रील अँड रिअॅलिटी: / रील अँड रिअॅलिटी: बंडखोरी खूप भारी गोष्‍ट असते, वाचा सिंगल पॅरेंट नीना गुप्ता (रसिक)

एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक असलेल्या प्रीतीश नंदीच्या हातात मसाबाचं जन्म प्रमाणपत्र पडलं. त्यात विवियन रिचर्ड‌्सचा उल्लेख पाहून त्याने नीनाशी संपर्क साधला आणि चक्क एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग सुरू केलं... एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक असलेल्या प्रीतीश नंदीच्या हातात मसाबाचं जन्म प्रमाणपत्र पडलं. त्यात विवियन रिचर्ड‌्सचा उल्लेख पाहून त्याने नीनाशी संपर्क साधला आणि चक्क एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग सुरू केलं...

अमोल उदगीरकर

Aug 28,2016 12:00:00 PM IST
बहुतेकांना परीकथा आवडतात. आपल्या आयुष्यातसुद्धा एखादी परीकथा घडावी, असं अनेकांना वाटत असतं. पण तसं होत नाही. जग किंवा आपण स्वतः तसं घडू देत नाही, खूपदा. मग काय, परीकथा नाही म्हणजे आयुष्य थांबवायचं का? की आपल्या आपल्या अ-परीकथेचं रूपांतर एका सकारात्मक गोष्टीत करायचं? या प्रश्नांची उत्तरं नीना आणि मसाबा या मायलेकींच्या आयुष्यात डोकावलं की सहज मिळतात...
नीना गुप्ता म्हटलं, की डोळ्यासमोर कोण येतं? ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यात माधुरी दीक्षितसोबत नाचत कातिल एक्स्प्रेशन देणारी बया? ‘उत्सव’सारख्या सिनेमात बोल्ड सीन्स देऊन संस्कृतीरक्षकांना धक्का देणारी अभिनेत्री? साईडरोलमध्ये दिसणारी अजून एक बऱ्यापैकी अभिनेत्री? आपल्या विवाहसंस्थेवर हळुवार भाष्य करणाऱ्या ‘साँस’सारख्या मालिकेची दिग्दर्शक? पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आवडी-निवडीवरून तुम्हाला सतत ‘जज’ करणाऱ्या भारतीय समाजव्यवस्थेत हे इतकं साधं सरळ कधीच नसतं. नीना गुप्ताची आपल्याकडे ओळख तिने बऱ्यापैकी कर्तृत्व गाजवूनही तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या एका धक्कादायक निर्णयामुळे होते. काय होता तो तत्कालीन समाजाची मुळं हादरवणारा निर्णय?
जर एखाद्या मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातली अविवाहित मुलगी अचानक एके दिवशी घरी घोषित करते की, मी एका बाळाची आई होणार आहे, पण त्या बाळाच्या वडिलांशी लग्न करण्याचा माझा काहीही इरादा नाहीये; काय प्रतिक्रिया असेल मुलीच्या आईवडिलांची? बरं काळ पण आजचा नाही, ऐंशीच्या दशकातला. या उदाहरणामधली मुलगी आहे, नीना गुप्ता.
१९८८ मध्ये नीना प्रेग्नन्ट झाली. तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता दुसरा तिसरा कुणी नव्हता, तर वेस्टइंडिजचा दिग्गज क्रिकेट खेळाडू विवियन रिचर्ड‌्स होता. मैदानावर गोलंदाजांवर दहशत बसवणाऱ्या रिचर्ड‌्सवर नीना गुप्ता फिदा होती. त्या वेळेस शादीशुदा पण घटस्फोटाच्या मार्गावर असलेला रिचर्ड‌्स ज्या मोकळ्याढाकळ्या कॅरेबियन संस्कृतीमधून आला होता, तिथे असे विवाहबाह्य संबंध काही नवीन गोष्ट नव्हती. सगळं कसं सरळ पाऱ्यासारखं पारदर्शी. इथे ना कुठली खोटी आश्वासनं होती, ना कुठले सामाजिक पायगुंते. दोघांच्या संबंधातून नीना गर्भवती राहिली. गर्भपात करण्याऐवजी नीनाने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. ‘सिंगल मदर’ हा ट्रेंड भारतात आजही सुस्पष्ट दिसत नाही. तो तर बंदिस्त आचार-विचारांचा काळ होता. नीनाच्या पोटी मुलगी जन्माला आली. नीनाने तिचं नाव ठेवलं, मसाबा. मसाबाच्या जन्मानंतर नीना काही काळ सर्व प्रकारच्या माध्यमांपासून दूर गेली. तरी आजूबाजूच्या वर्तुळात कुजबुज सुरू होतीच. मुलीचे पिता कोण आहेत? हा प्रश्न कुजबुजीच्या स्वरूपात कानावर पडू लागला होता. पण नीनाने या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. प्रश्न उपस्थित झाला केव्हा, तर मसाबाला शाळेत प्रवेश घेताना. प्रवेश अर्जावर वडिलांचे नाव काय टाकायचे, हा तो प्रश्न होता. नीनाचा जवळचा मित्र आणि प्रख्यात दिग्दर्शक सतीश कौशिकने मसाबाच्या नावापुढे स्वतःचं नाव लावू देण्याची तयारी दाखवली. पण नीनाने ठामपणे त्याला नकार दिला. स्वतःच फॉर्ममध्ये विवियन रिचर्ड‌्सचं नाव लिहिलं.
पण दरम्यान एक पेच उभा राहिला. एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक असलेल्या प्रीतीश नंदीच्या हातात मसाबाचं जन्म प्रमाणपत्र पडलं. त्यात विवियन रिचर्ड‌्सचा उल्लेख पाहून ‘पत्रकार’ प्रीतीशला त्यातली ‘न्यूज व्हॅल्यू’ लगेच कळली. त्याने नीनाशी संपर्क साधला आणि चक्क एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग सुरू केलं, ‘तू तुझ्या मुलीच्या वडिलांचं नाव स्वतःहून जाहीर कर, नाहीतर मी माझ्या वर्तमानपत्रात त्याचं नाव छापतो.’ नीनाने काही त्याच्या ब्लॅकमेलिंगला दाद दिली नाही. मग प्रीतीश नंदीने आपल्या वर्तमानपत्रात मसाबाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत छापली. मसाबाचा पिता कोण, हे उर्वरित जगाला कळलं. या दरम्यान जेव्हा रिचर्ड‌्स भारतात यायचा, तेव्हा तेव्हा आपल्या मुलीला वेळ द्यायचा. त्यांच्याच घरात राहायचा आणि मसाबाला फिरायला घेऊन जायचा. रिचर्ड‌्सने कधीही एक पिता म्हणून जबाबदाऱ्यांपासून हात झटकले नाहीत, हे एक विशेष. मसाबा मोठी झाली. तिने फॅशन डिझाईनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या ती देशातल्या आघाडीच्या फॅशन डिझाइनरपैकी एक आहे. नुकतंच तिने मधू मंतेंनाशी लग्न केलं. मधू मंतेंना म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल यांच्यासोबत ‘फँटम’ फिल्म्सची धुरा सांभाळणारा प्रयोगशील निर्माता. काही दिवसांपूर्वी ‘फँटम’च्या कँटीनमध्ये मसाबा आणि मधू एकत्र आले होते. दोघे एकत्र खूप आनंदी दिसत होते. मुलीला आयुष्यात स्थिर केल्यावर नीनाने एका उद्योगपतीशी लग्न केलं. सध्या ती अमेरिकेत असते. अनेक संघर्ष झेलल्यावर नीनाच्या कहाणीचा गोड शेवट झाला आहे. मसाबाची कधीही आपल्या आईबद्दल आणि वडिलांबद्दल तक्रार नव्हती. लहानपणापासूनच वयाला न शोभणाऱ्या समजूतदारपणाने तिने परिस्थिती स्वीकारली.
हा लेख वाचल्यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. पहिली, कसले भन्नाट लोक आहेत नीना, रिचर्ड‌्स आणि मसाबा. आयुष्यात जे आलं, त्याला मस्तपैकी तोंड दिलं, काहीही तक्रार न करता आणि तेही ढोंगी समाजाची दुतोंडी बंधनं फाट्यावर मारून. दुसऱ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतील, त्या एकदम दुसऱ्या टोकाच्या. कसले बदफैली आणि ‘असंस्कारी’ लोक आहेत हे. नीना गुप्तासारख्या लोकांमुळे समाज बिघडतो. पण एवढाच विचार करून हे दुसऱ्या गटातले लोक थांबणार नाहीत. ते पहिल्या गटातल्या लोकांना विचारतील, तुम्हाला एवढी नीना गुप्ता भारी वाटते ना? तुमच्या घरातल्या मुलीने असं काही करायचं ठरवलं तर तुम्ही काय करणार? पण पहिल्या गटातले लोक मंद हसतील आणि या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतील. अशा लोकांना फाट्यावर मारणंच योग्य असतं, हेच नीना गुप्ता अठ्ठावीस वर्षांपासून रोज सिद्ध करत आलीये. बंडखोरी कधी कधी खूप भारी गोष्ट असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, 80 च्या दशकात समाजाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या धाडसी नीना गुप्ता आणि मसाबाचे ग्लॅमरस फोटो....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
X
एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक असलेल्या प्रीतीश नंदीच्या हातात मसाबाचं जन्म प्रमाणपत्र पडलं. त्यात विवियन रिचर्ड‌्सचा उल्लेख पाहून त्याने नीनाशी संपर्क साधला आणि चक्क एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग सुरू केलं...एका मोठ्या वर्तमानपत्राचा संपादक असलेल्या प्रीतीश नंदीच्या हातात मसाबाचं जन्म प्रमाणपत्र पडलं. त्यात विवियन रिचर्ड‌्सचा उल्लेख पाहून त्याने नीनाशी संपर्क साधला आणि चक्क एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग सुरू केलं...
COMMENT