आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्तीचा शब्दजागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तुषारला खूप वर्षांपासून ओळखतो. ‘मुक्तांगण’मुळे मी त्याच्यासारख्या अनेक व्यसनींशी जोडला गेलेलो आहे. त्याच्यासारख्या अनेकांचं आत्मकथन ऐकलेलं आहे. त्यामुळे तुषारचं काय किंवा अन्य व्यसनी मित्रांचं काय; आयुष्य कसं असतं, हे मला पुरेसं माहीत आहे. पण ‘नशायात्रा’ या पुस्तकात तुषारने जितकं सविस्तरपणे लिहिलं आहे, तितक्या तपशिलाने ते मला कुणी सांगितलं नव्हतं. त्यामुळे या व्यसनी मुलाची असहाय फरफट वाचताना, मला किती क्लेश होत होते! त्याचं हे लिखाण वाचल्यावर मी किती दिवस अस्वस्थ होतो... विचार केला, वाचणार्‍याला इतके क्लेश होत असतील, तर त्याच्या कुटुंबाला किती झाले असतील! तेही त्यांचा काही अपराध नसताना!

स्वत:च्या व्यसनी आयुष्याबद्दल तुषार त्याच्या ब्लॉगमध्ये लिहीत होता, ते मी वाचत होतो. तेव्हाही मनाला हादरे बसत होते. वाटत होतं, अरे, या तुषारचा-आपला किती वर्षांचा परिचय! पेशंट म्हणून हा ‘मुक्तांगण’मध्ये आला, बरा झाला, मग तिथेच काम करू लागला. त्यानंतर अलीकडे नागपूरच्या ‘मैत्री’ व्यसनमुक्ती केंद्रातही आपण त्याचं काम पाहत आलो. पण त्याच्या जीवनात असं हलाहल भरलेलं आहे, हे आपल्याला माहीतच नव्हतं!

आठवतोय... तो आमच्या म्युझिक थेरपीमध्ये गोड गळ्याने गाणं म्हणतोय, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’! किती हा विरोधाभास! काय त्याचं वय आणि काय ते बहकणं! आधी गांजा आणि नंतर ब्राऊन शुगर ऊर्फ गर्द. कितीदा भानावर आलाय आणि कितीदा परत त्या गर्दच्या ओढीने गाळात गेलाय. त्यासाठी पैसे, त्यासाठी घरी आईसमोर आरडाओरडा, त्यासाठी चोर्‍याही... एका मध्यमवर्गीय कुटुंबावर केवढी ही आपत्ती!

का असा तो भरकटला? नेहमीची उत्तरं. आईवडलांचा दोष. कडक आईवडील. त्यांच्यात होणारी भांडणं, घटस्फोट... पण यातलं त्याच्या घरात काहीही नव्हतं. याचा पुरावा म्हणजे त्याचा भाऊ. तो याच वातावरणात वाढला. सगळं तसंच असून तो चारचौघं जातात, त्या वाटेने गेला. जेव्हा एकाच आईवडलांपोटची मुलं वेगळी निघतात, तेव्हा मुलांमध्ये, त्यांच्या व्यक्तित्वात काहीतरी वेगळं असलं पाहिजे. काय असेल ते?

असं वेगळं व्यक्तित्व घेऊन तुषार आला असेल, तर मग गेली बरीच वर्षं तो चांगल्या वाटेने का जाऊ शकतोय पत्नी, मुलासह? लहान तरुण वयात मित्रांच्या नादाने तो बहकत गेला, असं या लिखाणावरून दिसतं. म्हणजे ‘पियर ग्रुप प्रेशर’. समवयस्कांचा अनिवार्य प्रभाव... पण याच वातावरणात सगळे असूनही, ते सगळेच का नाही ड्रग अ‍ॅडिक्ट होत? मीही लहानपणी सिगारेट ओढून पाहिली होती, पण ती कशी, कधी सोडून गेली, ते कळलंही नाही. कॉलेजात असताना अधूनमधून ड्रिंकही घेतलं आहे. पण एका मित्राचा अतिरेक पाहून त्या पेयाची जशी ओकारीच आली. आजही दारूचा वास आला तरी तो मित्र (जो आज हयात नाही) आठवतो आणि तसाच ‘नॉशिया’ येतो. अनेकांनी असे अनुभव घेतले असतील. त्या वयात सगळ्याचंच कुतूहल वाटत असतं. पण काहींचं ते सेवन पिकल्या पाना-फळांप्रमाणे गळून पडतं आणि काहींच्या बाबतीत त्या आकर्षणाचं गुलामीत रूपांतर होतं.

आकर्षणाचं गुलामीत रूपांतरित होणं, हे त्या अमली पदार्थांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं काय? तुषारच्या बाबतीत असं म्हणायला जागा आहे. कारण त्याच्या व्यसनाच्या गाडीला गांजाचं स्टेशन फार लवकर लागलं. गांजा, हशीश हे मारुवाना वनस्पतीपासून तयार होतात. भारतीय हवामानात सहज येणारी ही वनस्पती. अनेक साधू, बैरागी चिलमीत घालून गांजा ओढत असतात. असं व्यसन तुषारला त्याच्या ऐन तारुण्यात लागावं, याला काय म्हणावं?

1980च्या दरम्यान आपल्याकडे गर्द मिळू लागलं. गर्दच्या व्यसनात भावनांचे असे चढउतार फारसे नाहीत, पण असते ती गुलामी. व्यसनी माणसाच्या जीवनाचा गळा शांतपणे आवळत जाणारी. ती पावडर मिळाली नाही की सुरू होतो जीवघेणा शारीरिक त्रास. तो टाळण्यासाठी, पैसे उभे करण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. अशी ही गुलामी असते. या गुलामीचा विळखा तुषारभोवती पडला आणि त्यातून परत फिरण्याच्या वाटाच जशा बंद झाल्या.

हे सारं कसं घडलं, हे तुषारने या आत्मकथनात लिहिलं आहे. तुषारची भाषा थेट आहे. जसं घडलं तसं त्याने सांगितलं आहे. कुणाला काय वाटेल, आपली बदनामी होईल का, असा जराही विचार न करता लिहिलेलं हे लिखाण आहे. कदाचित ‘मुक्तांगण’ आणि ‘अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस’मध्ये ज्या प्रामाणिकपणे ‘शेअरिंग’ केलं जातं, त्याचा हा परिणाम असावा. कधी मी कसं भोगलं बघा, असं वाचकाला इम्प्रेस करणंही नाही किंवा वास्तवाचं भयंकरीकरणही (हा शब्द डॉ. आनंद नाडकर्णींचा) नाही. या गर्तेतून हा प्रामाणिकपणाच माणसाला वाचवू शकतो. जेव्हा माणूस वस्तुस्थिती स्वत:हून मान्य करतो, तेव्हा तो बदलाचा क्षण असतो. पुढे इतरांच्या मदतीचे रस्ते खुले होतात. कुणी त्याला अनुभवातून शिकवतो, कुणी शास्त्रातून...

तुषारचं हे पुस्तक ही व्यसनमुक्ती साहित्यात पडलेली भर आहे. दिवसेंदिवस व्यसनं वाढत आहेत, व्यसनांच्या नव्या प्रकारांची भर पडते आहे. व्यसनींची संख्या वाढते आहे. ‘मुक्तांगण’मधली पूर्वीची तीस ही संख्या आता दीडशेच्या वर वाहते आहे. तरी प्रतीक्षा यादी आहेच. स्त्रियांमध्ये व्यसनं नाहीत, असं आधी म्हटलं जायचं. आता फक्त स्त्रियांसाठी आम्हाला ‘निशिगंध’ केंद्र काढावं लागलं आहे. पण या पुस्तकाच्या वाचनामुळे सगळ्या समाजाचे डोळे खाडकन उघडावेत. जे व्यसनी आहेत, त्यांना व्यसनांतली दाहकता या पुस्तकामुळे तीव्रतेने जाणवावी, जेणेकरून ते उपचारांसाठी तयार होतील.

...आणि यातले नसलेल्या आपणा सगळ्यांची व्यसनींकडे पाहायची दृष्टी या पुस्तकामुळे बदलावी. ती वाईट माणसं नाहीत; त्यांना योग्य प्रकारे आणि चिकाटीने मदत केल्यास तेही गुलामीतून बाहेर पडतील, ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचावी.
एका चांगल्या माणसाचा जन्म होण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडावं.
- नशायात्रा
- तुषार नातू
- समकालीन प्रकाशन
- पृष्ठे : 174
- मूल्य : 200 रुपये