आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ananda Patil Article About Book Review Balirajachya Vedana, Divyamarathi

व्यापारधार्जिणे धोरणावर प्रहार ‘बळीराजाच्या वेदना’ कादंबरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोड्याचे साहित्यिक निंबाजी हिवरकर हे गेल्या दीड दशकापासून कृषिसंस्कृतीवर कसदार लिखाण करीत आहेत. अलीकडच्या काळात त्यांना ‘फिरत्या चाकावरती’ या चाकोरीबाह्य अन् विचारप्रवर्तक आत्मकथनाने वाङ्मयनिर्मितीच्या प्रांतात मानाचे स्थान मिळाले आहे. ग्राम्यजीवनावर सूक्ष्म भाष्यात्मक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकरी आत्महत्या, शासनाचे व्यापारधार्जिणे धोरण या विषयांवर शाब्दिक प्रहार करणारी त्यांची ‘बळीराजाच्या वेदना’ ही नवी कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या काकोडा गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत हिवरकर हे लिपिक आहेत. मात्र, त्यांनी जोपासलेला वाङ्मयाचा व्यासंग भल्याभल्यांना थक्क करणारा आहे. नव्या लेखनाबाबत ते सांगतात की, शेतकरी हितासाठी वाहिलेल्या संस्थेत नोकरी करीत असल्याने शेतकर्‍यांच्या व्यथा, वेदना जवळून पाहिल्या आहेत. किंबहुना अनुभवल्या आहेत. मध्यंतरी ‘फिरत्या चाकावरती’ आत्मकथनात भावभावनांना वाट मोकळी करून दिली आहे. हे पुस्तक कवी विठ्ठल वाघ यांना भेट दिले होते. ते वाचल्यानंतर त्यांनी बोलका अभिप्राय दिला होता. त्यात ते म्हणाले होते की, ‘मातीशी इमान राखणारे तुझे लिखाण आहे. नव्या पिढीला विचारधन संग्रहित करण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही. विदर्भासह मराठवाडा, खान्देशात होणार्‍या शेतकरी आत्महत्या या विषयावर चिंतनशील कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करावा, ही त्यांची ही सूचना शिरसावंद्य समजून ‘बळीराजाच्या वेदना’ या कादंबरीचे लिखाण केले आहे.

पिकवलेला माल स्वत: बाजारात विकण्याची हिंमत शेतकरी करत नाही. म्हणूनच तो बाजार केंद्रित अर्थव्यवस्थेचा बळी ठरतो. बळीराजाची दखल घेतली गेली पाहिजे, त्या प्रमाणात शासनाने घेतलेली नाही. या क्रांतीच्या साडेतीन दशकांनंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही, ही शोकांतिकाच समजावी लागेल. हे सत्र थांबवायचं असेल तर शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिकार्‍यांनी वातानुकूलित कार्यालयांचा उंबरठा ओलांडून शेताच्या बांधांपर्यंत पोहोचले पाहिजे. शेतकर्‍यांनी व त्यांच्या मुला-बाळांनी कर्जबाजारीपणाने पिचल्यामुळे गळफास व विषारीद्रव प्राशन करून जीवनयात्रा संपवण्यापेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश या वैचारिक कादंबरीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे.

शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान आणि त्यातून शेतकर्‍यांच्या हलाखीचे उद्भवणारे दुष्टचक्र या विषयांवर फक्त चिंताच व्यक्त होते. कित्येक पांढरपेशांनी बळीराजाला ओलीस ठेवून राजकीय पोळी भाजून घेतली आहे, परंतु शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली नाही. दशकानुदशके चुकीच्या दिशेने आखलेल्या अनेक धोरणांमुळे बिघडलेली ही घडी फुटकळ उपायांनी बसवणे अवघड आहे. म्हणून भूमिपुत्रांनो, मरगळ झटका अन् व्यापारी बना. जागतिकीकरणाचा वेध घेऊन संगणक साक्षर व्हा, असा संदेश ‘बळीराजाच्या वेदना’ या नव्या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते नमूद करतात. यापूर्वी त्यांची संजीवनी (काव्यसंग्रह), लावण्याची चंद्रकोर (कादंबरी), फिरत्या चाकावरती (आत्मकथन), भरकटलेली वाट (कथासंग्रह) ही साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. ‘लावण्याची चंद्रकोर’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रकोर’ नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कृषिसंस्कृती, शेतकरी आत्महत्या या विषयावर येणारी त्यांची नवी कादंबरी हे पाचवे पुस्तक असेल. ‘फिरत्या चाकावरती’ या आत्मकथनाला पुण्याच्या शांताबाई शेळके प्रतिष्ठानचा ‘साहित्य गौरव’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
- निंबाजी हिवरकर,
साहित्यिक, काकोडा,
ता. मुक्ताईनगर,
जि. जळगाव