आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलरींचे वाण द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपुलाचि वाद आपणाशी’ सुरू होतो कधी? तर वय पस्तिशीत अन् वजन साठीत गेल्यावर. वजनाचा काटा साठापलीकडे सरकला, की उठताबसता कमरेचा काटा ढिला व्हायला लागतो. ‘आपुलाचि भार आपणासी...’ पेलवेनासा झाला, की विशीत आपण कशा चवळीची शेंग होतो हे आठवून जीव कासावीस व्हायला लागतो. मग पावलं जिमकडे वळतात. जिम मारून आलं, की पोटातला भुकेचा केविलवाणा कावळा अन्नब्रह्माकडे वळायला लावतो. सॅलड, ज्यूस,
लो-कॅल पावडरी, बिनागोडाचा चहा असलं खाऊनही तो मरत तर नाहीच, जास्तच टवटवीत होऊन कावकाव करू लागतो.

माझ्या शरीराला अन्नाची आवश्यकता किती? आणि मी खातेय किती? आता सूर्याचं उत्तरायण सुरू होईल. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत दान करणं म्हणजे महापुण्य! हळदीकुंकू करून निरुपयोगी वस्तू वाण म्हणून वाटण्यापेक्षा जरासं नवीन वाण वाटूया. थोडं कॅलरी-वाटप करूया. माझ्या शरीराला भार होणाऱ्या कॅलरी मी एखाद्या गरिबाच्या लेकराला देईन, असं ठरवूया. जोपर्यंत वजन पन्नाशीत येत नाही तोपर्यंत आपल्याला खाव्या-खाव्याशा
वाटणाऱ्या सर्व कॅलरीसंपन्न वस्तू गरजूंना दान करणे म्हणजेच कॅलरीदान! रस्त्यावरच्या गरीब व्यक्तीला पाणीपुरी, चाट खाऊ घाला. कामवालीला श्रीखंडाचा पॅक द्या. अनाथाश्रमात किलोभर गोडेतेल द्या. डोळे उघडून पाहाल तर जगात सर्वत्र दरिद्रीनारायण नाना रूपांनी फिरतो आहे. सरकारी दवाखान्यातल्या एकाकी पेशंटला घरचा डबा नेऊन खाऊ घातलाय का
कधी? हॉटेलातल्या वेटरच्या मनाचा विचार केलाय कधी? महाग-महाग डिशेसच्या ऑर्डर पुरवताना त्याच्या पोटात उसळलेला भुकेचा आगडोंब कधी जाणून घेतलाय का? त्याच्यासााठीच एक छानशी डिश ऑर्डर करा. प्रिय वाचक मैत्रिणींनो, समाजासाठी केअरिंग आणि शेअरिंग करूया. कॅलरी वाटप करूया आणि हलक्या होऊन सुखाने जगूया.