आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरएक माल का मॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठमोठ्या शहरांमधून आजकाल मॉल्सची संख्या खूप वाढली आहे. अगदी निम्न मध्यमवर्गातील व्यक्तीही खरेदीसाठी मॉलला पसंती देताना दिसतात. ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस बाजार भरतो. एरवी काही घ्यायचं असेल तर बाजारपेठेत इतर दुकाने असतात. पण गावापासून दूर राहात असलेल्या स्त्रियांना गावात जाणं सहज शक्य नसतं, रस्ते चांगले नसतात, वाहनं उपलब्ध नसतात. अशा महिलावर्गाचा सच्चा मित्र म्हणजे ‘हरएक मालवाला.’
चारचाकी हातगाडीवर बांगडीपासून बादलीपर्यंत सर्व वस्तू रचून गल्लीगल्लीत, वस्तीवस्तीत फिरणारा ‘फिरस्ता मॉलवाला’ म्हणजे हरएक मालवाला. चहाची गाळणी, पाणी गाळायचं गाळणं, परकराच्या नाड्या, मोरण्या, तोरणं, खेळणी, लहान-लहान भांडी, उन्हाळ्यात वापरायचा हातपंखा, रॉकेलची नरसाळी, पिठाच्या चाळण्या, पोती, मणी, सुया-दोरे, माळा, बकलं, आरसे, चिमण्या, करदोडे, घासण्या, चोखण्या, रबरं, पदकं, खडे... काय अन् काय... त्याच्या चार बाय तीनच्या हातगाडीवर इतक्या आदबशीरपणे वस्तू रचलेल्या असतात की सगळ्या वस्तू आपोआप नजरेत भरल्या पाहिजेत.
एखादी गृहिणी जशी स्वयंपाकघरातल्या वस्तू सुबकपणे लावते त्याच कुशलतेनं हरएक मालवाला आपली गाडी सजवतो. गाडीवर ठेवलेल्या मालाव्यतिरिक्त लाकडी धोपटण्या, चांदणीच्या आकाराची हँगर्स, माठाखाली ठेवायच्या तिवया अशा जाडजूड वस्तू गाडीच्या खाली एक सामानाचा कप्पा असतो त्यात ठेवलेल्या असतात. एक जोरदार हाक हरएऽक मालवालाऽ हा आवाज कानावर पडला, की बायकांना गरजेच्या वस्तू पटापट आठवू लागतात. पैशाची पर्स घेऊन वेटाळातल्या बाया त्याच्या भोवती जमा होतात. एखाद्या नव्या नवरीला नाजूक खड्याच्या पदकावालं मंगळसूत्र पाहिजे असतं, एखादीला चंद्रकोरीच्या टिकल्या. एखादीच्या मागणीची वस्तू नसेल तर हरएक मालवाला पुढच्या चकरीला नक्की आठवणीनं घेऊन येतो. मेंदीचा कोन, हळदीकुंकवाची कोयरी, खराटा, उदबत्तीचं घर, पंचपाळं असल्या गोष्टींचं महत्त्व पुरुषांना समजत नाही; कारण याच्यावाचून त्यांचं काहीच अडत नाही. पण मोरी घासायला ब्रश किंवा भांड्याची घासणी नसली तर किती पंचाईत होते, ते बायकांनाच समजतं. या गोष्टी फालतू वाटत असल्यामुळं पुरुष बाजारातून आणून देत नाहीत. मग बायकांना आठवतो आपला सच्चा दोस्त. या असल्या सगळ्या गोष्टी घरपोच आणून देणारा हरएक मालवाला.
आपण पाच रुपयांच्या टिकल्या घ्यायला गेलो तरी फक्त तेवढ्याच घेऊ याची शाश्वती नसते. माल पाहताना नवीन काहीतरी आवडतं, शेजारणीनं घेतलेली एखादी वस्तू आपल्यालाही हवीशी वाटते. मग सारं काही घेतलं जातं.
हरएक मालवाला एखादं कानातलं, गळ्यातलं घालून पाहायला सांगतो. पटकन आरसा समोर धरतो. अन् आपल्या सावळ्या चेह-यावरची उठावदार जांभळी टिकली, मिन्याचं कानातलं, नाकात झकाक चमकणारा पांढरा खडा अन् गळ्यातला मोत्याचा नाजूक सर... आम्ही बायका सुंदर दिसण्याची एक तरी संधी सोडू काय? नवरा म्हणतो, ‘फालतू काहीही घेत बसू नको. गरजेचं काय ते घे.’ आता यांना काय सांगावं, की सुंदर दिसणं हीच आमची गरज आहे. आणि हौसेला मोल नसतं हे हरएक मालवाल्याला बरोबर माहीत आहे.
kbuddharaj@rediffmail.com