आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौनाचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजच्या जीवनातली एखादी गोष्ट जेव्हा असहकार पुकारते, तेव्हा आणि तेव्हाच तिचे महत्त्व समजते. दोन दिवसांपासून माझा घसा खवखवत होता. खोकलाही पाठोपाठ येणार असं जाणवत होतं. तरीही नेहमीप्रमाणे थोडं दुर्लक्षच केलं. म्हणजे समजत असूनही आइस्क्रीम खाल्लं.

जेवणानंतर शिरस्त्याप्रमाणे वाटीभर ताकही प्यायले. सकाळी उठताना जाणवलं, घशातून आवाजच फुटत नाहीये. सवयीने डोळ्यासमोर हात धरले आणि ‘कराग्रे वसते’ म्हणायला लागले तर शब्द फुटेनात. कसातरी घरघर आवाज फक्त. स्वरयंत्रानं शब्दच उच्चारायचं नाकारलं. त्याने प्रयत्न केला तर घशाने खरखराट करून निषेध नोंदवला. आवाज बसला होता तर. त्यानंतर घशावर अत्याचाराची मालिकाच चालू झाली. गरम पाण्याच्या गुळण्या! गार्गल म्हणायचं हं पण, गुळण्या काय अगदीच खेडवळ आहे झालं! गरम-गरम चहाचा कप घशाखाली उतरला तरी आवाज काही मोकळा होईना!


स्वयंपाकाच्या मावशी आल्यावर, स्वयंपाक सांगण्याचा प्रकार फारच और होता. ५ पोळ्या, १ भाकरी, कांद्याची पीठ पेरून भाजी आणि टोमॅटोची कोशिंबीर. हे सगळं मी खरखरत, हातवारे करून सांगत होते. त्या मख्ख उभ्या होत्या. माझी झटापटही बघत होत्या. पुन्हा चेहरा इतका मख्ख की माझी चिडचिड व्हायला लागली.
त्या संथपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांच्या मनासारखा स्वयंपाक केला. आवाज काढायची इच्छा होती पण फुटेना. मुलं, नवरा सारे कसे मजेत दिसत होते. आईचा आवाज बंद म्हणून एकमेकांच्या हातावर टाळ्या देत होते. ओला टॉवेल कॉटवर फेकला गेला. रोज काय ओरडायचं, मी गप्पच बसले.

मला बोलता येत नाही हे समजताच शेजारणीपासून मोलकरणीपर्यंत सगळे उपाय सुचवायला लागले. काढा करून प्या. लवंग, मिरे, दालचिनी, जेष्ठमध पाण्यात उकळवायचं आणि अर्धं करायचं. साखर थोडीशीच घालायची.

इकडे मी घसा खाकरून खाकरून हैराण. त्यात आवाज फुटत नव्हता. गवती चहा कुठे मिळेल आणि तो कसा करायचा यावरही व्याख्यान देण्यात आले. शेजारच्या काकू कशा मागे राहतील? ‘दोन दिवस रोज रात्री झोपताना कडकडीत दुधात हळद घालून घे! लगेच फरक जाणवेल. दूध मात्र कडकडीत हवं, नाही तर घेशील कोमट.’

‘बाई चांगला ठेचा खावा. लगेच बरं वाटेल,’ माझी मोलकरीण. मी धसकाच घेतला ठेच्याचा. आमटी उकळताना मिरची वर टांगून जेवढा तिखटपणा येईल तेवढाच खाणारी मी. ठेचा खाणार! बापरे...

‘ते काही नाही, तुम्ही ताबडतोब डॉक्टरना दाखवा,’ यांचा मित्र. हे इन्फेक्शन आहे आणि अँटिबायोटिक्सशिवाय जाणार नाही. मी परत मान हलवली. उभी की आडवी कुणास ठाऊक.
मला काय वाटतंय याचं कुणालाच पडलं नव्हतं. विपश्यना केंद्रात मौन बाळगावं लागतं हे मी ऐकलं होतं. तिथे ते सोपं जात असेल कारण सगळेच मौनात. इथे माझ्या एकटीवर मौनाची सक्ती. बाकी सर्व अघळपघळ बोलणार. माझ्याबद्दल बोलणार, मला न आवडणारं वागणार, कधी एन्जॉय करणार, कधी कीव करणार.

संध्याकाळी सगळ्यांनी मिळून पावभाजी मागवली. विकतचीच कशी चांगली, यावर घरच्या पावभाजीला नाव ठेवून चर्चा केली. मी पण मन लावून खाल्ली. मग उशिराने आइस्क्रीम खाण्याची टूम निघाली. मी पण ठरवलं. माझा घसा बसलाय, बोलता येत नाही, म्हणून जीभ नाराज आहे. तिला का दुखवायचं? ताव मारला आइस्क्रीमवर. मस्त झोप लागते ना गोड खाल्ल्यावर! आणि म्हणून आजचा मौनाचा दिवस उगवला बरं!