आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला हवी माईसारखी सासू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की, मालिकांमुळे समाज घडूही शकतो आणि बिघडूही शकतो. मालिकांमध्ये घडणारे काहीसे क्षण आपण आपल्यामध्ये शोधत असतो. खरं तर समाजात जे घडतं तसं मालिकांमध्ये दाखवलं जातं. मालिकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावरून आपण कशी प्रतिक्रिया देतो, हे ठरत असतं. या मालिकांकडे मनोरंजनाचा एक भाग म्हणून बघितलं तर फारसा काही फरक पडत नाही. पण, जर तोच भाग आपण आपल्या जीवनाशी जोडतो तेव्हा दु:खाच्या प्रसंगी आपल्याही डोळ्यातून अश्रू येतात, आनंदाच्या क्षणी आपणही आनंदी होतो.
गेल्या दहाबारा वर्षांपासूनच्या मालिका आपण पाहिल्या तर एकच चित्र उभं राहतं. घरात सतत भांडणा-या सासू-सुना, एकमेकांविरुद्ध षड्यंत्र रचणारे कुटुंबातील सदस्य, छळ सहन करणारी सून, भडक मेकअप, खलनायिकेच्या कपाळावर असलेल्या भल्यामोठ्या नक्षीदार टिकल्या, नायक-नायिकेचे दोन ते तीन वेळा झालेले विवाह किंवा विवाहबाह्य संबंध, मेल्यानंतर काही वर्षांनी अचानक उगवलेले नायक-नायिका, उगाच चेह-यावर तीन वेळा फिरवलेला कॅमेरा. अतिशय कॉम्प्लिकेटेड अशा या मालिकांचं स्वरूप होतं. एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होता. याचा वाईट प्रभाव प्रेक्षक महिलांवर जास्त होत होता. विशेषकरून सासू-सुनांच्या नात्यामध्ये. तो कदाचित काही कुटुंबांमध्ये जाणवलंदेखील असेल.


सध्याच्या मराठी मालिकांवर एक नजर टाकली तर असं दिसतं की, हळूहळू मालिकांचा ट्रेंड बदलला आहे. फक्त सासू-सुनांवर आधारित मालिका न राहता वेगवेगळ्या विषयांना हात घातला जातोय. सध्याच्या या मालिकांमध्ये मित्रत्वाचं नातं दाखवलं जातंय. विशेषत: सासू-सुनांमधील नातं अगदी बदललं आहे. अगोदर दाखवली जाणारी सतत छळ करणारी सासू आता मवाळ, मैत्रिणीसारखीच, आईच झाली आहे. मालिकांवर जो महिलाराज होता त्यात आता पुरुषांनादेखील स्थान मिळालंय.


मित्रासारखा प्रेमळ, समजूतदार नवरा दाखवला जातोय. चेष्टामस्करी करणारं, हसतखेळत शिस्त पाळणारं कुटुंब बघायला मिळतंय. जसा मालिकांमधल्या पात्रांमधील नात्यात बदल झालाय, तसाच तो त्यांच्या कथानकामध्येही झालाय. कथानक साधं, सरळ आणि सुटसुटीत झालंय. त्यात कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही. ज्या प्रकारे प्रत्येक सामान्य घराघरात रोजचं रुटीन असतं तसंच ते दाखवलं जातंय. त्यामुळे ते पाहणा-याच्या मनाला पटतंदेखील आणि त्यांना हवंहवंसं वाटतं.
सध्याच्या पेहरावातही बदल झाला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा चमचमाट, लखलखाट राहिलेला नाही. तो अगदी साधा झाला आहे. मेकअपसुद्धा भडक राहिलेला नाही. एकूण काय, तर मालिकांचा लुकच एकदम हलकाफुलका झाला आहे.


यामुळे झालंय असं की, मालिकांचा प्रेक्षकही महिलांपुरता सीमित न राहता त्यात तरुण मुलांचा आणि पुरुषांचा समावेश झाला आहे. त्यांच्या विषयांमध्ये आता घना-राधा, जान्हवी-श्री, आदित्य-मेघना, ओम-ईशा यांच्या चर्चादेखील होत असतात. विशेष म्हणजे, या मालिकांमुळे तरुणींच्या आपल्या भावी नव-याकडून आणि सासरकडून अपेक्षा वाढत आहेत. याचं एक उदाहरण सांगते. एक मुलींचा घोळका बसस्टॉपवर उभा होता. त्यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या मराठी मालिकांबद्दल चर्चा चालू होती. ‘अदिती, तुला म्हणे एक स्थळ आलं आहे. मग तू काय विचार केलाय?’ अदिती - ‘बघूयात गं अजून काही खरं नाही.’ अर्चना - ‘ए अदिती, तू अरेंज मॅरेज करणार आहेस का?’ अदिती - ‘हो, ए पण ना रिअली सांगते, मला त्या ‘जुळून येती रेशीम गाठी’मधल्या आदित्यसारखा एकदम समजूतदार मुलगा हवाय यार.’ अर्चना - ‘मला ना त्या श्री किंवा ओमसारखं कुणी तरी प्रपोज करायला हवं. मी तर लगेच हो म्हणेन.’ पूजा - ‘अगं, सगळ्यांचं म्हणणं ठीक आहे; पण मग सासूचं काय? मग तीसुद्धा तुम्हाला मेघनाच्या सासूसारखीच हवी असेल मवाळ, प्रेमळ.’ (हसत एकमेकींना टाळ्या देतात.)
नक्कीच ही मुलींची अशी चर्चा ऐकल्यानंतर असंच लक्षात येतं, की या मालिकांचा किती आणि कसा प्रभाव समाजावर पडतो. याचाच एक हा परिणाम की, आजच्या मुलींच्या आपल्या भावी नव-याकडून आणि सासरकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर मुलांनो, आपल्या होणा-या बायकोच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर त्या लक्षात घेऊन प्रेमाने झेलायला सज्ज व्हा!


amrutagholap3@gmail.com