आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amol Uudgirkar Writes Biopic Movies In Bollywood

जुगाडू बायोपिक (अमोल उदगीरकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भा रतीय चित्रपटसृष्टीची एक खासियत म्हणजे, एखादा प्रयोग यशस्वी झाला, की लगेच इतर अनेक निर्माते दिग्दर्शक त्या यशस्वी प्रयोगाचं रूपांतर एका ‘ट्रेंड’मध्ये करतात. म्हणजे, ‘भगतसिंग’ हे चलनी नाणं आहे, हे कळलं की, एकाच वर्षी भगतसिंगवर चार चार चित्रपट येतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हिट झाला की, पावसाळी छत्र्यांप्रमाणे रोमँटिक चित्रपट उगवतात. सध्या ‘सिझन ऑफ द फ्लेवर’ आहे, तो म्हणजे बायोपिक. आपल्याकडे सध्या बायोपिक्स किंवा चरित्रपट बनवण्याची जोरदार लाटच आली आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘नीरजा’सारखे चित्रपट जोरदार चालले आणि बायोपिक जॉनरला सुगीचे दिवस आले. सध्या डझनभर बायोपिक निर्मितीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. म्हणजे, किमान दोन वर्षं तरी हा बायोपिकचा हंगाम सुरू राहणार आहे. पण काही प्रश्न पडतात. तिकीट खिडकीवर चित्रपटाने किती करोड छापले, या पलीकडे जाऊन पडणारे असे प्रश्न. आपल्याकडे जे चरित्रपट बनतात, ते मध्यवर्ती व्यक्तिरेखेला संतुलित न्याय देतात का? हे चित्रपट बनवताना निर्माता-दिग्दर्शक जी सिनेमॅटिक लिबर्टी घेतात, ती कितपत योग्य असते? हॉलीवूडच्या बायोपिकशी तुलना केली, तर दर्जाच्या दृष्टीने आपले बायोपिक कुठे उभे असतात?
दुर्दैवाने, यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारात्मक आहेत. व्यक्तिपूजा हा आपल्या भारतीय समाजाचा स्थायीभाव आहे, त्याचा फटका आपल्या सिनेमामध्ये बनणाऱ्या बायोपिक्सला पण बसताना दिसतो. बायोपिक बनवताना ज्या व्यक्तिविशेषांवर तुम्ही चित्रपट बनवत आहात, त्याचा सम्यक आढावा घेणे अपेक्षित असते. मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू दाखवणे अपेक्षित असते. पण, आपल्याकडचे बायोपिक हा मूलभूत नियम पाळताना दिसत नाहीत. ज्या व्यक्तीवर चित्रपट बनत आहेत, त्याचा उदो उदो होण्यावर आपल्याकडे जास्त भर दिसतो. व्यक्तीने आयुष्यात काहीतरी जगावेगळी आणि भरीव कामगिरी केली आहे, म्हणून त्याच्यावर चित्रपट बनतो, हे ठीक आहे; पण आपल्या चित्रपटात तो माणूस कसा परफेक्ट आहे, हे दाखवण्यात दिग्दर्शकाची ऊर्जा खर्च होते. त्या माणसाचा ‘हिरो’ करण्यात आपल्याला जास्त रस असतो, किंवा ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा तयार करण्याला प्राथमिकता देण्यात येते. या बाबतीत हॉलीवूड चित्रपट आपल्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा ठसा उमटवतात. ‘एरिन ब्रोकोविच’ किंवा ‘द एव्हिएटर’सारखे चित्रपट मध्यमवर्ती व्यक्तिरेखांचे त्यांच्या अंगी असणाऱ्या गुण-दोषांसकट प्रभावी चित्रीकरण करतात. पण ‘भाग मिल्खा भाग’ किंवा ‘मेरी कोम’(ते चित्रपट म्हणून कुणाला चांगले वाटत असले तरी)मध्ये असे होताना दिसते का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. मिल्खा सिंग यांनी पुरस्कार वाटप समितीवर असताना पुरस्कारांच्या बाबतीत आपल्यावर वारंवार अन्याय केला, असा आरोप मेरी कोमने जाहीररीत्या प्रसारमाध्यमांतून केला होता. पण या कटू प्रसंगाचा उल्लेख दोन्ही चरित्रपटांत दिसत नाही.
भारतीय दिग्दर्शकांनी चोखाळलेली अजून एक चोरवाट म्हणजे, एखाद्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवायचा; पण ‘ऑन पेपर’ किंवा अधिकृतरीत्या कधीही तसं कबूल करायचं नाही. ‘द डर्टी पिक्चर’ किंवा ‘गुरू’ ही काही उदाहरणं. ‘द डर्टी पिक्चर’ हा वादग्रस्त अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित होता, तर ‘गुरू’ हा चित्रपट धीरूभाई अंबानींच्या आयुष्यावर बेतलेला होता, असं म्हणतात. निर्माता-दिग्दर्शकांनी तसं अधिकृतरीत्या कबूल न करण्यामागे कायदेशीर कारणं असू शकतात, जसं की ज्याच्या आयुष्यावर चित्रपट बनत आहे, त्याच्या कुटुंबीयांकडून परवानगी न मिळणे वगैरे वगैरे. नुकताच अनुराग बसूला किशोरकुमारच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार यामुळेच सोडून द्यावा लागला. मीनाकुमारीच्या आयुष्यावर बनणारा बायोपिक पण त्यामुळेच बारगळला. धीरूभाई अंबानी यांनी आपलं उद्योगसाम्राज्य उभारताना व्यवस्थेला अनेकदा हवं तसं वाकवलं, हा इतिहास आहे. पण पडद्यावर असं दाखवणं धीरूभाई अंबानी यांच्या वारसदारांना रुचलं नसतं, हेही उघडच आहे आणि पाण्यात राहून माशाशी वैर कसं करायचं, हा प्रश्न दिग्दर्शक मणीरत्नम समोर पडला नसेलच, असंही नाही. शिवाय, याला आपल्या भंपक सांस्कृतिक दुटप्पीपणाची पण एक बाजू आहे. धीरूभाई ‘तेरे बिन बेसुवादी दुनिया’ या गाण्यावर नाचत आहेत, प्रणय करत आहेत, हे पडद्यावर कसं दाखवायचं? आणि नाच आणि गाण्यांशिवाय तर आपला चित्रपट पूर्ण होत नाही. मग काय करायचं? तर धीरूभाईंचं संहितेमध्ये ‘गुरूभाई’ करून टाकायचं. सगळे प्रश्न एका झटक्यात सुटणार. आपले निर्माते आणि दिग्दर्शकांचा हा ‘जुगाडू’ स्वभाव, चांगला बायोपिक बनण्याच्या आड येत राहतो. पण आपल्याकडे काही चांगले बायोपिक्स पण बनले आहेतच. फुलनदेवीच्या आयुष्यावर आधारित ‘बँडिट क्वीन’, हंसल मेहताचा एका वकिलाच्या आयुष्यावर आधारित ‘शाहिद’ किंवा ‘पानसिंग तोमर’ ही काही चांगल्या बायोपिकची उदाहरणं. दिग्दर्शक विषयाशी किंवा इतिहासाशी प्रामाणिक राहिला तर तो चांगला चरित्रपट बनवू शकतो, हा नियम वरील चित्रपट अधोरेखित करतात. शेवटी दिग्दर्शक हाच चित्रपटाचा कर्ताधर्ता असतो. शेखर कपूर, हंसल मेहता किंवा तीग्मांशु धुलिया ही मंडळी त्यांच्या कुठल्याही चित्रपटाच्या विषयावर सखोल रिसर्च करतात, जो कुठल्याही चरित्रपटासाठी अत्यावश्यक असतो आणि हे लोक मध्यवर्ती व्यक्तिरेखेचे भलेबुरे ‘ट्रेट्स’ दाखवताना कुणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. त्यामुळे यांच्या चित्रपटामधल्या व्यक्तिरेखा ‘लार्जर दॅन लाइफ’ न बनता अधिक मानवीय पातळीवर राहतात. आणि त्यामुळेच त्यांनी बनवलेले बायोपिक्स बाकीच्या भारतीय बायोपिक्सपेक्षा वेगळे ठरतात. सध्या अनेक बायोपिक्स बनत आहेत. राजकुमार हिरानींसारखा दिग्गज संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवत आहे. पाकिस्तानी जेलमध्ये मरण पावलेल्या सरबजीत सिंगच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘धोनी - द अनटोल्ड स्टोरी’चे प्रोमोज दिसायला पण लागले आहेत. बायोपिक्सचा सुगीचा हंगाम आहे. फक्त ही वाढ गुणात्मक असावी, सूज नसावी...
amoludgirkar@gmail.com