आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सिनेमाचं 'दलित' ऑडिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकाराला जात, धर्म आणि देश नसावा आणि त्याचे मूल्यमापन या निकषांच्या पलीकडे जाऊन त्याच्या कलाकृतीच्या आधाराने व्हावे, असा एक संकेत आहे. मात्र गेल्या काही काळात आपण एक देश आणि समाज म्हणून हा संकेत वारंवार पायदळी तुडवत आहोत. आपण हे सिद्ध केले आहे की, कलाकाराला जात (कट्यार… फक्त पुणेकर आणि भावे आडनाव असणारे लोकच बनवू शकतात, हे विधान), धर्म (मंगेशकर भगिनी आणि आमिर खान यांच्या एकाच अर्थाने केलेल्या विधानाला मिळालेला टोकाचा वेगवेगळा प्रतिसाद) आणि देश (गुलाम अली प्रकरण) दोन्ही असते.

वस्तुत: जात हे भारताचे न बदलणारे वास्तव आहे, हे गृहीत धरून भारतीय सिनेमाचे सामाजिक विश्लेषण होण्याची वेळ आता आली आहे. विशेषतः शतकानुशतके समानतेची संधी नाकारल्या गेलेल्या वर्गाचं भारतीय सिनेमाच्या प्रदीर्घ इतिहासात किती योगदान आहे? स्वातंत्र्योत्तर भारतात दलित वर्गाला भारतीय सिनेमात आपलं कर्तृत्व दाखवण्याच्या समान संधी मिळाल्या का? खान त्रयी ही भारताच्या ‘सेक्युलर’ असल्याचा पुरावा आहे, पण आपल्याकडे आतापर्यंत किती दलित स्टार्स किंवा सुपरस्टार्स झाले? दुर्दैवाने यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. खरं तर भारतीय सिनेमासृष्टी (बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीज) या धर्मनिरपेक्ष मानल्या जातात. आपल्याकडे इतर क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात आढळणारे भेदभाव इथे बरेच कमी आहेत. तुमच्या अंगात गुणवत्ता असेल तर तुम्हाला तुमचं नाणं इथे खणखणीत वाजवून दाखवता येतं. अर्थातच भरपूर संघर्ष केल्यावर. भारतात आढळणाऱ्या धार्मिक आणि जातीय विषमतेचा बॉलीवूडने अनेक सिनेमांमधून विरोधही केला आहे. पण इतक्या उदारमतवादी मानल्या गेलेल्या फिल्म इंडस्ट्रीच्या मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये किती दलित व्यक्तिरेखा मध्यवर्ती पात्र होत्या, याचा शोध घ्यायला गेलो तर पदरी निराशा पडते.

आमिर खानची निर्मिती असलेला ‘पीपली लाइव्ह’मधला नथ्था, प्रकाश झाच्या ‘आरक्षण’ सिनेमामध्ये सैफ अली खानने साकारलेला दलित प्राध्यापक, विधु विनोद चोप्राच्या ‘एकलव्य’ सिनेमामध्ये संजय दत्तने साकारलेला दलित पोलिस अधिकारी किंवा गतकाळातला देविका राणी आणि अशोक कुमारचा ‘अछूत कन्या’ हा चित्रपट, असे काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे अपवाद आहेत. विशाल भारद्वाजने ‘ओंकारा’मध्ये उत्तर भारतामधल्या जातींचे ‘अंडरकरंट’ प्रभावीपणे दाखवले होते. शेखर कपूरच्या अंगावर शहारे आणणाऱ्या ‘बॅण्डिट क्वीन’चा पण उल्लेख करावा लागेल. आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’ आणि ‘लगान’मध्ये दलित पात्रं होती. अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ आणि ‘वासेपूर’ चित्रपटद्वयीत जातीचे संदर्भ परिणामकारकतेने येतात. या बाबतीत भारतीय मेनस्ट्रीम सिनेमांपेक्षा भारतीय ‘आर्ट-हाउस’ सिनेमांची (यात शाम बेनेगल आणि इतर मंडळींचे योगदान मोठे आहे.) कामगिरी बरीच उजवी आहे.

अर्थात, हे झालं पडद्यावरच्या दलित पात्रांबद्दल. भारतीय सिनेमावर किती दलित कलाकारांनी छाप सोडली आहे, याचा आढावा घ्यायला गेलो तरी हाच नकारात्मक सूर पुन्हा आढळतो. खरं तर ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधला खराखुरा ‘पहिला यशस्वी दिग्दर्शक’ मानलं जातं, असे कांजीभाई राठोड हे गृहस्थ दलित होते (१९२०) आणि ३०च्या दशकात या दिग्दर्शकाने ‘काला नाग’ (आपल्याकडचा पहिला क्राइम थ्रिलर), ‘भक्त विदुर’ असे यशस्वी चित्रपट दिले होते. पण पुढे मात्र यशस्वी दलित दिग्दर्शक फारसे दिसत नाहीत. कलाकारांच्या बाबतीत बघायला गेलं, तर अकाली गेलेली आघाडीची अभिनेत्री दिव्या भारती, जॉनी लिवर, आपल्या मराठीमधली प्रतिभावान अभिनेत्री उषा जाधव, सीमा विश्वास, राखी सावंत असे काही कलाकार आहेत. अजय देवगण ज्या विश्वकर्मा जातीचा आहे, ती काही राज्यांमध्ये एससी तर काही राज्यांमध्ये ओबीसी श्रेणीत येते. दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत काही लोकप्रिय दलित कलाकार आहेत. पण हा सगळा अनुशेष चित्रपटसंगीत क्षेत्रात भरून निघताना दिसतो. यात सोनु निगम, इलया राजा, दलेर मेहेंदी, मिका, सुखविंदर सिंग, हंस राज हंस, आपल्याकडचे आनंद शिंदे -मिलिंद शिंदे, कैलाश खेर असे अनेक गायक-संगीतकार दलित समाजामधून आलेले आहेत. यात अजून एक नाव आहे, ते म्हणजे संवेदनशील कलाकार आणि एकाहून एक अप्रतिम गाणी लिहिणारा गीतलेखक शैलेंद्र.

शैलेंद्रची ओळख फक्त अप्रतिम गीतकार एवढीच नाही. ‘तिसरी कसम’सारखा अतिशय सुंदर चित्रपट त्याने निर्माता म्हणून बनवला होता. शब्दांत रमणाऱ्या या माणसाला निर्मितीची आणि किचकट चित्रपट वितरणाची आर्थिक गणितं काही जमली नाहीत. परिणामी, त्याला दिवाळखोरीचा सामना करावा लागला. सिनेमा क्षेत्रात ठसा उमटवणारी ही गिनीचुनी नावं भारतीय सिनेमा हा सर्वसमावेशक आहे, या गृहीतकावर प्रश्नचिन्ह उमटवतात. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामध्ये अनेक बाबतीत मुस्लिम समाज आणि दलित समाज यांच्यात साम्यस्थळे आढळतात. पण चित्रपटक्षेत्राचा विचार केला, तर मुस्लिम समाज दलित समाजापेक्षा मैलोगणती पुढे असल्याचं आढळून येतं.

भारतीय सिनेमामध्ये असणाऱ्या दलित अनुशेषाची कारणमीमांसा करायला गेलो, तर काही ठळक कारणं समोर येतात. भारतीय सिनेमा हा बऱ्याचदा ‘उत्सवी’ मोडमध्ये असतो. चोप्रा, जोहर, बडजात्या आणि या त्रिकुटाला आंधळेपणाने कॉपी करणारे इतर निर्माता-दिग्दर्शक हे त्यांच्या चित्रपटात ढीगभर सुख आणि चिमूटभर दु:ख दाखवत असतात. दुर्दैवाने, ‘सेफ बेट’ खेळणाऱ्या या निर्माता-दिग्दर्शकांच्या फिल्म्स आपल्याकडे जास्त चालतात. दलित पात्रं किंवा समस्या या त्यांच्या परिघावर नसतात. अजून एक कारण सांगायचे, तर सुरुवातीच्या काळात बनणारे बहुतेक चित्रपट हे पौराणिक विषयांवरील चित्रपट होते. आपल्याकडच्या पौराणिक कथांमध्ये दलित पात्रं आढळत नाहीत. आढळली, तर ती पण राक्षस वगैरेच्या रूपात. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच दलित पात्रं डावलली गेली. सिनेमा उत्क्रांतीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात डावलले गेल्याने, पुढे त्यांना पुनरागमन करायला जमले नाही. आपल्याकडच्या पूर्वीच्या आणि आताच्या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकांच्या यादीवर एक नजर फिरवली, तर त्यावर असणारा मराठी, पंजाबी आणि उत्तर भारतीय उच्चवर्णीय पगडा लगेच लक्षात येतो.

भारतात दलित कलावंत सुपरस्टार का तयार होत नाहीत, हा प्रश्न मात्र चक्रावून टाकणारा आहे. सिनेमा आणि सिनेमासृष्टीकडे जातीपातीच्या चश्म्यातून कशाला बघायला हवं, असा सूर लागला तरीही या प्रश्नाचा एकूणच खोलात जाऊन अभ्यास होण्याची गरज आहे.
‘कोलावरी डी’ गाण्यामुळे आणि ‘रांझना’सारख्या लोकप्रिय चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला धनुष हा अभिनेता दलित आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानने झोकात चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते. कंगना राणावतसारखी तोलामोलाची अभिनेत्री त्याची पहिल्या चित्रपटात सहकलाकार होती. पण तो चित्रपट चालला नाही. मराठीपुरतं बोलायचं झाल्यास, राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या उषा जाधव यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीला त्यांच्या वकुबाच्या किती भूमिका मिळाल्या, हा प्रश्नच आहे. दलित समाजामधून आलेले संघर्षरत अभिनेते नंतर कुठे गायब होतात, यावर म्हणूनच संशोधन होण्याची गरज आहे.

महात्मा गांधींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर एक अतिशय बिग बजेट सिनेमा बनला. देशी-विदेशी प्रेक्षकांनी त्या सिनेमाला डोक्यावर उचलून धरले. ऑस्करसह अनेक ठिकाणी त्या चित्रपटाला नामांकनं मिळाली. काही वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनला. तुलनेने अतिशय कमी बजेटमध्ये. या चित्रपटाची निर्मिती ‘एनएफडीसी’ने केली. तिथल्या लाल फितीच्या कारभारामुळे आणि बाबुशाहीमुळे चित्रपटाच्या वितरणामध्ये अक्षम्य चुका झाल्या आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अनियमितता आली. दलित जनतेची तिकीट खिडकीवर झुंबड उडाली. परभणीला मी स्वतः ती गर्दी बघितली आहे. पण, बाकी लोकांना हा चित्रपट कधी आला, कधी गेला, हे कळलं नाही. ज्यांना कळलं, त्यांनी एक कंटाळवाणा, अनुत्साही प्रतिसाद दिला. या उदाहरणामध्ये मला वाटतं, वर उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. चित्रपट हा आपल्या समाजाचा आरसा असेल, तर आपला आरसा अनेक ठिकाणी तडे गेलेला आहे, इतकंच.
अमोल उदगीरकर
amoludgirkar@gmail.com