आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून हरलेले नाही मी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसणारी ही गोष्ट आहे ज्योती रेड्डी यांची. हैदराबादच्या वरंगळ गावातल्या गरीब कुटुंबातल्या ज्योती या पाच बहिणींमध्ये सर्वात लहान. परिस्थितीमुळे त्यांच्या पालकांनी ज्योती यांना अनाथालयात ठेवले. कष्टात गेलेल्या इथल्या दिवसांनी ज्योती यांचं आयुष्य बदललं. सरकारी शाळेत शिक्षण, व्यावसायिक कोर्स, अनाथालयाच्या संचालिकेला घरकाम-कार्यालयीन मदत करत केलेली दहावी, वयानं मोठ्या पुरुषाशी विवाह, अठराव्या वर्षी पडलेली दोन मुलांची जबाबदारी, नेहरू युवा केंद्रात मिळालेली शिक्षिकेची नोकरी, मुक्त विद्यापीठातून मिळवलेली कला क्षेत्रातली पदवी, पदव्युत्तर पदवी, संगणक प्रशिक्षण अशा पायऱ्या चढत एक दिवस नात्यातल्या व्यक्तीकडून त्यांना अमेरिकेतल्या संधीविषयी कळले. मुलींना हॉस्टेलवर ठेवून त्यांनी अमेरिका गाठली. तिथंही बेबी सिटर, व्हिडीओ स्टेशन, गॅस स्टेशन या ठिकाणी अर्धवेळ काम करतानाच बचत गुंतवून त्यांनी KEYSS कंपनी सुरू केली. आपल्या मुलींनाही त्यांनी अमेरिकेत बोलवून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. तीन कर्मचाऱ्यांसोबत सुरू केलेल्या त्यांच्या कंपनीत आज शंभराहून जास्त लोक काम करतात. अनाथालयातल्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि इतर मदत करण्यासाठी ज्योती एनजीओमार्फत काम करत आहेत.
© Amrita Bharati