आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूनटून नावाचं कल्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज परिस्थिती कमालीची बदललीय. म्हणजे, बाजारात एक्स्ट्रा लार्ज डिझायनर वेअर उपलब्ध आहेत. भूमी पेडणेकरसारखी लठ्ठ नायिका प्रेक्षकांना पसंत आहे. मात्र हे भाग्य उमादेवी उर्फ टूनटून यांच्या वाट्याला नव्हतं, तरीही त्यांचं चित्रपटसृष्टीतलं योगदान अनन्यसाधारण असं होतं...

आपल्या जगण्यावर सिनेमाचा एवढा प्रभाव आहे की, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण बॉलीवूडच्या नटांची विशेषणं लावत असतो. उदाहरणार्थ एखादा पोरीबाळींकडे जरा ‘तसल्या’ नजरेने बघत असेल, तर आपण त्याला ‘ए प्रेम चोप्रा’ अशी हाक मारतो. कुणी पोरगा रोज जिममध्ये घाम गाळत असेल, तर त्याला त्याचे मित्र ‘सलमान’ म्हणून हाक मारतात. अजूनही बरीच उदाहरणे आहेत. असंच अजून एक समर्पक उदाहरण आहे ते टूनटून या अभिनेत्रीचं. कोणीही जाड व्यक्ती विशेषतः ती स्त्री असेल, तर तिला बऱ्याच वेळा तिच्या पाठीमागे किंवा तोंडावर ‘टूनटून’ असं संबोधलं जातं. टूनटून माहीत नाही, अशी व्यक्ती विरळाच. म्हणजे, स्थूलतेमुळे लग्न न जमणाऱ्या, चारचौघात कसं वागायचं याचा पोच नसणाऱ्या, कुठल्याही पुरुषाच्या गळ्यात पडणाऱ्या बाईचं पात्र प्रत्यक्षात किंवा पडद्यावर दिसलं तर सगळ्यात पहिले लोकांना आठवते ती विनोद निर्माण करणारी टूनटूनच. मात्र प्रत्येक विनोदात करुणेचा अंश असतो, हे विधान सत्य ठरवण्यासाठी तुम्ही चार्ली चॅप्लिनच असायला पाहिजे, असं नाही. लाखो लोकांना हसवणारे पण वैयक्तिक आयुष्यात एकटे पडलेले दादा कोंडके, आपण मरणार आहोत हे माहीत असून मधुबालाशी लग्न करणारा किशोर कुमार, आयुष्याचा शेवट गरिबीत घालवणारे भगवानदादा ही काही उदाहरणे. टूनटून उर्फ उमादेवी खत्रीदेखील याला अपवाद नव्हती.

११ जुलै १९२३ रोजी उत्तर प्रदेशमधल्या एका गावात टूनटूनचा जन्म झाला. जमिनीच्या वादातून तिचे आईवडील आणि तिच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या भावाचा खून झाला. मग दिल्लीच्या बाजूला एका गावात दूरच्या नातेवाइकांकडे हे रोपटं रुजलं. नातेवाईक असले तरी वागणूक नोकरासारखीच मिळत होती. उमादेवी गाणं चांगलं म्हणायची. त्या खेड्यात तिला काही भविष्य दिसेना, म्हणून सिनेमात गाणं म्हणण्यासाठी ती सरळ मुंबईला पळून आली. नाना खटपटी करून तिने प्रख्यात संगीत दिग्दर्शक नौशाद यांची भेट मिळवली. नौशाद यांना तिचा आवाज पसंद पडला. उमादेवीचं पहिलंच गाणं ‘अफसाना लिख रही हू’ ब्लॉकबस्टर हीट झालं. मात्र दुर्दैवाने तिची सांगीतिक कारकिर्द फारशी बहरली नाही. दरम्यान लग्न झालेल्या उमादेवींनी संसारावर लक्ष केंद्रित केलं आणि त्या प्रवाहाच्या थोड्या बाजूला पडल्या. आर्थिक विवंचना जाणवू लागल्यावर बाई पुन्हा सिनेमाकडे वळल्या. पुन्हा नौशादच बाईंच्या मदतीला धावून आले. पण या वेळेस त्यांनी उमादेवींना विनोदी भूमिका करशील का, अशी विचारणा केली. उमादेवींनी होकार दिला आणि ‘टूनटून’ नावाचा कल्ट जन्माला आला. टूनटून हे टोपणनाव त्यांना नौशाद यांनीच दिलं. बघताबघता उमादेवी ही ओळख मागे पडली आणि टूनटून हीच त्यांची ओळख बनली. लोकांना त्यांचं काम बेहद्द आवडलं. त्यांनी भारंभार चित्रपट साइन केले. ‘काश्मीर की कली’, ‘बेगुनाह’, ‘उजाला’, ‘कोहिनूर’, ‘नया अंदाज़’ अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं. पण पडद्यावरच्या कामामुळे त्यांची जी इमेज तयार झाली, त्याचा त्यांना त्रास झाला. कुठेही बाहेर गेलं की, लोक त्यांची खिल्ली उडवू लागले. त्यांच्या शरीरावरून अभद्र कॉमेंट करू लागले. याचा बराचसा त्रास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला झाला.

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात टूनटून बाई थोड्या मंदावल्या. पण स्वस्थ बसणं स्वभावात नव्हतं. बाईंनी कलाकारांची संघटना बांधण्यात मोठी कामगिरी बजावली. आज मोठ्या प्रमाणात लहानमोठ्या अभिनेत्यांना अगदी सलमान खानपासून ते कोरसमध्ये नाचणाऱ्या एक्स्ट्राला मदत करणाऱ्या सिनेआर्टिस्ट असोसिएशनची बांधणी करण्यात उमादेवींचा मोठा वाटा आहे. पडद्यावर आणि पडद्याबाहेर दोन्ही ठिकाणी आपल्या अष्टपैलू कामगिरीचा ठसा उमटवणारे कलाकार फार विरळा. बाईंना ते भाग्य लाभलं. काळानुसार परिस्थिती बदलत चालली आहे. ‘दम लगा के हैशा’मध्ये पदार्पण करणारी जाडजूड भूमी पेडणेकर अशा बदलांचं एक प्रतीक आहे. विद्या बालनसारखी चतुरस्र नटी आपल्या वाढीव वजनाचा थोडाही गंड बाळगत नाही. नुकतीच हॉलीवूडच्या सगळ्यात जास्त पैसा कमावणाऱ्या नट्यांची यादी प्रकाशित झाली. त्यात वयस्क आणि जाडजूड असणाऱ्या थोडक्यात हॉलीवूड नट्यांशी संबंधित सगळे स्टिरीओटाइप्स मोडणारी मेलिसा मॅकार्थी सगळ्यात आघाडीवर आहे. हळूहळू का होईना, जग बदलत चालले आहे. बॉलीवूड बदलत चालले आहे. उमादेवी आजच्या काळात असत्या तर कदाचित त्यांच्या गुणवत्तेला अधिक न्याय मिळाला असता. पण जोपर्यंत सिनेआर्टिस्ट असोसिएशन आहे, तोपर्यंत उमादेवींचं काम कुणी विसरू शकणार नाही, हेही नक्की!

डॉक्युमेंटेशनबद्दल प्रचंड आळशी असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये कदाचित उमादेवी उर्फ टूनटून विस्मृतीत गेल्या असत्या. पण त्यांच्या कामाला जिवंत ठेवण्याचं श्रेय ज्येष्ठ पत्रकार शिशिर कृष्ण शर्मा यांना जातं. इंटरनेटवर मुशाफिरी करताना शिशिर कृष्ण शर्मा यांचा ‘बिते हुए दिन’ नावाचा एक ब्लॉग सापडला. तिथे ते भारतीय सिनेमाच्या ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाचं काम रसाळ लेखनशैलीत करतात. तिथे त्यांनी टूनटूनच्या शेवटच्या दिवसांचा वेध घेतला आहे. उमादेवींची शेवटची मुलाखत घेण्याचं श्रेय त्यांचंच. त्यांच्या मदतीशिवाय हा लेख पूर्ण झाला नसता. शिशिर कृष्ण शर्मा यांचे आभार!

अमोल उदगीरकर
amoludgirkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...