आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावभावनांचा गोफ ‘कैफ’ गझलसंग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावभावनांना वाट मोकळी करून देणारा त्याचा ‘कैफ’ हा नवा मराठी गझलसंग्रह आणि ‘डायरीतील कविता’ हा काव्यसंग्रह लवकरच चोखंदळ वाचकांच्या भेटीस येणार आहे.गेल्या दशकभरापासून त्याला ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ ही स्नायू कमकुवत होण्याची असाध्य व्याधी जडली आहे. मात्र, जगण्याचं दु:ख कुरवाळत न बसता दु:खाला कवेत घेऊन नि:शब्द वेदनेशी शब्दरूपी औषधाच्या बळावर संवाद साधण्यावर त्याने भर दिला आहे. राज्यभरातून साहित्यविषयक कार्यक्रमांचे आग्रही निमंत्रण मिळूनही नाइलाजाने त्याला या व्याधीमुळे जाता येणे शक्य होत नाही. म्हणूनच त्याच्या लेखनीतून प्रसवलेल्या दोन गझला 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुनंदा वैद्य यांनी सादर केल्या होत्या. रसिकांकडून कळत-नकळतपणे मिळालेल्या प्रतिसादाच्या बळावर त्याने साहित्यसेवेचा वसा जोपासला आहे. ‘कैफ’ या नव्या गझलसंग्रहासाठी त्याने स्वलिखित 180 पैकी 60 गझलांची निवड केली आहे. प्रत्येक गझल ही भावभावना मांडणारी तर आहेच; पण दु:खाचा भार हलका करणारीही आहे. गझलेतील बहुतांश शेरमध्ये वेदना असली, तरी ती हसणारी अन् नव्या उमेदीचा बोलका चिरंतन संदेश देणारी आहे, अशी भावना तो नव्या गझलसंग्रहाबाबत व्यक्त करतो.
‘नजरेपासून सुरू जाहली, नजरेतच ती सरली, सांग तुला ही प्रेम कहाणी आवडली की नाही?’, ‘इतका गुलाल ऐसा उधळू नकोस अजुनी, वेड्या मिरवणुकीला अवकाश फार आहे,’ ‘जेथून पीक काही उगवत आज नाही, तेथेच पेरण्याच्या संधी हजार आहेत,’ अशा आशयघन गझलांची निवड त्याने या नव्या गझलसंग्रहासाठी केली आहे. सुखी माणसाला दु:खाचं महत्त्व कळावं अन् दु:खी माणसाला दु:खातही हसता यावं, असा संदेश देण्यासाठीच ही शब्दरूपी औषधांची कुपी दर्दी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचा आत्मविश्वास तो व्यक्त करतो.नवा विचार समाजाला देण्यासाठी नवलखे हा ‘चला, दु:खाशी शब्दांची मैत्री करू या’ हे वैचारिक पुस्तकही लिहीत आहे. जगात ज्या विभूतींनी, तत्त्ववेत्त्यांनी दु:खालाही हसवण्यास भाग पाडले, अशा आदर्श व्यक्तींची उदाहरणे तो या पुस्तकात देण्याचा प्रयत्न करतो आहे. धीरज नवलखेच्या नव्या पुस्तकाची हस्तलिखिते वाचली की, त्याच्या प्रत्येक शब्दात जगण्याची नि:शब्द वेदना आहे. अर्थांचे पैलतीर, भावभावनांची तगमग असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्याचा ‘ओल्या जखमा’ हा मराठी गझलसंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. त्यातील ‘मी कुठे या कागदावर शब्द अजुनी मांडला, फक्त रक्ताचा जरासा थेंब आहे सांडला’, ‘फूल तू गंधाळणारे भृंग झाले ओठ माझे, कैफ हा आला कुठुनी? काय प्यालो मी मघाशी?’, ‘हे शब्द या जगाचे आहेर लाभलेले, पण हुंदका मनाच्या माहेरचाच आहे’, या गझलांवर दर्दी रसिकांच्या भरभरून प्रतिक्रिया त्याला येत आहेत. त्याच्याच बळावर नवा गझलसंग्रह वाचकांच्या भेटीस येणार आहे. साहित्यिक तथा जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, मैफल ग्रुपचे काशीनाथ भारंबे ऊर्फ ‘निर्मोही’ यांनीच आपल्याला गझलेशी ‘दोस्ती’ करून दिली आहे, अशी भावना तो नव्या लेखनाबाबत सांगताना व्यक्त करतो. हे सांगताना मात्र त्याचे डोळे पाण्याने डबडबल्याशिवाय राहत नाहीत.