आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांती शाह के बंदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीमवर्कचा नियम उत्कृष्टतेला लागू पडतो, तितकाच तो सुमारतेला पण लागू पडू शकतो. हा नियम जितका ‘शोले’ला लागू पडतो, तितकाच ‘गुंडा’ला पण लागू पडतो.

आपला देश व्यक्तिपूजा करणारा. आपला टीमवर्क, सांघिक भावना वगैरे गोष्टींवर फारसा भरोसा नसतो. माझे काही मित्र होते, ते म्हणायचे, तेंडुलकरची हंड्रेड व्हायला पाहिजे, मग इंडिया जिंको का हरो. आता तेच लोक गल्लीबोळात विविध राजकीय नेत्यांचे भक्त म्हणून वेगवेगळ्या प्रश्नांवर मत व्यक्त करत असतात. असो.
तर मॅच फक्त सचिन तेंडुलकर जिंकून देत नाही, तर संघाच्या विजयात राहुल द्रवीड आणि लक्ष्मणसारखे खेळाडूसुद्धा हातभार लावत असतात. ही गोष्ट प्रत्येक क्षेत्राला लागू पडते. क्रिकेटपासून राजकारणापर्यंत आणि कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते चित्रपटनिर्मितीपर्यंत. ‘शोले’ हा कल्ट सिनेमा उत्तम सांघिक प्रयत्नांचं मूर्तरूप होता. म्हणजे रमेश सिप्पी हा यशाचा खराखुरा सूत्रधार होताच, पण जर त्याला सलीम-जावेद यांची अफाट पटकथा, आर. डी.चं संगीत, अमिताभ-धर्मेंद्र-अमजद खान यांचा अभिनय याची साथ नसती, तर ‘शोले’ शोले बनला असता का? ‘मुघल-ए-आझम’मध्ये नौशादचं संगीत, दिलीप कुमारचा अभिनय नसता, तर के. आसिफ एक महाकाव्य पडद्यावर उतरवू शकला असता का? हा टीमवर्कचा नियम उत्कृष्टतेला लागू पडतो, तितकाच तो सुमारतेला पण लागू पडू शकतो. हा नियम जितका ‘शोले’ला लागू पडतो, तितकाच ‘गुंडा’ला पण लागू पडतो.
आता दिग्दर्शक कांती शाहचा ‘गुंडा’ ज्याला माहीत नाही, असा चित्रपट रसिक विरळाच. ‘गुंडा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुमारतेचा पडद्यावरचा उत्सव आहे. ‘Its so bad that it’s good’ या सिंड्रोममुळे या चित्रपटाला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स, व अतिशय वाईट तांत्रिक बाजू असते, तेव्हा ‘गुंडा’सारखा चित्रपट तयार होतो. आज IMBDसारख्या वेबसाइटवर ‘गुंडा’चं मानांकन रणबीरच्या ‘रॉकस्टार’, विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’, आणि चक्क ‘शोले’पेक्षा पण जास्त आहे. खरं तर ‘गुंडा’चा दिग्दर्शक हीच कांती शाहची ओळख करून देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल. डाकू मुन्नीबाई, गरम, कांती शाह के अंगुर, लोहा, शीला की जवानी या सेमी-पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात प्रसिद्ध आहे. विक्रमादित्य मोटवानेच्या गाजलेल्या ‘उडान’ या चित्रपटात ‘कांती शाह के अंगुर’ या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होतो. ‘उडान’मधला टीनएजर नायक आणि त्याचे मित्र यांच्या लैंगिक जाणिवांचा तो चित्रपट एक अविभाज्य हिस्सा असतो.
भारतीय चित्रपटसृष्टीत जे जे म्हणून वाईट आहे, त्याचं प्रतीक म्हणून काही लोक कांती शाहकडे बघतात. पण हे अर्धसत्य आहे. कांती शाहची स्वतःची एक टीम आहे, जी वर्षानुवर्षे त्याच्यासोबत काम करत आहे. त्यांच्याशिवाय कांती शाह, कांती शाह नसता आणि ‘गुंडा’ हा कल्ट क्लासिक बनलाच नसता. त्याच्यात सगळ्यात पहिलं नाव आहे, ते बशीर बाबरचं. बशीर बाबर म्हणजे कांती शाहच्या चित्रपटामागचा ब्रेन. बशीर बाबर कांती शाहच्या वर्तुळात ‘भाई’ नावाने प्रसिद्ध आहे. कांती शाहचे सगळे चित्रपट बशीरभाई लिहितात. हे बशीरभाई संवादलेखक आहेत. ‘गुंडा’मधला ‘मेरा नाम है बुल्ला, रखता हू हमेशा खुल्ला’ किंवा ‘दिल्ली से बिल्ली का दुध पीके आया हूं’ हे असे अजरामर संवाद बशीरभाईंच्या लेखणीमधूनच उतरले आहेत. एक काळ असा होता की, कांती शाहचं बशीरभाईशिवाय पान पण हलायचं नाही. दोघांनी तब्बल चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. हे बशीरभाऊ मध्येच कांती शाहच्या चित्रपटात अभिनयाची पण हौस भागवून घ्यायचे. पण या ‘सर्जनशील’ भागीदारीला काही नतद्रष्टांची नजर लागली. ‘फ्री एन्ट्री’ हा शेवटचा चित्रपट तयार केल्यावर ही जोडी फुटली. सलीम-जावेद जोडी फुटल्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचं जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं कांती शाह-बशीरभाऊची जोडी फुटल्यामुळे झालं, असं काही जाणकारांचं मत आहे. दुःख एवढंच आहे की, चुट्टीया, इबु हटेला, बच्चू भगोना अशी जबरी पात्र आता पडद्यावर कोण उभी करणार? सध्या युट्युबवर सेमी-पॉर्न भारतीय शॉर्ट फिल्म्सची लाट आली आहे, त्यात बशीरभाई कार्यरत आहेत. तिथे ते दिग्दर्शन वगैरे पण करतात. पण लेखकाने दिग्दर्शनाकडे वळणे हे स्वाभाविकच नाही का? पण बशीर बाबर आणि कांती शाह एकत्र यावेत आणि त्यांनी ‘गुंडा’चा सिक्वेल तयार करावा, अशी आमच्यासारख्या असंख्य चित्रपटरसिकांची इच्छा आहे. त्यासाठी लवकरच सह्यांची मोहीम राबवावी, असाही मनसुबा आहे.
कांती शाहच्या टीमचा अजून एक अविभाज्य हिस्सा म्हणजे, सपना तन्वीर. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. कांती शाहला तुम्ही यशस्वी मानत असाल तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे, सपना तन्वीर. कांती शाहची बायको. पण ती कांती शाहच्या नुसती पाठीमागे उभी राहून थांबली नाही, तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर पण भरपूर ‘योगदान’ दिले आहे. कांती शाहच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे. कांती शाहचे चित्रपट पाहणाऱ्या चित्रपट रसिकांच्या ‘नजरेतून’ सपना बाई सुटणं शक्यच नाही. ‘एक एक काे काट दूंगी’ आणि ‘डुप्लिकेट शोले’ असे महान चित्रपट एकत्र या पतीपत्नीने केले आहेत. हे दोघेही एवढे गुणवान आहेत की, यांच्या खऱ्या आयुष्यात जया आणि अमिताभ यांच्या ‘अभिमान’ चित्रपटाची कथा घडेल की काय, या भीतीने आम्हा चित्रपटरसिकांचा जीव कासावीस होतो. सपना बाई वटसावित्रीचं व्रत करत असतील, ही आशा. म्हणजे पुढचे सात जन्म ही जोडी एकत्र राहील आणि आमच्यासारख्या फॅन मंडळींची मनोरंजनाची ‘फुल टू’ सोय होईल, असा आमचा क्षुद्र स्वार्थ आहे.
या मांदियाळीतलं तिसरं रत्न म्हणजे, अनिल नागरथ. याला असंख्य चित्रपटांमध्ये अनेक फुटकळ भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं असेल. याचं नाव ‘गुगल’वर शोधलं तरी याच्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. हा कांती शाहच्या प्रत्येक चित्रपटात हटकून हजर असतो. याच्या भूमिकांचा साचा ठरला आहे. गँगरेप करणाऱ्या चार खलनायकांपैकी एक आणि वासनादग्ध म्हातारा ज्याची बायको तरुण आहे. हा कांती शाह सोबत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून पण काम करतो. या तिघांशिवाय अमित पचौरी, इशरत अली, राणा जंग बहादूर हे अभिनेते, अक्रम खान हा कॅमेरामन असे अनेक लोक कांती शाहच्या टीममध्ये आहेत.
एड वूड हा हॉलीवूडमध्ये होऊन गेलेला सर्वात सुमार दिग्दर्शक आहे, यावर तिथल्या प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं एकमत आहे. या एड वुडवर टीम बर्टन या दिग्दर्शकाने एक भन्नाट बायोपिक बनवला आहे, ज्यात जॉनी डेपने एड वूडची भूमिका साकारली आहे. तर या एड वूडमध्ये आणि या कांती शाहमध्ये विश्वास बसणार नाही इतकी साम्यं आहेत. एड वूडला आपल्याभोवती चित्रविचित्र लोकांचा गोतावळा जमा करायला आवडायचा. त्याच्यासोबत एक भयानक भाकिते वर्तवणारा ज्योतिषी, लिंगविरहित आयुष्य जगू पाहणारा एक असिस्टंट डायरेक्टर, रंगांधळा कॅमेरामन, त्याची अर्धवट अभिनेत्री मैत्रीण असा गोतावळा कायम असायचा. या बाबतीत आपला कांती शाह हासुद्धा एड वूडच्या पावलावर पाऊल टाकून आहे. पण हे काही दोघांमधलं सगळ्यात मोठं साम्य नाही. ते दोघे ज्या इंडस्ट्रीत काम करायचे, तिथले सगळ्यात सुमार दिग्दर्शक होते, हे सत्यच बाकी सगळ्या साम्यस्थळांना दशांगुळे व्यापून उरतं.
बातम्या आणखी आहेत...