आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसादातून फुलते नाते (अंजली धानोरकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिसादाची जागा प्रतिक्रिया घेते. असे जेव्हा घडते तेव्हा नाती दुरावण्याची पार्श्वभूमी तयार होते. मनं दुखावली जातात आणि त्यानंतर दुरावतात.
म्हणून कुठलंही नातं टिकण्यासाठी, प्रतिक्रियात्मक वागण्याऐवजी प्रतिसादात्मक वागणं महत्त्वाचं.
‘अगं किती वेळ गं! दे ना मला पटकन दूध.’ गुड्डीनं हॉलमधून ओरडून तिच्या आईला सांगितलं अन् दुसऱ्याच क्षणी तिरीमिरीनं आलेली आई तिला दिसली. पण आईच्या हातात दुधाचा ग्लास नव्हताच! त्याबद्दल काही विचारण्यापूर्वीच आई करवादली, ‘एवढं ओरडायला काय झालं तुला? मी रिकामी बसले आहे का? एका पाठोपाठ एक कामं करतेच आहे ना मी?’ इ. इ. आईनं एवढं ओरडायला तिचं नेमकं काय बिनसलं, हे गुड्डीला कळलंच नाही.
खरं तर आईला गुड्डीचा राग नव्हता आला. एरवी तिनं अत्यंत प्रेमानं दूध नेऊन दिलं असतं. पण, गुड्डीनं आवाज देण्याच्या अगदी काही सेकंद
अगोदरच तिच्या हाताच्या कोपराला लोखंडी रॅक जोरदार लागला होता. त्या वेदनांनी ती कळवळत असतानाच तिला गुड्डीचा आवाज ऐकू आला आणि पुढचं सगळं घडलं. वड्याचं तेल वांग्यावर निघालं. गुड्डीच्या मागणीच्या अनुषंगानं तिला प्रतिसाद देण्याऐवजी तिनं प्रतिक्रिया दिली. ‘रिस्पॉन्ड’ करण्याऐवजी ‘रिअॅक्ट’ केलं. केवळ मुलांच्याच बाबतीत नव्हे, तर मोठ्या व्यक्तींशीही वागताना प्रतिसादाची जागा प्रतिक्रिया घेते आणि असे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तेव्हा नाती दुरावण्याची पार्श्वभूमी तयार होते. मनं दुखावली जातात आणि त्यानंतर दुरावतात.
एखादी घटना घडते. कोणीतरी काही बोलतं. ते ऐकून किंवा ती घटना पाहून तत्काळ आपल्यामधील भावना जाग्या होतात आणि त्या भावनावेगात कृती केली जाते. अशी कृती शाब्दिक असू शकेल किंवा शारीरिक! म्हणजेच कोणीतरी ‘मूर्ख’ म्हणतं, लगेचच अपमान झाल्याची भावना जागृत होते, राग येतो आणि ‘मूर्ख’ म्हणणाऱ्याच्या तोंडावर एक जोरदार चपराक मारली जाते. अशा प्रकारे भावनावेगात केलेलं कृत्य म्हणजेच प्रतिक्रियात्मक वागणं! अशा वागण्यामुळे नुकसानच होण्याची शक्यता असते. त्यामुळेच प्रतिसादात्मक वागणं महत्त्वाचं ठरतं. प्रसंगांवर उपायही सापडतो आणि नातीदेखील एकसंध राहतात. एखादी घटना घडते. कोणीतरी काही बोलतं आणि भावना जाग्या होतात. मात्र प्रतिसादात्मक वागण्यामध्ये या भावना नियंत्रणात असतात. म्हणूनच ‘मूर्ख’ असं एखाद्यानं म्हणताच त्याच्यावर रागानं हात उगारला जात नाही. त्याऐवजी नेमकं त्यानं ‘मूर्ख’ का म्हटलं आहे, त्याचा गैरसमज झाला आहे की आपलं काही चुकलं आहे, यावर विचार केला जातो. अशा पूर्ण विचाराअंती जेव्हा शाब्दिक किंवा शारीरिक कृती केली जाते, तेव्हा तो प्रतिसाद ठरतो. असं प्रतिसादात्मक वागणं समंजसपणा वाढवतं, नाती अधिक जवळ आणतं. तथापि, प्रतिक्रियात्मक वागण्याऐवजी प्रतिसादात्मक वागणं प्रयत्नपूर्वक शिकून घ्यावं लागतं. स्वत:चं बारकाईनं निरीक्षण करून प्रत्येक वेळी प्रतिसाद देण्याची सवय स्वत:ला जाणीवपूर्वक लावून घ्यावी लागते. ‘ओह, मी प्रतिसाद देण्याचं ठरवूनदेखील त्याप्रसंगी रिअॅक्टच केलं,’ असं सुरुवातीच्या टप्प्यात कदाचित आठवडाभरानंतर लक्षात येईल. परंतु, सवयीनं हा कालावधी कमी-कमी करता येईल. प्रतिक्रियात्मक वागल्यानंतर लगेचच दुसऱ्या क्षणाला त्याची जाणीव होईल. त्यामुळे लगेचच पुन्हा बाजू सावरून घेणंही शक्य होईल. त्यानंतर तसं वागण्याचं डोक्यात येता क्षणी त्याची जाणीव होऊन स्वत:ला थांबवता येईल आणि त्यानंतरच्या टप्प्यात तर कोणत्याही परिस्थितीत केवळ प्रतिसादात्मक वागण्याची शिस्त अंगी बाणली गेलेली असेल!
त्या महिलेची आणि मुंगसाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पाळण्यातल्या माझ्या बाळालाच या मुंगसानं काहीतरी केलं, असं वाटून रक्तानं तोंड माखलेल्या मुंगसाला तिनं घडा फेकून मारून टाकलं. धावतच आत गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, बाळ तर छान खेळतंय, मात्र शेजारी साप मरून पडला आहे. मालकिणीची शाबासकी मिळविण्याच्या अपेक्षेत बसलेल्या मुंगसावर जीव गमावण्याची वेळ आली. तिला स्वत:च्या कृत्याबद्दल कितीही पश्चात्ताप झाला तरी मुंगूस जिवंत होणार नाहीच! समोरची परिस्थिती पाहून तिनं भावनात्मक निर्णय घेतला. प्रतिसादाऐवजी प्रतिक्रिया दिली आणि आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ तिच्यावर आली. बालपणापासून ही गोष्ट माहीत असूनही, आपण रिस्पॉन्ड करण्याऐवजी रिअॅक्टच करणार आहोत का, त्यामुळे कायमचं काही गमावून बसणार आहोत, याचा विचार करायलाच हवा!
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...