आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहिट लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता बसू प्रसादवरचा लेख प्रकाशित झाला त्याच दिवशी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. मला मेलवर, फेसबुकवर असंख्य सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. 
या लेखाने ‘दिव्य मराठी’च्या वेबसाइटला मिळालेल्या सर्वाधिक हिट्सचा जुना रेकॉर्ड मोडीत काढला. 

काही लिखाण तुम्हाला ओळख मिळवून देतंच, पण एक आंतरिक समाधानही मिळवून देतं. ‘रसिक’मध्ये मी वर्षभर चालवलेल्या ‘रील अँड रिअॅलिटी’ या सदरात  लिहिलेला श्वेता बसू प्रसादवरचा लेख असाच संस्मरणीय होता. वेश्या व्यवसाय करताना रंगेहाथ पकडली गेली, एक प्रतिभावान अभिनेत्री एवढीच तिची ओळख एव्हाना जनमानसात प्रस्थापित झाली होती. मी अनपेक्षितरीत्या तिला ‘फँटम प्रॉडक्शन्स’च्या ऑफिसमध्ये भेटलो, तेव्हाच तिच्यावर लेख लिहिण्याचं  ठरवलं होतं. मात्र, मी हा लेख लिहिला तेव्हा मी स्वतःवर फारसा खुश नव्हतो. लेख त्रोटक झाला आहे असंही वाटत होते. पण लेख प्रकाशित झाला, तेव्हा त्याला ‘न भूतो न भविष्यति’ प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांना श्वेतावरचा डाग कोर्टाने पुसून टाकला आहे, हे माहीतच नव्हतं. अनेक लोकांनी आपण तिच्याबद्दल विनाकारण पूर्वग्रह बाळगत होतो याची संपर्क माध्यमातून कबुली दिली. 
 
श्वेता बसू प्रसादवरचा लेख प्रकाशित झाला त्याच दिवशी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. मला मेलवर, फेसबुकवर असंख्य सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. अनेक लोकांनी स्वयंस्फूर्तीने हिरिरीने तो लेख शेअर केला, ज्यात मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक दिग्गज अभिनेते होते. ‘रसिक’ टीममधले माझे मार्गदर्शक प्रशांत पवार यांनी नंतर मला सांगितलं की, या लेखाने ‘दिव्य मराठी’च्या वेबसाइटला मिळालेल्या सर्वाधिक हिट्सचा जुना रेकॉर्ड मोडीत काढला. हा लेख माझ्या लेखक म्हणून असणाऱ्या कारकीर्दीतला मैलाचा दगड म्हणून कायम माझ्या मनात राहील. श्वेता बसू प्रसादने नंतर ‘फँटम’ सोडलं. तिला करण जोहरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा सिनेमा ऑफर केला आहे. 

‘बद्री की दुल्हनिया’ या चित्रपटात तिने वरुण धवन आणि आलिया भटसोबत चांगलीच छाप सोडली. सिनेमा हिट झाला. शंभर कोटी क्लबमध्ये जाऊन बसला. टीव्ही, वेब सिरीज, शॉर्टफिल्म्स आणि सिनेमा या सगळ्या माध्यमांमध्ये सध्या ती संचार करत आहे. तिला यश मिळायला उशीर झाला असला तरी ते शेवटी मिळत आहे हे महत्वाचं. माझ्या मर्यादित कुवतीनुसार मी अनेक लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकलो याचं मला मिळालेलं समाधान अपरंपार आहे. श्वेताच्या लेखासोबतच नव्वदच्या दुर्लक्षित दशकातले सिनेमांवर लिहिलेले लेख आणि ‘रसिक’च्या २०१६ वर्धापन दिन विशेष अंकासाठी  गीतकार आणि लेखक वरुण ग्रोव्हरची घेतलेली मुलाखत, या दोन लेखांनीही मला भरभरून समाधान दिलं. ‘रसिक’ने माझ्यासारख्या नवोदित लेखकांना अशीच संधी देत राहावी, आणि दर्जेदार लिखाणाला नेहमीच प्रोत्साहन देत राहावं, अशा माझ्या शुभेच्छा!
 
बातम्या आणखी आहेत...