आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anand Gupte's Artical On Twelth Balgandharva Music Festivel

एका तपाची महोत्सवसाधना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्या-मुंबईच्या पावलावर पाऊल ठेवून जळगावही हल्ली हळूहळू कॉस्मोपोलिटन शहर होऊ लागले आहे. उद्योगधंदे, नोकरी, शिक्षण, बदल्या अशा निमित्ताने जशी खानदेशी माणसं चौफेर जगभर जाऊ लागलीत; तशीच जगभरातील अठरा पगड माणसेही जळगावात, खानदेशात येऊ लागली आहेत. त्यामुळे गेल्या एक तपात म्हणजे बारा वर्षांत जळगावात नावलौकिक मिळवलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाबाबत अशा प्रकारचे उद्गार ऐकू येणे स्वाभाविकच आहे.
बारा वर्षांच्या या वाटचालीने बालगंधर्व संगीत महोत्सवाने आणि पर्यायाने चांदोरकर प्रतिष्ठानने आता चांगलेच बाळसे धरले आहे, हे बाकी खरे. अनुभवांची शिदोरी भरपूर होत चालल्याने नवखेपणातून येणारे दोष, कमतरता, चुका कमी झाल्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता आत्मविश्वास आला आहे. चांदोरकर प्रतिष्ठानचे संस्थापक चांदोरकर कुटुंबीय, विश्वस्त, पहिल्या-दुस-या-तिस-या फळीतले कार्यकर्ते, पुरवठादार, जाहिरातदार, आधारस्तंभ असलेले पुरस्कर्ते आणि रसिक श्रोतृवृंद या सर्वांना आता एकमेकांबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ बालगंधर्व संगीत महोत्सवच नव्हे, तर अन्य तत्सम कार्यक्रम, उपक्रमांच्याही जबाबदा-या अंगावर येऊ लागल्या आहेत; त्याही प्रतिष्ठान आनंदाने, उत्साहाने, जबाबदारीने पेलत आहे.
बालगंधर्वांचे वयाच्या सात ते अठरा असे अकरा वर्षे वास्तव्य जळगावात होते. तसे पाहता जळगाव सोडल्यावरच त्यांचे कर्तृत्व फुलले. नाट्य-संगीत विश्वात त्यांनी अलौकिक असे यश मिळविले. अशा कलावंताला आमच्या गावाचे असे म्हणून जळगावकरांनी त्यांच्या स्मृती जपल्या. त्यांना आदरांजली वाहिली. शास्त्रीय संगीत, विविध वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य यामधील देशभर, जगभर कीर्ती मिळविलेले कलावंत बालगंधर्व संगीत महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी आले. यांमध्ये पं.जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. बिरजू महाराज, देवकी पंडित, डॉ. वीणा सहस्रबुद्धे, पं. राजन-साजन मिश्रा, पं. रोणू मुजूमदार आदी दिग्गजांचा समावेश आहे.
‘बालगंधर्व संगीत महोत्सव’ आयोजित करून यशस्वीरीत्या पार पाडल्याने जे यश चांदोरकर प्रतिष्ठानला लाभले, त्याचे विविध पैलू या क्षणी जाणवत आहेत. सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, चोख आर्थिक नियोजनाचा. या सांस्कृतिक कार्याचे शिवधनुष्य पेलणे, ही काही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी आर्थिक बळ हवेच. तेही प्रतिवर्षी वाढते हवे. तिकीट विक्री, जाहिराती, प्रायोजकता, सहप्रायोजकता या व अशा मार्गांनी पैसे जमा व्हायला हवेत. बहुतेक खर्च आधीच होत असल्याने हा जमणारा पैसा आधीच हाती यावा लागतो. इथेच नेमकी विश्वासार्हता असावी लागते. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, लिखित हिशेब, लेखापरीक्षण यामुळेच ती येते, टिकते. विश्वस्तांची, कार्यकर्त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, नि:स्पृहता, सेवाभावी वृत्ती, स्पष्टवक्तेपणा यामुळेच प्रतिष्ठानची प्रतिमा बनते व नावाला प्रतिष्ठा लाभते. प्रायोजक, सहप्रायोजक नेमके हेच पाहतात. येऊ घातलेल्या प्रायोजकांना, सहप्रायोजकांना एक प्रकारचा विश्वास वाटतो. रसिक श्रोतृवर्ग कार्यक्रमाच्या तारखा, कलावंतांची निवड, आयोजन, ध्वनी व्यवस्था, बैठक, वाहतूक व्यवस्था याबाबत आश्वस्त राहतो. रसिक श्रोत्यांचा सामाजिक स्तर हीसुद्धा महत्त्वाची बाब असते. माध्यमांचेही चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य लाभते. इतक्या भगीरथ प्रयत्नानंतर मिळणा-या यशाची शाश्वती म्हणजे जगभर, देशभर नावाजलेले कलावंत हजर होऊन ते आपली कला बालगंधर्व संगीत महोत्सवात झोकात पेश करतात आणि हे कलावंत समाधान पावल्यावर अन्य कलावंतांना या महोत्सवात आपली कला सादर करण्याची शिफारस करतात. चांदोरकर प्रतिष्ठान या कठीण परीक्षेत उतरल्यानेच आता नामवंत मंडळी सहज येऊ पाहतात. इतकेच नव्हे तर, पुण्यातील सवाई गंधर्व या जुन्याजाणत्या आणि नामवंत संस्थेने सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुण्याबाहेर आणि जळगावात थाटात साजरा करण्यासाठी चांदोरकर प्रतिष्ठानची निवड केली आणि मोठ्या दिमाखात हा महोत्सव जळगावमध्ये साजरा केला. अशाच प्रकारे मुंबईतील नामवंत अशा दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे घेण्यात येणा-या सुगम संगीत गायनाच्या स्पर्धांचे खानदेश केंद्र हाताळण्याचे पूर्ण काम चांदोरकर ट्रस्टकडेच अत्यंत विश्वासाने व खात्रीने देण्यात आले होते व अद्यापही ही सहकार्याची रीत चालू आहे.
रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरणारे आखणी दोन सांगीतिक कार्यक्रम सांगायलाच हवेत; एक म्हणजे, ‘दिवाळी पाडवा पहाट’ हा कार्यक्रम आणि दुसरा ‘मल्हार महोत्सव’. हे दोन्ही कार्यक्रम गेली आठ-दहा वर्षे नियमितपणे सादर होत आहेत. त्यातला मल्हार महोत्सव हा पावसाच्या नेमक्या आगमनाच्या मुहूर्तावर सादर होत असतो. मेहरूण तलावाच्या काठी हिरवळीवर हा कार्यक्रम करण्याने काय साधते, ते या कार्यक्रमाला हजर राहिल्याशिवाय कळणार नाही. अर्थातच, पावसाच्या थंडगार सरींची महती कळायला जळगावचे भाजणारे ऊनही खायला हवं, हे ओघाने आलेच! मल्हार महोत्सवामधील हे कार्यक्रम मुंबईच्या एनसीपीए या नामवंत संस्थेतील पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर केले जातात, हे शिवाय एक आगळे वैशिष्ट्य! हे दोन्ही कार्यक्रम म्हणजे, रसिक श्रोत्यांच्या मूडला दाद देऊन निसर्गाशी आगळी जवळीक साधण्याचा प्रयत्न असतो.
कार्यक्रमांच्या या मेजवानीमुळे जळगावात, खानदेशात कानसेन निर्माण व्हावेत, हा चांदोरकर प्रतिष्ठानचा प्रयत्न जरूर आहे; पण त्याच्याच जोडीला तानसेन निर्माण करण्यासाठीही खास प्रयत्न केला जात आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी सादर होणारा ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारा ‘अर्घ्य’ हा कार्यक्रम फक्त स्थानिक कलाकारच सादर करतात. हमखास आणि जाणकार मुरब्बी श्रोते या कार्यक्रमांनाही प्रेमाने, आपुलकीने, अगत्याने हजर राहतात आणि उगवत्या पिढीला उत्तेजन देतात.
‘अवघा रंग एकचि झाला’ असे संगीत नाटक चांदोरकर प्रतिष्ठानने सादर केले. इतर काही व्यावसायिक नाटके तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकेही सादर केली आहेत.
‘आमची जगात कुठेही शाखा नाही’ अशी पाटी दुकानावर अभिमानाने लावणारा धंदेवाईक हमखास मराठीच असणार, हे आपण अगदी ठामपणे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आम्ही आमची संस्था चालवतो, असे म्हणणारी मंडळीदेखील हमखास मराठीच असतात. माझ्या मते, चांदोरकर प्रतिष्ठानही त्यामधीलच एक आहे. गेल्या 12 वर्षांत शंभरावर उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करणा-या या नामवंत संस्थेला ना स्वत:चे खास वेगळे ऑफीस वा स्वत:चे अद्ययावत नाट्यगृह. राज्य शासन, केंद्र शासन, उद्योग विश्व, कलावंत यांचा भक्कम पाठिंबा असतानाही हे जमत नाही; याचा अर्थ कुठेतरी, काहीतरी कमी पडते आहे. त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. थोडी दूरदृष्टी हवी आहे. भरपूर जिद्द हवी आहे. सुंदर स्वप्न पाहण्याची इच्छा हवी आहे. ती पूर्ण करण्यासाठी लढण्याची, रक्त आटवण्याची तयारी हवी आहे. ज्याची खरी गरज आहे, असे नाट्यगृह आज तरी जळगावमध्ये नाही. म्हणून त्यासाठी निग्रहाने प्रयत्न व्हायलाच हवे आहेत. स्वाभाविकच हा अधिकार आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या ‘चांदोरकर प्रतिष्ठानचा’च आहे.