आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोशाचा प्रतिध्वनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटक्या-विमुक्तांमधला हा उपेक्षित घटक गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्याच व्यवस्थेकडून जगण्याचे हक्क मागतोय... त्यांची व्यथा इथल्या व्यवस्थेला ऐकू येत नाही, की ऐकायचीच नाही, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे, तो डॉ. अॅन्थनी डायस यांच्या ‘आक्रोश पारध्यांचा’ या संशोधनपर पुस्तकाने...

२१व्या शतकातील आधुनिक युगात आज आपण आहोत. समाजाच्या प्रत्येक घटकाचे या देशाच्या विकासामध्ये योगदान आहे. मात्र, याच समाजातला एक घटक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. देश स्वतंत्र झाला म्हणजे नेमकं कोण स्वतंत्र झालं? या प्रश्नाचं उत्तर इथल्या व्यवस्थेला आज ना उद्या द्यावंच लागेल. कारण अजूनही कित्येक समाजघटक उपेक्षितांचं आयुष्य जगत आहेत. राज्यघटनेने त्यांना माणूस म्हणून जगण्याचे दिलेले अधिकारही त्यांना उपभोगता येत नाहीत. हा उपेक्षित घटक गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्याच व्यवस्थेकडून जगण्याचे हक्क मागतोय. त्यांची व्यथा इथल्या व्यवस्थेला ऐकू येत नाही, की ऐकायचीच नाही, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे डॉ. अॅन्थनी डायस यांच्या ‘आक्रोश पारध्यांचा’ या संशोधनपर पुस्तकाने.

भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या इतिहासापासून या पुस्तकाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर या वर्गामध्ये हक्कांविषयी निर्माण झालेली जागरुकता आणि त्यातून त्यांच्या मुक्तीसाठीच्या चळवळीचा लेखाजोखा ‘आक्रोश पारध्यांचा’मध्ये सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरी भटके-विमुक्त १९५२पासून स्वातंत्र्य दिवस साजरा करतात. त्यांच्या दृष्टीने हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. कारण याच वर्षी ‘क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट - १८७१’ हा कायदा रद्द करण्यात आला. मात्र त्यातून त्यांना खरंच मुक्ती मिळाली का? कारण कायदा जरी रद्द झाला तरी पोलिसांचा या वर्गामागचा ससेमिरा कायमच राहिला आहे. या कायद्यात पुढे अनेक बदल झाले. मात्र भटक्या-विमुक्तांच्या आयुष्यात काही फार मोठा फरक पडलेला नाही. याच वर्गाच्या सद्य:स्थितीसाठी नेमण्यात आलेल्या रेणके आयोगाच्या व्यवहार्य शिफारशीही स्वीकारण्यात आल्या नाहीत. 

१८ राज्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन १५६ जाणकारांच्या साक्षी घेऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ६०० पानांचा अहवाल तयार केला गेला. मात्र, नियोजित एका वर्षाच्या कालावधीत तो सादर न झाल्याने, स्वीकारला गेला नाही. यातून व्यवस्था या वर्गाबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येऊ शकते. १९७२पासून भटके-विमुक्त स्वतःच्या लोकशाही हक्कांसाठी लढत आहेत. मात्र त्यांच्या लढ्याकडे व्यवस्थेने कायम दुर्लक्ष केले आहे. नागपंचमीपासून ते रमजान, होळीपर्यंतचे सर्व सण हा वर्ग साजरा करतो. राज्यात २३ ठिकाणी भटक्या-विमुक्तांची जातपंचायत भरते. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही पंचायत भरते. निरक्षरता, आर्थिक-सामाजिकदृष्ट्या असलेली असुरक्षितता यामध्ये या वर्गाच्या अधोगतीची कारणे सापडतात. भटक्या-विमुक्तांची जीवनशैली, चालीरीती, जातपंचायत अशा विविध अंगाने या पुस्तकात त्यांचा संशोधनात्मक आढावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे संशोधन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेले आहे. त्यामुळे पुस्तकातील अनुभव हे अंगावर शहारे आणतात.

गणेश देवी या प्रख्यात साहित्यिक आणि संशोधकाने भारतातील भटक्या आणि विमुक्त जमातींविषयी ‘भटक्या...ज्यास चोर म्हणतात!’ या शीर्षकाखाली अत्यंत हृदयस्पर्शी संशोधन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वर्ग ऊर फुटेस्तोवर नुसता धावत आहे. एका जागी घर करून राहणं त्यांच्या नशिबी नाही. स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलंच नाही. कोण आहेत हे लोक? कुणामुळे ते सतत धावत आहेत? आज दिवस निघाला, उद्या कुठे जायचं, याचा पत्ता नाही. समाज या वर्गाकडे जन्मजात गुन्हेगार म्हणून बघतोय. महाश्वेतादेवी यांचंही या वर्गाच्या बाबतीतलं योगदान फार मोठं आहे. ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, बाळकृष्ण रेणके, अविनाश गायकवाड हे आजही भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवर रान उठवतात. रस्त्यावरच्या लढाईत उतरतात. त्यामुळेच का होईना, किमान आज हा वर्ग थोड्याफार प्रमाणात सुरक्षित आहे.  

अशा या कायम उपेक्षित वर्गाचा खरा चेहरा संशोधनात्मक अशा या पुस्तकातून डॉ. अॅन्थनी डायस यांनी पुढे आणला आहे. डॉ. डायस हे झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च आणि सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईचे संचालक आहेत. केवळ पुस्तकापुरतं डॉ. डायस यांनी हे कार्य थांबवलेलं नाही तर, त्यांनी याच संस्थेत भटक्या विमुक्तांच्या हक्कांची पायमल्ली कशी होते, यावर एक अभ्यासक्रमही सुरू केला आहे. याशिवाय त्यांच्या ‘लोकधारा’ या त्रैमासिकातूनही भटक्या- विमुक्तांच्या प्रश्नांवर लिखाण केले जाते. हे पुस्तक म्हणजे जिवंत चित्रण आहे या वर्गाने भोगलेल्या दुःखाचे. कवी रवींद्र कांबळे ‘वेदना’ कवितेत म्हणतात, ‘भोगल्या इतक्या कळा की... वेदनांचा यार झालो...’

आक्रोश पारध्यांचा
- लेखक : डॉ. अॅन्थनी डायस
- सहलेखक : दिक्षिता डिक्रुझ
- प्रकाशक : एक्स. आय. एस. आर.
सेंट झेवियर्स कॉलेज कॅम्पस, ५, महापालिका मार्ग, मुंबई - ४००००१
- मूल्य : ३००/- रूपये

- आनंद गायकवाड, औरंगाबाद
 
पुढील स्लाइडवर वाचा हरहुन्नरी जावेदजी, गानप्रवासिनी...
बातम्या आणखी आहेत...