आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाही सीसी टीव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:बाबतीतली निरीक्षण प्रक्रिया सातत्यानं सुरू असली म्हणजे चुकांची पुनरावृत्ती टाळता येते. नवीन चुका घडण्याच्या शक्यता कमी होतात.
खाद्यपदार्थांसोबतच मुलांना खेळण्यासाठी खेळणीदेखील असल्याने मी आणि माझ्या मैत्रिणीने आपापल्या मुलांसोबत त्याच हॉटेलमध्ये जाण्याचे ठरविले. आमच्या गप्पा सुरू असताना ही चारही मुले आनंदात हसत, बागडत, खेळत होती. वेगवेगळी खेळणी खेळता खेळता ही मुले ट्रॅम्पोलिनवर चढून खेळू लागली. उड्या मारू लागली.
अन् काही मिनिटांमध्येच दूरवरून खेकसण्याचा आवाज येऊ लागला. आवाज जसजसा जवळ येत गेला, तसे लक्षात आले की, तेथील सिक्युरिटी गार्ड या मुलांवरच ओरडत होता. केवळ ही चारच मुले ट्रॅम्पोलिनवर उड्या मारीत असताना आणि सर्वात मोठा मुलगा बारा वर्षांचा असताना त्या गार्डचे म्हणणे होते की, एवढ्या मोठ्या मुलाने ट्रॅम्पोलिनवर जायचे नसते. ‘तू ट्रॅम्पोलिनवर गेलासच का?’ म्हणत तो ओरडत राहिला. इतका वेळ आनंदाने बागडणारी मुले एकदम हिरमुसली. सभोवतालचेही लोक त्या मुलांकडे बघू लागले होते. ते पाहून ही मुले आणखीच कोमेजली. ‘सॉरी’ म्हटल्यानंतरही गार्डचे ओरडणे बंद झाले नव्हते. मुलांचे नाराज होणे जसे मला अस्वस्थ करून गेले, तसेच त्या गार्डचे ओरडणेही खटकले. त्याच्याजवळ जात मीदेखील त्याचा समाचार घेतला. ट्रॅम्पोलिन उड्या मारण्यासाठीच असते, मोठी मुलेही त्यावर उड्या मारू शकतात, हे मी त्याच्या लक्षात आणून दिले. किती वयाच्या मुलांसाठी कुठली खेळणी याची नियमावली दर्शनी भागात लावण्यात आलेली नव्हती, त्यामुळे असं खेकसून लहानग्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची त्याची कृती चुकीची असल्याचे मी लक्षात आणून दिले. थोड्या वेळानंतर घरी परतत असताना माझ्या लक्षात आले. त्याचे ओरडणे जसे चूक होते, तसेच माझे रागावणेही चूकच होते. सभ्य शब्दांमध्ये त्याने मुलांना सांगितले नाही. तसेच मीदेखील त्याच्याशी सभ्यतेने बोलले नाहीच. एक प्रकारे, त्याच्या ज्या चुकीसाठी मी त्याला बोल लावत होते, तीच चूक मीसुद्धा केली होती! ही चूक जाणवल्यानंतर पुन्हा ती होणार नाही, याबाबत दक्ष राहण्याचे आश्वासन स्वत:ला दिल्यानंतर मी माझ्यावरील अदृश्य सीसी टीव्हीचे मनापासून आभार मानले. स्वत:वर पुरेपूर लक्ष ठेवण्यासाठी मीच निर्माण केलेल्या या अदृश्य सीसी टीव्हीने मला अशी मदत केली. यामुळे स्वत:बाबतची निरीक्षण-प्रक्रिया सातत्याने सुरू राहते. ज्याचा परिणाम म्हणून आपल्या दोषांमध्ये सुधारणा करता येते आणि गुणांचा अधिक विकास करता येतो.
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...