वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर...
ती शोधत होती स्वतःला, पण तिलाच ती सापडत नव्हती. तिच्या बिनघराच्या भिंतींकडे ती आशेने पाहत होती. तिच्या मनातली स्वप्नं तिनं या भिंतींना सांगितली होती. भिंत मात्र नेहमीप्रमाणे ढिम्म होती. भावनाहीन आणि आशाहीन. भिंतीला दोन बाजू होत्या. पलीकडची आणि अलीकडची बाजू. तिची अलीकडची बाजू होती. तिच्या घरात भिंती सोडून दुसरं काहीही नव्हतं. तिच्या घराच्या भिंती तिच्याशी बोलतात. तिचं एकटेपण तिला त्या भिंतींमध्ये दिसून येत., फोफडे आलेल्या भिंती तिचे शब्द ऐकतात आणि त्यांच्यामध्ये सामावून घेतात. तिला तिच्या जगण्याचा आधार मिळालाय. त्या भिंतींना तो ती सांगते आणि तिचं स्वतःचं जगणं ती चाचपडत बसते...
भिंतीला कळतंय तिचं एकटेपण. भिंतीचे कान मात्र तीक्ष्ण. तिला पलीकडचे आणि अलीकडच्या दोन्ही माणसांचे मन समजतेय. ती निर्जीव दिसली तरी निर्जीव नाही. जिवंत आहे. तिला डोळे नसले तरी कान आहेत. तिला जिव्हा नसली तरी स्पर्शज्ञान आहे. कारण माणसांच्या घराचा ती अविभाज्य असा भाग आहे. तिला न उंचवटा, ना चढ, ती एक सरळ, अतिशय सरळ आणि ताठ पृष्ठभाग असलेली भिंत.
तिच्या अलीकडे एकच माणूस आहे, तर पलीकडे एक मोठं, पण अबोल असलेलं कुटुंब. त्या कुटुंबात सहा माणसं. त्यात दोन नर आणि चार माद्या. त्या माद्या आणि नर एकमेकांशी फार बोलत नाहीत. पण एकत्र राहतात. भिंतीला ते सहा जण कधी एकत्र आलेत हे दिसत नाही. कारण तिला डोळे नाही, पण तिच्या कानांना त्या सहा जणांचा एकत्रितपणे कधी आवाज ऐकू येत नाही. सहा माणसांची मनं भलतीकडेच आहेत आणि भिंत मात्र त्यांच्याही एकटेपणाची एक निमूट साक्षीदार आहे.
अलीकडे एक स्त्री एकटीच राहते. तिचं आणि भिंतीचं नातं अचाट आहे. ती स्त्री या भिंतीशी बोलते कारण तिला बोलायला कुणी नाही. ती तिचा राग, लोभ, वासना, प्रेम, नाराजी, एकटेपण, नसलेपण सारं काही या भिंतीला सांगते आणि वाट पाहते तिच्याकडून काही प्रतिक्रिया येण्याची. तिनं भिंतीला एक फ्रेम लावली आहे. त्या फ्रेमच्या जवळ येऊन ती काय काय बडबडत असते.
पलीकडून एक छोटी मुलगी मात्र भिंतीला स्पर्श करते. रंगीत पेन्सिल घेऊन भिंतीवर जेव्हा ओरखडे काढते तेव्हा भिंतीला गुदगुल्या होतात. त्या सहा माणसांमधला हा इवलासा जीवच काय, ते भिंतीशी नाते ठेवू पाहतोय. ती चिमुरडी भिंतीवर फूल काढते, रेघोट्या ओढते, स्वतःचे नाव ‘कमल' असं लिहिते आणि कधी कधी भिंतीवर डोकंसुद्धा आपटते. अलीकडची आणि पलीकडची मुलगी. दोघींमध्ये एकच साम्य आहे त्यांच्या मुलगी असण्याचं. त्या दोघींच्या वयामध्ये बराच फरक आहे. पण दोघीही माद्या आहेत. अलीकडची मुलगी भिंतीवर लावलेल्या फ्रेमच्या पाया पडते, त्याच्याशी बोलते. पण प्रत्यक्ष ती त्या भिंतीशीच बोलतेय हे मात्र तिला कळत नाही. भिंत स्वतः एक दगड-विटांचा आकार असेलेली निर्जीव. सरळ पृष्ठभाग. भिंतीला स्वतःवर टांगलेल्या फ्रेम्स दिसत नाहीत. स्वतःवर मारलेल्या रेघोट्या दिसत नाहीत, पण स्पर्शानं तिला त्या कळतात.
भिंतीचं विश्व त्या अलीकडच्या आणि पलीकडच्या माणसांमध्ये व्यापलेलं आहे. तिला त्यांना आधार द्यायचाय. एका भिंतीनं बनलेली ही घरं आणि त्यातली माणसं समजून घेणं किती अवघड काम आहे हे तिला कळतंय.
एकदा पलीकडच्या घरात एक दु:खद घटना घडली. सहा माणसांपैकी फक्त दोनच माणसं उरली. भिंतीवर चार फ्रेमा ओळीनं लागल्या. तिच्यावरच्या रेघोट्या कायमच्या बंद झाल्या. तिला फक्त ऐकू येत होतं. कारण तिला कान होते. तिला दोनच माणसांचा स्पर्श होत होता. त्या फ्रेम्स पाशी येऊन ती दोन माणसं रोज उभी राहत होती.
अलीकडे आणि पलीकडे एकच निराशेची अवस्था. स्पर्शातून कळणारा एकटेपणा अधिकच गडद वाटू लागला. भिंतीचं विश्वच एकल झालं. तिच्यावर रेघोट्या मारणारी, डोकं फोडणारी तिला कधी अनुभवताच आली नाही.
अलीकडची पण अबोल, पलीकडचे पण अबोल. एक उदास छाया त्या दोन्ही घरांवर आदळली. भिंत आता फक्त तिचं काम करू लागली. घरातली जिवंत माणसं गेली म्हणजे काय होतं? एक पोकळी निर्माण होते आणि अबोल्याचे शांततेत रूपांतर होते.
माणसं येतात, जातात आणि आपल्या पाउलखुणा, आपल्या जाणिवा सोडतात. जगातली त्यांच्या निघून जाण्याची जी भेद्य अशी मालिका आहे ती कुणीच थांबवू शकत नाही. जे निर्माण होतं ते कधीतरी नष्ट होतं आणि जे नष्ट होतं ते वेगळ्या रूपात निर्माण होतं. हे कदाचित जगण्याचं सत्य असावं असं आता त्या भिंतीला अलीकडे वाटू लागलंय.
अलीकडच्या बाईचंही शोधणं सुरूय, स्वतःला आणि तिच्या जगण्याला. पलीकडचे दोन जीव जगतायत. कधी अबोल, तर कधी बोलकं होऊन. पण चौघांच्या आठवणी त्यांनी भिंतीवर टांगल्यात. भिंतीला ते ओझं वाटत नाही. माणसानं उभी केलेली ती भिंत मात्र उभी आहे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची लक्तरं घेऊन. अखंड. कधीतरी तीसुद्धा नष्ट होऊ शकते या एका असीम भावनेनं. भिंत तिच्या जागेवर उभी आहे आपलं काम करत, पलीकडच्या आणि अलीकडच्या माणसांना अनुभवत...
- अमृता देसरडा , amrutadesarda@gmail.com