आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीज अंकुरे अंकुरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी यवतमाळमध्ये राहते. हा जिल्हा जंगलसमृद्ध प्रदेश आहे. यवतमाळ शहर आजही दाट जंगलांनी वेढलेले आहे. यवतमाळात आदिवासी वस्त्या, पाडे, ग्रामीण भागात राहणारा गरीब आणि अशिक्षित वर्ग मोठा आहे. या लोकांकडे उत्पन्नाचे साधन नाही. शिक्षण कमी. त्यामुळे जळणासाठी ते जंगलातील लाकडे तोडून आणतात. यात महिलांची संख्या मोठी असते. डोक्यावर सरपणाचे भारे घेऊन जाणा-या स्त्रिया आणि लहान मुले हे रोजचेच दृश्य आहे. जंगलवाटेने सायकलवर मोळ्या बांधून नेणारी माणसे दर शंभर-दीडशे फुटांवर दिसतात. मानवी हातांनी होणा-या या लाकूडतोडीपेक्षा अधिक हानी पोहोचवणारा गंभीर भाग म्हणजे जंगलातल्या कृत्रिम आगी. ही आग लावली जाते तस्कर वा भूखंड लाटू इच्छिणा-यांकडून आणि सांगितली जाते नैसर्गिक वणवा म्हणून. स्वार्थासाठी. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

सगळीकडे हीच परिस्थिती आहे, जंगलं कमी होतायत, पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. मग या होरपळणा-या वसुंधरेला वाचवायचं कसं? त्यासाठी एक छोटंसं, निश्चित आणि सकारात्मक पाऊल म्हणजे ‘सीडबॉल’ किंवा ‘बीजगोल तंत्रज्ञान.’

आपण वर्षभर वेगवेगळी फळं खातो. त्याच्या बिया कच-यात फेकून देतो. तसेच ग्रामीण भागात कडुलिंबाच्या निंबोळ्या, रिठ्याच्या व बिट्टीच्या बिया, चिंचोके, कोया, बाभळीच्या बिया मुबलक प्रमाणात सापडतात. जेवढ्या आणि जितक्या प्रकारच्या बिया जमा करता येतील तितक्या कराव्यात. या वाळवून एखाद्या खोक्यात, टोपल्यात किंवा जुन्या माठात साठवून ठेवाव्यात. रानातली माती आणि मिळाल्यास वाळलेले शेण यांच्या मिश्रणात या बिया मिसळाव्यात. त्यात पाणी घालून त्याचे मोठमोठे लाडू करून ठेवावेत. लाडू तयार करताना त्यामध्ये चुलीतली राख, फेकलेली चहापत्ती, वाळलेला पालापाचोळा मिसळला तर अधिक फायदा होतो. हे लाडू कडक वाळवून घ्यावेत व कोरड्या जागी साठवून ठेवावेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर गावाबाहेरील द-या, टेकड्या, खोलगट व पाणथळ जागा, डोंगर, नदीनाल्याच्या आसपासचा परिसर येथे जाऊन हे लाडू फेकून द्यावेत. लाडवाला पाणी लागल्यानंतर आतील बिया रुजतात, कारण त्या माती आणि सेंद्रिय खताने गुंडाळलेल्या असतात. नुसत्या बिया टाकल्या तर त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ शकतात किंवा जास्त पाण्यामुळे कधी-कधी कुजून वाया जातात. सीडबॉलमधल्या बिया शंभरात चाळीस ते पन्नास इतक्या प्रमाणात रुजतात व झाडांचे प्रमाण वेगाने वाढण्यास मदत होते. एक-एक झाड लावून ते वाढवणे, त्याला पाणी देऊन त्याची निगा राखणे मोठे कठीण असते; परंतु सीडबॉल तंत्रात आपण बीजांना निसर्गाच्या स्वाधीन करतो. मनुष्यापेक्षा निसर्गाची शक्ती फार मोठी आहे. म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर जंगले टिकून आहेत. धरती तिच्या कुशीत पडलेल्या बीजाची रुजवण आणि संगोपन करते. फक्त योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने या बिया टाकल्या गेल्या पाहिजेत.

हा सुंदर आणि उपयुक्त प्रयोग मी अहमदनगरच्या ज्या रामकृष्ण फाउंडेशन शाळेत शिकवत होते, तेथील प्राचार्य कुंदा हळबे यांनी 2000 मध्ये शिकवला. आम्ही हजारो विद्यार्थी सोबत घेऊन हा उपक्रम करत होतो. उन्हाळ्याच्या सुटीत फळांच्या बिया जमा करणे आणि शाळा सुरू होताच पहिल्या आठवड्यात शाळेत आणून जमा करणे असा सुटीतला मजेदार गृहपाठ हळबे मॅडम विद्यार्थ्यांना देत असत. या पद्धतीने शाळेत पोत्याने बिया जमा होत. शेतातली माती आणली जाई. शिक्षक, विद्यार्थी आणि शिपाई सर्व जण मिळून हे लाडू बनवत. लाडू वाळून तयार झाल्यानंतर एसटी बसेस भाड्याने आणल्या जात. सर्व शाळा लाडू घेऊन पिकनिकला निघे. गाणी, वनभोजन, खेळ आणि मग सर्वत्र लाडूंची फेकाफेक. मुलांना हा खेळच वाटे.

आपण सामाजिक वनीकरणाचे फार मोठे काम करत आहोत असे कधी वाटले नाही. हसत खेळत आम्ही हजारो-लाखो बिया निसर्गमातेच्या कुशीत टाकून येत असू. या प्रचंड उठाठेवीमागचं प्रेरणास्थान आणि बलस्थान म्हणजे उत्साहमूर्ती, शिक्षणतज्ज्ञ कुंदा हळबे. कृतीतून शिक्षण हा त्यांचा मूलमंत्र. हजारो मुलांवर निसर्गप्रेमाचे मूल्य बिंबवण्याचे काम या एका कृतीतून त्यांनी केले.
नगरहून इकडे विदर्भात आल्यानंतर इथली प्रचंड जंगलतोड पाहून मन हताश, उदास झाले. मला हळबे मॅडमनी शिकवलेला प्रयोग आठवला. मी शाळा-शाळांना आवाहन केलं. शाळेत जाऊन शिक्षकांना समजावून सांगितलं. माझ्या मुलाने हा प्रयोग विज्ञान प्रदर्शनात सादर केला. त्याची जिल्हापातळीवर निवड झाली. आम्हाला अनेक शिक्षक माहिती विचारू लागले. झपाट्याने काम सुरू झाले. येत्या जूनमध्ये वीसेक शाळांनी हा प्रयोग करण्याचे मान्य केले आहे. कुठलीही शासकीय मदत नसताना फक्त इच्छाशक्तीच्या बळावर एक माणूस कितीही मोठे काम करू शकतो, याचे हे उदाहरण आहे. मी व्यावसायिक प्रशिक्षण नसताना केवळ पदवीपर्यंत शिक्षण घेऊन कुंदा हळबेंच्या सोबत काम करू लागले. एक दिवस त्या म्हणाल्या, ‘हे बघ, हा फळा संपूर्ण काळा आहे आणि हा छोटासा खडूचा तुकडा आहे. जितकं जमेल तितकं आपण पांढरं करू. सगळा अंधार तर नष्ट होणार नाही, पण निदान काही पांढरा नक्कीच काळ्याचा प्रभाव कमी करेल.’

माझ्यासारख्या अनेक गरीब, गरजू, अप्रशिक्षित मुलींना सोबत घेऊन त्यांनी हजारो बीजे आमच्या झोळीत टाकली. त्या बीजांचे वृक्ष महाराष्ट्रभर विखुरले आहेत. अनुराधा, सुषमा, निशा, शालिनी, जस्मिन, संपदा, अंजना, डेव्हिड, हेमंत, लोळगे, मुरकुटे, ऊर्मिला, सबिहा... आम्ही हळबे मॅडमची लेकरे आहोत. त्यांनी रुजवलेली मूल्ये पिकून त्याला रसाळ फळे आली आहेत. त्याच बिया पुन्हा रुजवण्याचे काम अखंड चालत राहील.

पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करताना वाटेत जंगलाचा परिसर दिसायचा. जंगलात वाढलेली ही झाडं कोणीही लावत नाही. मात्र, तरीही ही झाडं आपोआपच वाढतात. हे लक्षात आल्यानंतर झाडं लावण्यासाठी काय-काय करता येईल याचा विचार केला तेव्हा सीडबॉलच्या प्रयोगाची सुरुवात केली. शिवाय परदेशातही असा प्रयोग केला जातो हे समजलं. शाळेत मुख्याध्यापिका असताना हजारो विद्यार्थ्यांच्या मदतीने या प्रयोगाला सुरुवात केली. स्थानिक शाळांसह अनेक पालकांनीही सक्रिय पाठिंबा दिला.-कुंदा हळबे, निवृत्त मुख्याध्यापिका