आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक आस्‍वादक साहित्‍य उकल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयवंत दळवींच्या साहित्य लेखनाचा आवाका चक्रावून टाकणारा आहे. त्यातल्या घटना, त्यातली पात्रं आणि परस्परव्यवहार अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. हा गुंता अलगदपणे सोडवून कुतूहलपूर्ती करणारे आस्वादक लेखन हा संजय कळमकर लिखित प्रस्तुत ग्रंथाचा गुणविशेष आहे.
 
साहित्यावरील किंवा साहित्यसंबंधाने केलेली चिकित्सा ही साहित्याची सर्वांगीण समीक्षा असते. गुणदोषात्मक चिकित्सा करून, आस्वादपूर्वक साधलेली मूल्यमापनात्मक निर्णयप्रक्रिया असे तिचे स्वरूप असते. सामान्य संशोधनपद्धतीनुसार अभ्यासकाने तटस्थतापूर्वक केलेली ती पाहणी असते. या प्रक्रियेत संशोधक चोखंदळ आणि तटस्थ आस्वादक असतो; तसाच तो ललितसाहित्याचा निर्णय देणारा पंचही असतो. पंच स्वतः खेळाडू असतोच, असे नाही. परंतु खेळाडू त्यातही नावाजलेला असेल; तर त्याने केलेल्या निरीक्षणाला भावयित्री प्रतिभेचे परिमाणही लाभते. याच दृष्टीने डॉ. संजय कळमकर यांच्या ‘दुःखाची स्वगते’ या पुस्तकाला सन्मुख होणे आवश्यक वाटते.
 
‘दुःखाची स्वगते’ हे ‘जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास’ या संदर्भाने पुणे विद्यापीठात सादर केलेल्या प्रबंधावरील पुस्तक आहे. डॉ. कळमकर वृत्तीने शिक्षक. विनोदी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपटकथा आणि स्फुटलेखन यात त्यांची लेखणी मुराद संचार करते आहे. अमोघ वक्तृत्वाची दैवी देणगी प्राप्त असलेल्या या ‘हास्यसम्राटा’ची प्रतिभा हसवता हसवता, वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते.  याची साक्ष त्यांची ‘बे एके बे’, ‘चिंब’, ‘भग्न’, ‘उद्ध्वस्त गाभारे’, ‘कल्लोळ’, ‘अंतहीन’, ‘सारांश’ आदी पुस्तके देतात. असा प्रथितयश प्रतिभावंत जेव्हा संशोधकाच्या नजरेने  ताकदीच्या प्रतिभावंताला भिडतो तेव्हा त्याचे प्रबंधलेखनदेखील संशोधनाच्या शिस्तीत आस्वादकाची मूल्ये सांभाळत प्रकटते.
 
मनोगतात डॉ. कळमकर जयवंत दळवींच्या घरी जाऊन आल्याचा उल्लेख करताना लिहितात की, ‘आम्ही घरभर फिरलो. दळवी लिहिण्यासाठी बसायचे, ती लाकडी फळ्यांची माडी, लेखनाची खुर्ची, माडीच्या उघड्या खिडकीतून दिसणारा निसर्ग, माकडांचा उच्छाद, करकरणारा जिना, काळोखे माजघर, अरुंद विहीर, परसबाग हे सारे पाहताना दळवींचे अस्तित्व मनाला कुठेतरी स्पर्श करीत असल्याचा भास होत होता.’ यातून कादंबऱ्यांतून अनुभवलेले दळवी आणि वस्तुमात्रांतून दळवीत्व अनुभवण्याची लेखकाची  ओढ प्रकट होते. पुढे जाऊन  दळवींच्या कादंबऱ्यांना भिडताना कादंबरी वाङ््मयप्रकाराचा स्वभाव चिकित्सकपणे मांडण्यास डॉ. कळमकर चुकत नाहीत. दळवींच्या कादंबऱ्यांची चिकित्सा करण्याआधी; दळवींचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याची उत्सुकताही ते दाखवतात. हे करत असताना दळवींचे आत्मप्रकटीकरणात्मक विचार आवर्जून विचारात घेतात. किंबहुना, डॉ. कळमकरांना दळवींविषयी अपार कुतूहल आहे; हे त्यांनी मनोगतात, ‘जवळजवळ सर्वच कादंबऱ्या मी अधाशासारख्या वाचून काढल्या,’ हे मोकळेपणाने सांगून स्पष्टच केले आहे. त्यामुळे समीक्षकांच्या नजरेतून दळवी अभ्यासताना ‘दळवींचे समग्र कादंबरीलेखन म्हणजे, अशा नात्यांचा उभा-आडवा छेद आहे’ हा निष्कर्ष ते अधोरेखित करतात. त्याचबरोबर ‘समाजप्रबोधनाचा संदेश नकळत त्यांच्या साहित्यातून प्रकट झाला आहे’ या निष्कर्षावरही लक्ष केंद्रित करतात.
 
पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या ‘चक्र’, ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘स्वगत’, ‘महानंदा’, ‘अथांग’, ‘वेडगळ’, ‘सावल्या’, ‘प्रवाह’, ‘धर्मानंद’, ‘आल्बम’, ‘अधांतरी’ आदी एकूण २२ कादंबऱ्या अभ्यासासाठी निवडून त्यांचा आशयनिष्ठ विचार  करताना ते निष्कर्ष मांडतात की, ‘दळवींच्या कादंबरीला सामाजिक आशय आहे. पण त्यातही मनाचा शोध हाच त्यांच्या कादंबऱ्यांचा स्थायीभाव आहे.’ ते म्हणतात, ‘मानवी स्वभावाचे गूढ हे कधीच न उलगडणारे कोडे आहे.’ ‘अनेक प्रश्नांच्या माध्यमातून निरनिराळ्या मानवी कृतींचा घेतलेला शोध म्हणजे दळवींचे समग्र कादंबरीलेखन आहे.’ एकूणातच विजोड संसाराचे चित्रण, वेड्यांचे चित्रण, विफल प्रेमाचे चित्रण करीत करीत दुःख आणि वेदनेची टोकाची रूपे चित्रित करतानाही; लैंगिक संबंधातून निर्माण होणारे वैफल्य या विषयाची चित्रे या संदर्भात दळवींनी चितारलेल्या वारंवारितेकडे लक्ष डॉ. कळमकर लक्ष वेधतात.
 
दळवींची व्यक्तिचित्रणे पाहिली, तर ती शारीर दर्शन आणि संवेदनेला अधिक महत्त्व देते; हे सोदाहरण मांडून; देहदर्शन आणि लैंगिक संबंधातील सवंगता दळवी कसे टाळतात याकडे कळमकरांनी या पुस्तकाद्वारे वाचकांचे लक्ष वेधले आहे. मात्र ‘जयवंत दळवी स्त्री-पुरुषातील शारीरिक आकर्षणाचे गूढ अनेक बाजूंनी मोकळेपणाने तपासतात.’ तसे करताना, शारीरिक आकर्षणाचे गूढ उकलताना स्त्री-पुरुषांच्या ठराविक अवयवांचे वर्णन पुन्हा पुन्हा येत राहते, हे सांगायलाही ते विसरत नाहीत.
 
दळवींच्या कादंबऱ्यांतील पात्रांच्या स्वभाव आणि वर्तन, लकबी आणि शारीर आकार, हालचाली यांचा व्यक्तिचित्रणांच्या स्वरूपात अभ्यास करीत डॉ.कळमकर थेट या बाह्य गोष्टींमागे दडलेल्या मनांपर्यंत पोहचतात आणि त्या पात्रांची मनोविश्लेषणात्मक चिकित्सा करतात. मानसिक घडण, लैंगिक समस्यांशी संबंध, नैतिक परिमाणांचा मनावरील परिणाम तपासताना दळवींच्या व्यक्तिमत्त्वातील त्यांच्या मनःपिंडाचा विचारही डॉ. कळमकर करतात. यामुळे आविष्कृत व्यक्तिचित्रणाला दळवींच्या अनुभवसंचिताचे आणि मनोभूमिकेचे परिमाण मिळते, हेही ते विचारात घेतात. मनोविश्लेषण करताना सोदाहरण उकल करण्याचा  डॉ. कळमकर यांचा अट्टाहास दिसतो. त्यामुळे त्यांनी केलेले मनोविश्लेषण कुतूहल शमविणारे तर होतेच, परंतु विश्लेषणाला प्रयोगनिष्ठतेचे परिमाण लाभते. त्यातूनच दळवींच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाला यथायोग्य न्यायही मिळतो. दळवींनी चित्रित केलेली माणसे पुरोगामी किंवा प्रतिगामी नाहीत. ती माणसे आहेत. ती अनिवार्य परिस्थितीतून आकारलेल्या मनोवृत्तीने आविष्कृत होणारी आहेत, याकडे डॉ. कळमकर वाचकांचे आवर्जून लक्ष वेधतात. दळवींच्या माणूस म्हणून मूल्य जोपासण्याच्या आग्रही भूमिकेचे ते स्पष्टीकरण करतात. त्याचबरोबर दळवींच्या व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा, पात्रांच्या व्यक्तिमत्त्वातून कशा प्रकट होतात आणि ती पात्रेही त्याच मर्यादांमध्ये कशी आविष्कृत होतात; याची वेधक समीक्षा डॉ. कळमकर या ग्रंथाद्वारे करतात.
 
या प्रबंधाच्या निमित्ताने डॉ. कळमकरांनी दळवींच्या कादंबऱ्यांच्या भाषिक अवकाशाचा आणि भाषाशैलीचा तसेच भाषाघटनेचाही मोठ्या साक्षेपाने विचार केलेला दिसतो. तसेच वर्णने, निवेदने, संवाद, उल्लेख यांसाठी ज्या तऱ्हेने भाषेचा वापर दळवींनी केला आहे, या सर्व मांडणीतील नाट्यमयता कळमकरांना महत्त्वाची वाटते. देहबोली आणि शाब्दबोली या दोन्हींची परिणामकारक सांगड दळवी घालण्यात यशस्वी होतात, हे त्यांच्या शैलीचे सामर्थ्य डॉ. कळमकर अधोरेखित करतात. भाषेतील इंग्रजी, हिंदी, कोकणी शब्दांचा स्वाभाविक उपयोग मराठी भाषेला कितपत साधकबाधक ठरतो; याचा अभ्यासही येथे दिसतो. स्वाभाविकता आणि प्रवाहीपणा, अनलंकृतता आणि सोपेपणा, चटकदारपणा आणि चटपटीतपणा या भाषाउपयोजन वैशिष्ट्यांकडे डॉ. कळमकर वाचकांचे लक्ष वेधून घेतात.
 
चिकित्सेच्या अशाप्रकारच्या नावीन्यपूर्ण मांडणीमुळे प्रबंधलेखन असूनही यास आस्वादमूल्य प्राप्त झाले आहे. अशा वेळी अभ्यास आनंददायक घडावा, यापेक्षा अधिक प्रबंधाची यशस्विता कोणती? डॉ. संजय कळमकर हे एक यशस्वी विनोदी साहित्यिक प्रभावी वक्ते आहेतच. तेवढेच ते साक्षेपी, सहृदयी, चोखंदळ आणि तटस्थ रसिक संशोधक आहेत, हे त्यांच्या प्रबंधलेखनाने अधोरेखित केले आहे.
 
पुस्तकाचे नाव : दुःखाची स्वगते
लेखक : डॉ. संजय कळमकर
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे : ३१८, किंमत : रु. ४००/-
 
- अनिल सहस्रबुद्धे, अहमदनगर
usahasrabuddhe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...