आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना दिली नवी दिशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना शिकवण्याची, अभ्यास करून घेण्याची वेगवेगळी तंत्रं असतात, ती आत्मसात करून अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्रिया कशा आनंददायी होऊ शकतात, ते शिकवणाऱ्या शिक्षिकेविषयीचा हा लेख.

“मॅडम, मुलं गृहपाठच करत नाहीत. मराठी विषय त्यांना अजिबात आवडत नाही,” अशी तक्रार घेऊन मी शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे गेले. मॅडमनी मी दिलेले गृहपाठ पाहिले. एका वाक्यात उत्तरे, गाळलेल्या जागा, जोड्या जुळवा, सर्वनामे ओळखा, क्रियापदे अधोरेखित करा, इ. इ. “ठीक आहे. आता मी तुला गृहपाठ देण्याच्या काही नवीन पद्धती सांगते.” मग त्यांनी असे गृहपाठ बनवले.

१. मराठी वृत्तपत्रातली पहिल्या पानावरची कुठलीही एक बातमी कापून वहीत चिकटवा. त्या बातमीतल्या सर्व क्रियापदांना हिरव्या पेनाने अधोरेखित करा.
२.सर्वनामे असलेली दहा मराठी नाटक आणि सिनेमांची नावे शोधून लिहा. उदा. ‘तो मी नव्हेच.’ त्यातील सर्वनामांना गोल करा.
३.दहा मराठी गाणी शोधून त्यांची एक-एक ओळ लिहा. त्यातील नामे ओळखा व निळ्या पेनाने अधोरेखित करा.

त्यानंतर जवळपास सर्व मुले आनंदाने गृहपाठ करू लागली. एकतर त्यांचा लिहिण्याचा त्रास वाचला होता. फक्त वेगवेगळ्या रंगांनी शब्द अधोरेखित करायचे होते; जे भाराभर लिखाणापेक्षा त्यांना सोपे वाटले. मग हीच युक्ती हिंदी या विषयासाठी पण अमलात आणली गेली. या उद्योगातून मुले वृत्तपत्रे उघडून वाचू लागली. आपापल्या आई-बाबांना जुनी मराठी-हिंदी गाणी विचारू लागली. आपापसात मराठी-हिंदी वृत्तपत्रांच्या कात्रणांची देव-घेव सुरू झाली. यात एका मुलाने एकाच ओळीत पाच सर्वनामे शोधून काढली होती. ते गाणं होतं किशोर कुमारने गायलेलं... ‘मैने देखा, तूने देखा, इसने देखा, उसने देखा, सबने देखा... क्या देखा...’

यानंतर आम्ही विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय इ. सर्व शब्दांच्या जाती अशाच शिकवल्या. लहान मुलांच्या बोल्ड टाइपातल्या पुस्तकांमधून पानांच्या झेरॉक्स काढणे आणि रंगीत पेनांनी एक-एक प्रकाराला अधोरेखित करणे.

विज्ञानाचा ‘पाणी’ हा धडा शिकवताना मॅडमनी मुलांना घरून येताना साबण, मळके मोजे आणि रुमाल आणायला सांगितले. शाळेच्या मागील नळावर सर्वांनी आपापले मोजे धुतले आणि कुंपणाच्या तारांवर वाळायला टाकले आता. पाणी काय काम करते?  पाण्याचे उपयोग? पाण्यात साबण विरघळतो म्हणून ते उत्तम द्रावक आहे. मग ओले कपडे वाळायला घातल्यानंतर त्यातले पाणी कुठे जाते? अशा अनेक गोष्टींची चर्चा करत हा पाच पानी धडा दोन तासांत उत्तम रीतीने संपला. वर्गात बसून फळ्यावर शिकताना इतकी मजाही आली नसती आणि एवढं शेअरिंगही झालं नसतं.

एकदा त्या घरून शाळेत यायला निघाल्या आणि रस्त्यात त्यांना उंटवाले दिसले. दोन तासांसाठी त्यांनी उंटवाल्यांना शाळेत आणले. उंट कसा दिसतो? तो उंच झाडांचा पाला कसा खातो? उंटाची ‘मदार’ कोठे असते? त्याला वाळवंटातील जहाज का म्हणतात? तो पोटात पाणी साठवून ठेवतो, ओझी वाहतो, या सर्व गोष्टी सर्व शाळेला त्या दोन तासांत एका दमाने शिकायला (अनुभवायला) मिळाल्या.

इतिहासात मनुष्य चाकावर मातीची भांडी बनवायला लागला, हा महत्त्वाचा शोध होता. शाळेच्या मैदानात प्रत्यक्ष कुंभार आपल्या चाकासकट आणून त्यांनी वेगवेगळ्या आकाराची भांडी त्याला बनवायला लावली. कार्यानुभवाचे मार्क देण्यासाठी मुलांना प्रत्यक्ष काम करावं लागे. आपापल्या घराजवळच्या देवळांमधून फेकलेले निर्माल्य आणि नारळाच्या शेंड्या जमा करून शाळेत आणाव्या लागत. शाळेच्या मागे कंपोस्ट खताच्या खड्ड्यात हे धन टाकले जाई.

शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे तर अविस्मरणीय सोहळा असे. चौदा वर्षांत एकदाही मॅडमनी बाहेरून विकत आणलेल्या सिनेमांच्या गाण्यांच्या ऑडियो कॅसेट अथवा सीडीज वाजवू दिल्या नाहीत. पाठ्यपुस्तकातली नाटकं अथवा गाणी उत्तम चाली लावून शाळेल्या मुलांनीच बसवायची, हा नियम होता. संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या भाषांमधील लोकगीते, देशभक्तीपर गीते जमवली जात. वेगवेगळी लोकनृत्ये बसवली जात.

गाजलेल्या मराठी गाण्यांचे संस्कृत अनुवाद मूळ गाण्याच्या चालीवर गायले जात. ‘झुक-झुक-झुक-झुक आगीनगाडी’ या संपूर्ण गाण्याचा संस्कृत अनुवाद डॉ. प्रभा मुळे यांनी केला होता. 

‘झुक-झुक-झुक-झुक-अग्नीरथयो ऽ 
धूमशलाका गगने मुज्चाती, 
धावत वृक्षान् पच्शेमम, पच्शेमम... 
मातुलग्रामम् गच्छेमम्, गच्छेमम... 
मातुलग्रामम् गच्छेमम.

हे गाणं साऱ्या शाळेचं तोंडपाठ झालं होतं. एकदा १५ ऑगस्टला राखीपौर्णिमा आली होती. मग नारळी पुनवेचं गाणं आलं. कोळी बांधव आले. ज्या मुलांना नाचता येत नाही त्यांनी हातात पुठ्ठ्याचे नारळ आणि मासे घेऊन नाचाच्या आजूबाजूला उभं राहायचं होतं. कारण वर्गातल्या सगळ्या मुलांनी कार्यक्रमात सहभागी झालंच पाहिजे, हा दंडक मॅडमनी घालून दिला होता. आपल्याला कधीच स्टेजवर जाता आलं नाही, हा न्यूनगंड मुलांच्या मनात राहू नये, याची त्या काळजी घेत.

आपली संस्कृती ही कागदोपत्री शिकवायची गोष्ट नाही. ती जगता आली पाहिजे, असा मॅडमचा प्रयत्न असे. एड्सग्रस्त मुलांना पोस्टकार्डावर तयार केलेली शुभेच्छापत्रे बनवून पोस्टात नेऊन टाकणे, हा कार्यानुभवाचा उपक्रम होता. अंध मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हा उपक्रम होता. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यापूर्वी सर्व मुलांना घरून भेटवस्तू आणायला लावल्या जात. यामध्ये साबण, रुमाल, कंगवा, शाम्पूची पाकिटे अशा वस्तू असत. या सर्व वस्तू खोक्यात भरून मूक-बधीर मुलांकरिता भेट पाठवली जाई. एचआयव्हीबाधित मुलांची माहिती घेण्याकरिता संपूर्ण शाळा एसटी बसने स्नेहालयात जाऊन येई. हे सर्व घटक समाजाचा अविभाज्य भाग आहेत, त्यांना आनंदात सहभागी करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ही गोष्ट भाषणात सांगून काही फरक पडत नाही, हे त्यांना निश्चित माहीत होतं.

‘तोत्तोचान’ हे पुस्तक त्यांनी मला आवर्जून वाचायला लावलं. ती शिक्षकांची भगवद्गीता आहे, असं त्यांना वाटायचं. शाळेच्या स्नेहसंमेलनातून संस्कृतीचं दर्शन घडलं पाहिजे, चित्रपटांची गाणी कधीही वाजता कामा नयेत, हा त्यांचा दंडक होता. शब्दांचा अर्थ न कळता लहानशा वयात कामुक अंगविक्षेप करणे कितपत योग्य आहे? असे विचार देऊन आम्हाला समृद्ध करणाऱ्या या मॅडम म्हणजे कुंदा विजय हळबे. आपली स्वत:ची विशिष्ट शैली आणि दृष्टिकोन वापरून शाळेसाठी तन-मन-धनाने आयुष्य वेचणाऱ्या आमच्या मॅडम. विषयाचे वार्षिक नियोजन करताना किती महिन्याला किती धडे आणि किती कविता संपवायच्या, याला महत्त्व नाही; तर तो विषय शिकवण्यामागची उद्दिष्ट्ये आम्ही नियोजनाच्या पहिल्या पानावर हाताने लिहायचो. विषयाचं उद्दिष्ट साध्य होत नसेल तर पाठ्यपुस्तकाला काहीच महत्त्व नाही, हे त्यांनी आम्हाला शिकवले.

आपल्या आजूबाजूला स्वत:च्या कामाचा कुठलाही गाजावाजा न करता आत्यंतिक तळमळीने काम करणारी काही माणसे असतात. त्यांच्या सहवासाच्या परीसस्पर्शाने आपल्याही जीवनाचे सोने होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपलीही वाटचाल त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर करणे, ही त्यांच्या कष्टाला दिलेली पोचपावती आहे.

शांतपणे सेवानिवृत्तीचं आयुष्य जगणाऱ्या आमच्या लाडक्या हळबे मॅडमना आमच्या ‘हळबियन’ गटाकडून मानाचा सलाम.
 
- अमृता खंडेराव, यवतमाळ
बातम्या आणखी आहेत...