आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा आमटे यांचे अस्पर्शित कंगोरे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तविक बाबा आमटेंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वावर आतापर्यंत भरपूर लिहून आलेले आहे. त्यात प्रथितयश लेखक आहेत, समाजधुरीण आहेत, अगदी राजकीय नेतेदेखील आहेत. परंतु विलास मनोहर यांनी बाबा आमटे यांच्या सहवासात थोडीथोडकी नाही, तर जवळपास तीसेक वर्षे घालवली आहेत. या कालावधीत आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा ‘मला (न) कळलेले बाबा’ या पुस्तकात वाचायला मिळतो. विलास मनोहर हे बाबांच्या सहवासात 1975 पासून आले, त्यांनी स्वत:हून हे काम स्वीकारले आणि ते बाबांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत अथकपणे निभावले. अर्थात, नुसते निभावले नाही तर आनंदाने पार पाडले.

बाबा आमटे यांच्यासारखी व्यक्ती शब्दांत पकडता येण्यासारखी नाही. तरीही मनस्वी, ठरवलेल्या ध्येयापासून जराही न ढळणारे, संपूर्णपणे शास्त्रोक्त विचार अंगीकारून त्यानुसार कार्याची आखणी करणारे असे बाबा आमटेंचे स्वभावविशेष पुस्तकात जागोजागी वाचायला मिळतात. दिवसाचे 24 तास बाबांच्या सहवासात राहिल्याने, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अस्पर्शित कंगोर्‍यांचे दुर्मिळ चित्रण विलास मनोहर यांच्या या पुस्तकात आले आहे.

या पुस्तकाचा लेखक जेव्हा बाबांच्या सहवासात आला, तेव्हा बाबा आमटे हे आनंदवन सोडून हेमलकसा येथील प्रकल्पात गुंतायला लागले होते; तसेच पुढे पंजाबमधील अशांतीच्या काळात ‘भारत जोडो’ अभियानाशी जोडले गेले होते. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाबद्दल बरेच, तर्क/वितर्क अन्य पुस्तकांतून वाचायला मिळतात. परंतु या अभियानामागील बाबांची मूलभूत भूमिका आणि त्यामागील खास विचार, याबद्दल मनोहरांच्या पुस्तकात अतिशय सविस्तरपणे वाचायला मिळते. पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची उग्र चळवळ सुरू होती. याच कालखंडात पंजाबपासून बाबा आमटे यांनी ‘भारत जोडो’ या शांती यात्रेला सुरुवात केली, तेव्हा त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. मात्र तरीही बाबांनी निर्धाराने शांती यात्रा काढली. जे नवीन कार्य सुरू करायचे, त्याचा जमेल तसा सर्वांगाने विचार करूनच आरंभ करायचा, हे बाबा आमटेंचे खास वैशिष्ट्यच होते. कार्यामागील शास्त्राधार तर जाणून घ्यायचाच; परंतु त्याचबरोबर गांधीजींची निर्भय आणि करुणा वृत्ती त्या विचारात मिसळून टाकायची, ही त्यांची कार्यशैली होती.

बाबांच्या निर्भयतेचे तर असंख्य प्रसंग या लेखनात आढळतात. अमृतसरमधल्या मंदिरात राहताना आपल्या वागणुकीने, बोलण्याने बाबांनी तिथल्या शीख धर्मीयांची मने कशी जिंकून घेतली आणि त्याचा पुढे तिथे शांतता प्रस्थापित होण्यास किती उपयोग झाला, याचे पुस्तकातील वर्णन मुळातूनच वाचण्याइतके मनोवेधक झाले आहे.

भारत जोडो पदयात्रेच्या वेळी बाबा आमटे यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. तरीही ध्येयवादी वृत्तीने हाती घेतलेल्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन ही पदयात्रा तडीस नेण्याचा प्रयत्न बाबा आमटे यांनी कसा केला, त्याचा आलेख विलास मनोहरांनी आपल्या लेखनातून उभा केला आहे. या पुस्तकात प्रत्येक प्रसंगाला साजेशा अशा बाबांच्याच कवितासंग्रहातील वेचक ओळींचा संदर्भ चपखलपणे दिला आहे. त्यामुळे तो प्रसंग आणि त्यातील विखार किंवा वेदना आपल्या मनाला भिडतेच; पण त्याचबरोबर त्यामागील निखळ काव्यदृष्टीदेखील आपल्याला चकित करते. बाबा किती निर्भय होते, याचा एक प्रसंग इथे सांगणे जरुरीचे आहे. 1984 नंतर इंदिराजींची हत्या झाली आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शिखांचे नृशंस हत्याकांड झाले. त्याच वेळी बाबा आमटे दिल्लीत आले असताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींची भेट घेतली. तेव्हा खुद्द दिल्ली अतिशय असुरक्षित झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी, ‘मी आपल्या संरक्षणाची काही व्यवस्था करू का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर बाबा आमटे यांनी ‘जर का तुम्हाला दिल्लीतील शिखांचे संरक्षण करता येत नसेल तर मी त्यातील शंभर-दीडशे शिखांना आनंदवन इथे घेऊन जातो!! आनंदवनाला त्यांचा अजिबात भार होणार नाही!!’ असे निर्भीड उत्तर राजीव गांधी यांना दिले. असे परखड मत व्यक्त करायला जे मोठे धैर्य लागते, ते बाबा आमटे यांच्याकडे होते...
बाबांच्या अंगी कार्यकर्तेपण किती भिनले होते, याचा एक दाखला मनोवेधक आहे. जेव्हा बाबा अखेरच्या आजारात अंथरुणावर खिळून होते, त्या वेळीही भामरागड किंवा हेमलकसा इथल्या प्रकल्पांना भेट द्यायचे विचार त्यांच्या मनात सुरूअसत. सामाजिक कार्य करताना प्रसिद्धी मिळाल्यावर अनेकांचे पाय जमिनीवरून सुटतात आणि मूळ कार्यात अनेक अपप्रवृत्ती शिरून कार्याचा सत्यानाश होतो. पण याबाबत बाबा आमटे यांनी नेहमी दक्षता घेतली होती. विशेषत: पैसा आणि त्या अनुषंगाने होणारे व्यवहार याबाबत ते किती दक्ष होते, याची सविस्तर वर्णने या पुस्तकात वाचायला मिळतात.

अर्थात, या सगळ्या आठवणी वाचताना लेखकाच्या मनात असलेली बाबा आमटे यांच्याविषयीची आदरभावना पदोपदी व्यक्त होत राहते. कितीही झाले तरी बाबा आमटे हे माणूस आहेत आणि त्यांनादेखील इतर माणसांप्रमाणे हर्ष, खेद, विकार, राग इत्यादी गुण, अवगुण असणारच; परंतु दोन-तीन प्रसंग वगळता त्याबाबत फारसे काही वाचायला मिळत नाही. आणि असे जे थोडके प्रसंग या पुस्तकात आले आहेत, तेदेखील फारच त्रोटक स्वरूपात लिहिले आहेत. अर्थात, हा काही या पुस्तकाचा अवगुण मानता येणार नाही. परंतु बाबा आमटे हे एक व्यक्ती म्हणून समजून घ्यायचे झाल्यास, व्यक्तीच्या दोन्ही बाजू प्रकाशात आल्या असत्या, तर हे पुस्तकलेखन अधिक संतुलित झाले असते.
पुस्तकाचे नाव : मला (न) कळलेले बाबा
लेखक : विलास मनोहर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या : 172
मूल्य : 160 रुपये
पुस्तक ओळख