचा योगायोग असा की, त्या फोटोखालीच ‘गॉन विथ द विंड’चं एक कोट लावलेलं आहे- ‘Frankly, my dear, I don’t give a damn.’ योगायोग आणि शफीक शेख यांच्यातलं अद्वैत त्याच्या मृत्यूनंतर पण कायम आहे.

अमोल उदगीरकर
amoludgirkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...