आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ananda Patil Artical On Marathi Literature Board

विद्यार्थ्यांना भाषासौष्ठवाचे महत्त्व पटवून देणारे मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाने गेल्या दशकभरात अनेक दखलपात्र उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाङ्मयाची अभिरुची निर्माण होण्यासाठी कथा, कादंबरी लेखनशैली विकसित करण्यासाठी मार्गदर्शन वर्ग घेतले आहेत. कादंबरी या वाङ्मय प्रकारात भाषासौष्ठवाचे महत्त्व फार मोठे आहे. हे लक्षात घेऊन मंडळाने पंचक्रोषीतील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना लिहिते केले आहे. प्रा. विश्वनाथ पाटील यांच्या खांद्यावर या मंडळाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ग्रामीण साहित्य, संस्कृतीचा अभ्यास करून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेखनाच्या प्रांतात रमले पाहिजे, म्हणून मंडळाने विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, काव्यलेखन स्पर्धा घेतल्या आहेत. स्पर्धेसाठीचे साहित्य हे स्वरचितच असावे, हा शिरस्ता त्यांनी कायम ठेवला आहे. स्पर्धेतील ज्या आशयघन कविता असतील त्या महाविद्यालयाच्या ‘आयुध द वेपन’ या नियतकालिकात प्रकाशित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. शब्दभांडार वाढावे, भाषाशुद्धीचे ज्ञान मिळावे, वक्तृत्वशैलीचा विकास व्हावा, या उद्देशाने दरवर्षी खान्देशातील वक्त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात येते. ‘दगडी जात्याचा रेशमी गळा’ म्हणून ओळख असलेल्या प्राध्यापिका कमलताई पाटील, स्त्री भ्रूणहत्या जनजागृतीचा संदेश देण्यासाठी महाराष्‍ट्रभर भ्रमंती करणारे प्रा.वा.ना. आंधळे, प्रा.राजा महाजन, प्रा. सुधा खराटे, ‘पाडा’ कादंबरीचे लेखक अशोक कोळी यांच्यासह अनेक दिग्गजांची व्याख्याने घेण्यात आली आहेत. वृत्तपत्रांमधील साहित्य विषयांवरील स्तंभलेखनाचे वाचन, नवीन कथा, कादंब-यांवर चर्चा, गीतगायन असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा प्रयत्न : विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातर्फे ‘आयुध द वेपन’ हे नियतकालिक प्रकाशित केले जाते. यातील लेखनात मराठी वाङ्मय मंडळाचा सिंहाचा वाटा असतो. सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षाच्या नियतकालिकाचे मुखपृष्ठ हे उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठात सर्वाधिक चर्चेचे ठरले आहे. क्षेपणास्त्रांचे यशस्वी उड्डाण, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, हतनूर धरणाचा खळखळता प्रवाह, भारताने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक, संगणक क्रांती अन् खान्देशकन्या तत्कालीन राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची छायाचित्रे या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर समाविष्ट करण्यात आली होती. जग जेट विमानाच्या गतीने बदलतेय, असा संदेश या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विद्यापीठातर्फे जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणा-या काव्यलेखन अभिव्यक्ती कार्यशाळा, कविसंमेलन, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांमध्ये या मंडळाचे विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असतो. निबंध लेखन, पत्रलेखन, शुद्धलेखन, नाट्यसंहिता वाचन, असे उपक्रमही अलीकडच्या काळात राबवण्यात आले आहेत.
भित्तिपत्रकातून सामाजिक विचार : विद्यार्थ्यांनी जे साहित्य वाचले असेल त्यातील समाजहितैषी विचार मांडण्यासाठी भित्तिपत्रक सुरू करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, हुंडाबळी, नैसर्गिक आपत्ती, स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण, सामाजिक समरसता, असे विविध विषय हाताळले जातात. आगामी काळात व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षा या विषयांवर कार्यशाळा व गझल लेखन अन् गायन या विषयावर चर्चासत्र घेण्याचे नियोजन या मंडळाने केले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्राचार्य एल. पी. देशमुख यांचे मार्गदर्शन व प्रा. वृषाली जोशी यांचे सहकार्य लाभत असल्याचे मंडळाचे चेअरमन प्रा. विश्वनाथ पाटील हे आवर्जून नमूद करतात.