आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांत खपल्या पुस्तकाच्या 53 हजार प्रती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहनांचा गोंगाट, प्रदूषणाची गोदामं बनलेली मोठी शहरं आणि घड्याळाच्या काट्यांना बांधलेला दिनक्रम या चक्राला वैतागलेले अनेक जण पाठीवर धोपटी टाकून मनमुराद हुंदडण्यासाठी घराबाहेर पडतात. अशा मुसाफिरांना लेणींची सुरेख सफर घडवणारं डॉ. दाऊद दळवी लिखित ‘लेणी महाराष्‍ट्राची’ हे पुस्तक ग्रंथालीनं सन 2004 मध्ये प्रकाशित केलं. दहा वर्षांत या पुस्तकाच्या 53 हजार प्रती वाचकांच्या हाती पडल्या असून अगदी आठवडाभरातच या पुस्तकाची नवी कोरी आवृत्ती येत आहे. अगणित वर्षे अज्ञात असणारा पाषाणातील या लेणींचा बहुमोल खजिना वाचकांच्या हाती देणा-या या पुस्तकाविषयी...
शिवशाही, मावळे आणि शिवरायांच्या गड-किल्ल्यांविषयी अपार माया आहे. ‘दगडांच्या देशा’ असं विशेषण लाभलेल्या महाराष्‍ट्रात विपुल प्रमाणात किल्ले अन् लेणी आहेत. देशातील 1200 पैकी तब्बल 800 लेणी महाराष्‍ट्रात आहेत. त्यामुळे किल्ल्यांबरोबरच काही मोजक्या लेणी पाहण्यासाठीही प्रचंड गर्दी होते. मात्र, काही लेणींपलीकडे आपले पाऊल पडत नाही. माहितीचा अभाव आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर असल्यामुळे पर्यटकांचे तिकडे लक्षच जात नाही. पर्यटकांचे सोडा, अगदी स्थानिकांनाही या ठेव्यांबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे हा अनमोल खजिना तसाच दुर्लक्षित राहतो.नेमकी हीच बाब हेरून 28 वर्षांपूर्वी डॉ. दळवी यांनी राज्यातील लेणींची माहिती जमवण्यास सुरुवात केली. तब्बल 10 वर्षे म्हणजेच 1996 पर्यंत अविश्रांत प्रयत्नांतून राज्यभरातील लेणींची परिपूर्ण माहिती जमा करण्यात डॉ. दळवी यांना यश आलं. नेटकी मांडणी, भरपूर छायाचित्रे आणि सविस्तर माहितीनं नटलेल्या या पुस्तकानं वर्षभरातच वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. वाढती पृष्ठसंख्या आणि पूर्ण ग्लॉसी पेपर वापरल्यामुळे वाढलेली किंमत पुस्तकास मारक ठरेल का, ही चिंता वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळं मागे पडली. 2004 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आतापर्यंत 53 हजार प्रती विकल्या गेल्या असून लवकरच या पुस्तकाची नवी आवृत्ती वाचकांच्या हाती पडणार आहे. वाचकांच्या मागणीमुळे स्वतंत्र इंग्रजी पुस्तकही तयार केले असून लवकरच तेही वाचकांच्या हाती पडेल.
पुस्तकाच्या जन्माची कथा
1986 मध्ये एका बैठकीसाठी मुंबई विद्यापीठात सकाळी 10 वाजता पोहोचल्यानंतर बैठक दुपारी चार वाजता सुरू होईल, हे डॉ. दळवी यांना कळले. इतका वेळ काय करायचे, असा विचार करताना घारापुरी लेणी पाहायचे ठरले. बोटीतून लेणींकडे जाताना इतर परदेशी पर्यटकांना भारतीय गाइड घारापुरीऐवजी वेरूळ लेणींचीच माहिती देताना दिसले. ती माहितीही अपूर्ण असल्याचे जाणवल्यानंतर आपण स्वत:च महाराष्‍ट्रातील लेणींवर लिखाण करावे, असा विचार मनात आला. लगेचच त्यावर कामही सुरू केले. मात्र, लेणींची माहिती जमवणे, संदर्भ पाहणे आणि ती तपशीलवार मांडणे यात दहा वर्षे खर्ची पडली. 1986 ते 1996 या काळात लेखन पूर्ण केले. ग्रंथालीने 17 ऑक्टोबर 2004 रोजी ग्लॉसी पेपरवरील आवृत्ती प्रकाशित केली. या पुस्तकाला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला.
पुस्तकाचे वेगळेपण
राज्यातील सर्व किल्ले वा लेणींची परिपूर्ण माहिती देणारं या पुस्तकाव्यतिरिक्त एकही मराठी पुस्तक उपलब्ध नाही. काही मराठी तसेच इंग्रजी लेखकांनी निवडक लेणींची किंवा किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. मात्र, त्यातही केवळ त्रोटक माहितीच उपलब्ध आहे. दळवी यांनी लेखनास सुरुवात करतानाच प्रत्येक लेणीविषयी अनेक संदर्भ गोळा केले. ते मांडताना जागोजागी छायाचित्रांचाही सुरेख वापरही केला. केवळ माहिती देणे अथवा मुख्य शहरापासून अंतर वगैरे अशा प्रकारच्या कोष्टकांनी भरलेलं हे पुस्तक नाही. वाचकाला लेणीशी निगडित प्रत्येक पैलूची सखोल माहिती देतानाच त्यांचा काळ, पद्धत, वैशिष्ट्ये, प्रकार, लेणी कोरण्यामागील इतिहास, लेणी कोरणारे कारागीर आणि त्यासाठी आर्थिक बळ पुरवणा-यांचाही पुस्तकात उल्लेख आहे. या 12 प्रकरणांतील पुस्तकात फक्त धार्मिक नव्हे, तर त्या त्या काळातील राजकीय घडामोडी त्याची लेणीच्या शैलीवर पडलेली छाया आदींची दळवी ओळख करून देतात. विशेषत: कार्ला, भाजे, घारापुरी, घटोत्कच आणि जगविख्यात वेरूळ लेणींबाबत अतिशय तपशीलवार वर्णन पुस्तकात आढळते. लेणींचा इतिहास विशद करताना लेखक त्या काळातील परिस्थितीचे अतिशय सुरेख वर्णन करतो. त्यामुळे वाचकांच्या नजरेसमोर या शब्दांतून अक्षरश: त्या काळातील चित्र उमटते. लेणी कोरण्याचे प्रयोजन, त्या कोरण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप झालेले बदल, लेणींतील मूर्तिकला, देवतांच्या मूर्ती आदींची माहिती देताना दळवी यांनी त्या काळातील लोकजीवनावरही प्रकाश टाकला आहे. त्या काळातील प्रवासाच्या पद्धती, त्यातून तयार झालेल्या वाटा, या वाटांच्या अवतीभोवती कोरलेल्या लेणी याबाबतही पुस्तकांतून भरपूर माहिती मिळते. पुस्तकांची आणखी एक विशेष बाब म्हणजे जगप्रसिद्ध घारापुरी, अजिंठा, वेरूळ या लेणींबरोबरच क्वचितच ज्ञात असणा-या परिसरांतील अनेक लेणींची माहिती. अजिंठा आणि वेरूळपासून अगदी जवळ असणारी घटोत्कच लेणी, अंबाजोगाईतील जगावेगळा हत्तीखाना, लातूर जिल्ह्यातील खरोसा, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील लेणींबाबतही या पुस्तकांतून सविस्तर माहिती मिळते.
लेणींतील शिलालेख
लेणींबाबत सखोल माहिती देणारी पुस्तकं मुळातच कमी आहेत, मराठीत तर अशा प्रकारचं ‘लेणी महाराष्‍ट्राची’ हेच एकमेव पुस्तकं आहे. लेणींतील बहुतांश शिलालेख प्राकृत किंवा संस्कृत भाषेत असून ते ब्राह्मी व नागरी लिप्यांमध्ये कोरले आहेत. या शिलालेखांतून लेणींबरोबरच राजघराणी, वंश, सामाजिक चालीरीती, राजकीय संघर्ष आदींची माहिती मिळते. दळवी यांनी अशा शिलालेखांबाबतही विस्तारानं लिहिलं आहे.
नव्या आवृत्तीची वैशिष्ट्ये
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आदिमानवांनी तयार केलेली मोठमोठी कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांची तपशीलवार माहिती, छायाचित्रांनी ही आवृत्ती सजली आहे. या नव्या प्रकरणाशिवाय आणखी काही प्रकरणे वाढवली आहेत, असेही दळवी यांनी सांगितले.
- पुस्तकाचे नाव : लेणी महाराष्‍ट्राची
- लेखक : डॉ. दाऊद दळवी
- प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
- पृष्ठे : 302, मूल्य : 700 रुपये