आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत भालेराव

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी पाचवी - सहावीत असताना माझ्या आजोळच्या एका लग्नात अण्णांना प्रथम बघितल्याचे माझ्या लख्ख स्मरणात आहे. काळेसावळे, उंचेपुरे, मजबूत बांध्याचे, पांढरेशुभ्र खादीचे धोतर घातलेले आणि सदरा व गळ्यात मफलर अडकवलेले हे काका बहुतेक कुणीतरी मोठे प्रस्थ असावेत, अशी नोंद माझ्या मनाने घेतली होती. कारण लग्नघरातले सर्वच जण त्यांना आवर्जून भेटत असत. प्रथमदर्शनी हे गृहस्थ गंभीर वाटत; पण बोलायला लागले की हळूहळू आपली भीड चेपली जात असे. पुढे अनेक वेळा त्यांची भेट झाली; पण अण्णांचा पोशाख काही बदलला नाही. ते होते तसेच राहिले. अकरावीला असताना आम्ही औरंगाबादला आलो आणि मग मला अण्णांची ओळख व्हायला लागली. रोज आपल्या घरी येणाºया ‘दैनिक मराठवाडा’चे ते संपादक आहेत, हे नंतर समजले. १९७२ ते १९८२ हा काळ मराठवाड्यासाठी फार महत्त्वाचा होता. अनेक आंदोलने तिथे झाली. अनेक परिवर्तने घडली आणि या सर्वांबद्दलची माहिती तेव्हा फक्त ‘मराठवाडा’ दैनिकातून मिळत असे. स्वच्छ - सोपी भाषा हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. गोविंदराव तळवलकरांच्या बरोबरीचे ‘मराठवाड्या’चे अग्रलेख असत आणि ‘महाराष्टÑ टाइम्स’मध्येही त्याचे संदर्भ येत असत.
वरवर सोप्या - सहज वाटणाºया वाक्यांतून ते विरोधकांना रक्तबंबाळ करीत असत. एखादा विषय समजून सांगण्याची त्यांची विलक्षण हातोटी होती. कॉलेजच्या काळात अनेक स्पर्धा होत. मी कविता त्याच वेळी करू लागले होते. कविता पुरवणीत देण्यासाठी आणि स्पर्धेच्या बातम्या देण्यासाठी आम्ही ‘दै.मराठवाडा’च्या कार्यालयात जात असू. कधी तरी तिथे अण्णांची भेट व्हायची. कॉलेजमध्ये काय चालले आहे याची माहिती ते मोठ्या उत्सुकतेने घेत असत. आणीबाणीच्या काळामध्ये ते तुरुंगात गेले होते. बाहेर आल्यावर आम्ही आणीबाणीला का विरोध केला यावर त्यांनी केलेले विवेचन आजही चिरस्मरणात आहे.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी निझामाविरुद्ध मोठा लढा दिला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे त्यांनी कधी भांडवल केले नाही. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवून घेतले नाही. व्रत म्हणून वृत्तपत्र चालवले. संपूर्ण मराठवाड्यातून त्यांना भेटायला माणसे येत असत. ते प्रत्येकाशी आपुलकीने बोलत असत. नेहमी पावसाचे अंदाज विचारत असत. असं का? हे विचारल्यावर ते म्हणत की गावाकडच्या माणसांचे शेती आणि पावसाबद्दलचे अंदाज फार अचूक असतात. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर व शेती पावसावर अवलंबून आहे हे ते नेहमी सांगत असत.
लहानपणी त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये रसाळता आणि त्यांच्या वागण्यात सहिष्णू वृत्ती होती. मराठवाड्याचा विकास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांचे निरीक्षण फार बारीक असायचे. अमेरिका दौरा करून आल्यावर त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘न्यूयॉर्कजवळ एक बिगर नावाचे छोटे गाव आहे. या गावाजवळ एक मजेशीर पाटी लावली आहे. No doubt, New York is big but this is Bigger!'

तरुणपणी केलेले अतोनात कष्ट, खाण्यापिण्याची आबाळ यांचे पडसाद उत्तरार्धात त्यांच्या शरीरावर दिसायला लागले. मायस्थेनिया ग्रेव्हीस या दुर्धर व्याधीने त्यांना गाठले. या रोगामध्ये माणसाचे स्नायूंवरचे नियंत्रण जाते. पण त्यांनी त्या रोगालाही मोठ्या धीराने तोंड दिले. याच काळात त्यांनी ‘हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम’ आणि ‘मराठवाडा’ या महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले. फाय फाउंडेशनसह त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाचा अतिशय मानाचा समजला जाणारा ‘रामनाथ गोयंका’ पुरस्कार मिळाला. कृतज्ञता म्हणून औरंगाबादकरांनी त्यांचा नागरी सत्कार केला. त्या वेळी अ‍ॅलर्जीमुळे त्यांना आलेले हार स्वीकारता आले नाहीत.
मी एकदा मजेने त्यांना म्हटले की, अण्णा, इतकी फुलं तुम्हाला मिळाली, पण तुम्ही एकालाही हात लावला नाही. त्यावर ते हसून म्हणाले ‘पोरी, सारं आयुष्य काट्यात गेलं, कदाचित आता फुलं स्वीकारायला मन धजावत नसावं’. मराठवाडा हे अर्धसाप्ताहिक असताना पन्नालाल सुराणा यांनी महागाई वाढण्यामागे सरकारचे काही निर्णय कारणीभूत आहेत, असा एक लेख लिहिला होता. तत्कालीन पुरवठामंत्री होमी तल्यारखान व्यापाºयांना संरक्षण देत आहेत, असे लेखात म्हटले होते. यावर होमी तल्यारखान यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्यामध्ये पन्नालाल सुराणा यांना तीन महिन्यांची शिक्षा झाली होती; पण अण्णांनी संपादक म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारली, तीन महिने कारावास भोगला व वृत्तपत्रसृष्टीमध्ये नैतिकतेचा एक इतिहास घडवला.
मी किती तरी कार्यकर्ते झटपट मोठे झालेले बघितले. त्यांचे महालासारखे बंगले उभे राहिले. दारामध्ये कुर्रेबाज मोटारी उभ्या राहिल्या. गळ्यामधल्या जाड सोनसाखळीबरोबर चेहºयावर गुर्मीही आली; पण अण्णा होते तसेच राहिले. त्यांचे कपडे बदलले नाहीत, घर बदलले नाही की आतला माणूसही बदलला नाही. शेवटपर्यंत ते आमच्या शेजारच्या सोन्देकाकांकडे चालत जात. गुलमंडीवर गोविंदभाई श्रॉफांकडे जात असत. समाजजीवनात आणि पत्रकारितेमध्ये साधनशुचितेचा, स्पष्टवक्तेपणाचा आणि साध्या राहणीचा आदर्श म्हणजे अण्णा हे समीकरण आजही माझ्या मनात कायम आहे.

shraddhabelsaray@yahoo.com
संचालक, माहिती व जनसंपर्क