आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमाना निवेदकांचा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बोलणा-याचे दगडही विकले जातात, न बोलणा-याचे हिरेसुद्धा पडून राहतात’ अशी म्हण आजकाल सर्वच ठिकाणी लागू होते. सध्याचे युग जाहिरातीचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती आणि ग्राहक यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे सूत्रसंचालक असतो. टीव्ही चॅनल, एफएम, आकाशवाणी यांसारखी प्रसारमाध्यमे असोत वा उत्सव समारंभ, सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात जान येते. किती वेळा तर रटाळ कार्यक्रमही चुणचुणीत सूत्रसंचालकांमुळे सहज लोकप्रिय होतात. नीटनेटका साजेसा पोशाख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, स्पष्ट उच्चार, आवाजातल्या चढ-उताराची जाण, ओघवती हलकीफुलकी मनोरंजक भाषाशैली, विषयाला अनुसरून अचूक शब्दमांडणी, समयसूचकता व भाषेवरचे प्रभुत्व हे सर्व गुण असलेली व्यक्ती यशस्वी निवेदक होऊ शकते. पूर्वी सभासमारंभात ठराविक चाकोरीबद्ध सूत्रसंचालन केले जायचे. अवजड आलंकारिक शब्दरचना करणे म्हणजेच उत्तम सूत्रसंचालन मानले जायचे; पण अलीकडे ही संकल्पना मोडत सहज बोलता बोलता सामान्य वाक्यरचनेतून प्रभावी व हृदयस्पर्शी सूत्रसंचालन केले जाते.
आता तर रेडिओ जॉकीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणा-या संस्था पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत उपलब्ध आहेत. आकाशवाणी, प्रसारभारतीद्वारेसुद्धा नैमित्तिक उद्घोषकांना निवेदनाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रसारमाध्यमांच्या प्रशिक्षणात निवेदनाबरोबरच तेथील अत्याधुनिक यंत्र वापराचे शिक्षणही देतात, तर अनुभवी तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी या विषयावर कार्यशाळा घेऊन नवनवीन कलाकार घडवत असतात.
चौसष्ट कलांपैकी एक ही कला आता व्यवसाय म्हणून नावारूपाला आली आहे. शाळेच्या वा महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धा गाजवलेल्या व्यक्तींनी या क्षेत्राचा आता करिअर किंवा साइड बिझनेस म्हणून विचार करणे काहीच वावगे नाही. मला आठवते, माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की आकाशवाणीत नैमित्तिक उद्घोषिकेसाठी म्हणजेच कॅज्युअल अनाउन्सरची टेस्ट आहे. चलशील का? काय तयारी करायची हे काहीच माहीत नव्हते. पण लहानपणापासून जळगाव केंद्र व विविधभारती ही दोन्ही केंद्रे सतत ऐकण्याचे वेड होते. ऑडिशनला गेल्यावर... तीनशे अकरा अंश पाच मीटर्स, अर्थात नऊशे त्रेसष्ट किलोहर्ट्झवर आकाशवाणीचे हे जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत. आमच्या सायंकालीन सभेत आपले स्वागत आहे. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी... असे धाडधाड एका दमात सहज बोलून गेले. आणि परीक्षकांकडून कौतुक केले गेले. आणि संधी मिळाली. अनेक वर्षे जळगाव आकाशवाणीवर नैमित्तिक उद्घोषिका म्हणून काम करताना प्रसंगावधान कसे राखावे हे काळाने शिकवले. सुरुवातीला नुसत्या दहा-पंधरा सेकंदांच्या उद्घोषणेसाठी फेडर ओपन करताना म्हणजेच बोलण्याचा माइक सुरू करण्याचे बटन उघडताना हृदयात प्रचंड धडधड व्हायची. आपल्यासमोर फक्त माइक आणि कॉन्सोल नसून लाखो श्रोते रेडिओला कान लावून बसलेले असल्याचे जाणवून ती भीती वाटायची. हळूहळू संवाद कौशल्य अवगत केले आणि भीती पळाली. मंगलाताई खाडिलकर हे माझे प्रेरणास्थान. निवेदनक्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. पाठांतर व वक्तृत्व स्पर्धांतून शालेय जीवनापासून एक एक पाय-या चढत आज त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान बनल्या. मंगलाताई, सुधीर गाडगीळ, प्रवीण दवणे, प्रदीप भिडे यांची निवेदने आवर्जून न चुकता ऐकली. त्यांच्या भेटी घेऊन बारकावे समजून घेतले. एकेकाळी स्टेजवर उभे राहावे लागले तर फक्त डोक्यावरच्या फॅनकडे पाहून बोलणारी अथवा गाणे म्हणणारी ही तीच शुभदा का म्हणून मैत्रिणी व शिक्षकही आश्चर्याने तोंडात बोटे घालतात. अलका कुबल यांनी तर सूत्रसंचालनाचे कौतुक केले. प्रिया बेर्डे, संजीवनी भेलांडे, रवींद्र बेर्डे यांची दिलखुलास मुलाखत त्या बळावरच घेता आली तर ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सुरुवातीचे ऐतिहासिक निवेदन हजारो प्रेक्षकांच्या समोर आत्मविश्वासाने करता आले. निवेदनाचे क्षेत्र म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी. एका कार्यक्रमात अनेक ठिकाणची आमंत्रण येतात. आजकाल लग्न, मुंजी, एकसष्टी, वाढदिवस, बारसे, उद्घाटन पुरस्कार, गौरव सोहळा, स्नेहसंमेलने, कविसंमेलन, साहित्य संमेलन, गाण्याच्या मैफली, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम कोणताही कार्यक्रम असो, दर्जेदार निवेदकांना मागणी असते. सूत्रसंचालनातून इतरांवर छाप तर पाडता येतेच; पण मान व धन दोन्हीचा चांगला लाभ होतो. निवेदकाला वय नसते. चार-पाच वर्षांच्या वयापासून पुढे खुमासदार शैलीत निवेदन करणारी मुलेही मी पाहिली आहेत. स्त्रियांना तर सुंदर आवाजाचे परमेश्वरी दान आहे. म्हणूनच करिअर म्हणून या क्षेत्राचा मुली व महिलांनी जरूर विचार करावा.