आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anita Joshi Article About Annapurna And Chaitra Gaur

चैत्रांगणातील अन्नपूर्णेकडून काय शिकाल ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्सव हे भारतीय संस्कृतीचे प्रधान अंग आहे. ही संस्कृती प्राचीन परिवर्तनशील आणि सर्वसमावेशक अशी आहे. प्रारंभी मानवाने निसर्गाच्या विविध रूपांना देवता मानून त्यांची स्तुती केली. या स्तुतीने निसर्ग प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतो, अशी धारणा होऊन दैवतशास्त्र उत्क्रांत झाले. पूर्वीचे निर्गुण निराकार देव पुराणकाळात सगुण रूपात साकार झाले. हाच संबंध ऋतुत्सव आणि सण यांच्यात आहे. निसर्गाच्या विविध रूपांप्रमाणेच ऐच्छिक फल प्राप्त करून देणा-या देवताही निरनिराळ्या. आणि त्यांच्या कथा तर अतिशय रोचक. यात अनेक रूढी- परंपराचाही समावेश असतो. या रूढी-परंपरा उदयाला येण्यामागे निश्चितच काहीतरी दृष्टिकोन असणार. पण बरेचदा यातील केवळ रूढी-परंपरेची दृष्टी पुढे येऊन त्यामागचा दृष्टिकोन मागे पडलेला दिसतो. हा दृष्टिकोन प्रत्येक वेळी शास्त्रीयच असेल असे नाही तर तो कधी नैतिक अथवा सामाजिकही असतो.
वसंत ऋतूतील हा महिना आहे. या ऋतूत औषधी उत्पन्न होतात. वनस्पतींना फुले, फळे येतात, असे वर्णन शतपथब्राह्मणात केले आहे. आदिकवी वाल्मीकी म्हणतात, ‘वसंत वायू-वृक्षांना नाचवतो. कोकिळांना गायला लावतो आणि गिरिकंदात घोष घुमवून संगीतसभा भरवतो. वृक्षांवरील भ्रमरांचा गुंजारव ऐकून वाटते, की हे वृक्षच अंतरीची प्रसन्नता गीतातून व्यक्त करीत आहेत.’ अशा या प्रसन्न वातावरणात झोक्यावर बसून हिंदोळे घ्यावे, असे प्रत्येकाच्याच मनात येते हे निश्चित.

चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत एक महिना शिवपार्वती विष्णू इ. देवांना दोल्हा-यात बसवून चैत्रोत्सव साजरा करतात. देवापुढे अथवा दारात ‘चैत्रांगण’ रांगोळी काढली जाते यात चौकोनात मधोमध उत्सवमूर्ती आणि त्यांच्या सभोवती सूर्य, चंद्र, गोपद्म, शंख, चक्र, गदा, ज्ञानकमळ तुळस, कासव, हत्ती, स्वस्तिक आदी शुभचिन्हे चितारली जातात. पार्वतीचे रूप असणारी अन्नपूर्णा म्हणजेच चैत्रगौर या महिन्यात माहेरी येते आणि आपल्या आईकडून सर्व प्रकारचे कौतुक करून घेते, मैत्रिणींबरोबर खेळते, झोक्यावर झुलते आणि अक्षय्य तृतीयेला परत सासरी जाते अशी समजूत आहे. या गौरीला वस्त्रालंकारांनी नटवून दोल्हा-यात बसवले जाते. नाना प्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून छान आरास करून पूजा करतात. कारण ती अन्नपूर्णा आहे. पन्हे, कैरीची डाळ, कलिंगड, खरबूज या प्रकारच्या अन्नाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. म्हणजेच एकंदरीत निसर्ग आणि शरीर यांच्यात संतुलन राखण्याचा हा एक उपाय असतो.

अशी ही अन्नपूर्णा भद्रपीठावर पद्मासन घालून बसली आहे. उजव्या हातात पळी/ चमचा आणि डाव्या हातात वाटी आहे. भद्रपीठावर उजवीकडे शिवलिंग आणि डावीकडे स्वचिन कमंडलू आढळतो. डोक्यावर मुकुट, हारसूत्र, ग्रीवासूत्र आदी अलंकाराने अलंकृत अशी ही अन्नपूर्णा. पार्वतीने हे रूप कधी घेतले याची एक सुंदर कथा आहे. ‘शिव भिक्षाटन करून आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असे. एक दिवस त्याला पुरेशी भिक्षा मिळाली नाही आणि त्याचा परिवार उपाशी राहिला. त्या वेळी नारदमुनी कळ लावायला आले. त्यांनी शंकराला सांगितले.’ ‘पार्वतीच्या अशुभ पायगुणामुळे हे दैन्य आले आहे.’ आणि पार्वतीला सांगितले, ‘शिव दुर्भागी असल्यामुळे तुझी अशी उपासमार होत आहे.’ पार्वती दुस-या दिवशी काही न बोलता शिवाच्या आधी भिक्षेला जाते. तिला खूप भिक्षा मिळते आणि ती कुटुंबाला पोटभर जेवू घातले. त्या वेळी शिव प्रसन्न होऊन तिला म्हणाला, ‘तू अन्नपूर्णा आहेस.’ या कथेत शंकर आणि पार्वती दोघांमध्येही इगो प्रॉब्लेम नाही. नारदमुनींनी कळ लावली, पण परस्परांवरील विश्वास आणि सामंजस्याने प्रसंग निभावून नेला. याच उद्देशाने नववधूला विवाहप्रसंगी आई-वडील अन्नपूर्णेची मूर्ती देत असावेत. अशा या अन्नपूर्णेसाठी केले जाणारे हळदी-कुंकू म्हणजे आताच्या too much Busy अन्नपूर्णांसाठी get together साठी छानसं निमित्तच नाही का?
anitajoshi14@gmail.com