आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे वागावे बाईंशी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पुष्पाताई, तुम्ही कधी येताय?’
‘बाई, मी बघते जमलं तर तासाभरात येऊन जाते.’
‘बघते म्हणजे काय? तुम्ही असं कसं काय म्हणता?’
‘अहो बाई, तुम्हाला काय सांगू?’
‘हे बघ काऽऽऽही सांगू नकोस. ताबडतोब ये.’

मी खाडकन फोन आदळला. संध्याकाळी केरळच्या ट्रिपला जाण्यासाठी निघायचे. बुकिंग झाले, सर्व तयारी झाली. तर ही कामवाली म्हणते मी बघते, जमले तर येते. दोन दिवसांचा भांड्याचा ढीग, धुणे पडलेले. पुष्पाताई येऊन गेल्या की, मी मोकळी. पण पुष्पाताईंचे नेहमी काही ना काही कारणाने टप्पे चालूच असतात.
माझा पारा चढलेला पाहून हे जवळ आले. समजूत घालून म्हणाले, ‘आपण शेजारी जोशीकाकूंकडे चावी ठेवून जाऊ. त्या येतील व सर्व कामे करून जातील. तू नको टेन्शन घेऊ.’
काहीतरी उपाय सुचल्याने हायसे वाटले. पुष्पाताईंना पुन्हा फोन करून ठणकावून सांगितले. पुष्पाताईंचा आवाज जरा रडवेला झाल्यावर मगच माझ्या मनाला समाधान वाटले, आणि मग कृतकृत्य झाल्यासारखे वाटून मी फोन खाली ठेवला.
आमची ट्रिप अगदी छान मजेत पार पडली. घरी आलाे. कुलूप उघडून आत आले तर बघितले, पुष्पाताईंनी घर अगदी व्यवस्थित आवरून ठेवले होते. भांडी घासून पालथी घालून ठेवली होती, धुणेही व्यवस्थित चिमटे लावून वाळत घातलेले दिसले. हे सर्व पाहून बरे वाटले.
दुसऱ्या दिवशी पुष्पाताई कामावर आल्या. सहल कशी काय झाली, चौकशी करीत होत्या. ‘काय सांगू बाई, त्या दिवशी लेक आली व्हती माहेरपणाला, नातवाला लई ताप भरला व्हता.’
तिची कहाणी ऐकून माझा राग शांत झाला. ‘अगं जाऊ दे. आता ठीक आहे ना सर्व आणि हे बघ, अशी काही अडचण असली तर मला नीट सांगायचे समजले का?’
‘व्हय ताई.’
कसा वाटला हा किस्सा? ओळखीचा वाटला ना. यापासून काय शिकायचे? आपण आजपासून ठरवू या, आपल्याकडील बाईला घरातलाच एक घटक समजू या. तिच्या अडचणी समजून घेऊ या.