आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोनाचा नवा चश्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता दिसेल.
अनावश्यक बंधनं झुगारून देण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मार्ग सापडेल.

ओ जस जेव्हा तीन-चार वर्षांचा असेल. अचानक अंथरुणातच तो उठून बसला आणि मी लाइट लावण्याच्या आत आणि नेमकं काय झालंय ते समजण्यापूर्वीच त्यानं उलटी केली. त्या उलटीनं गादी, पांघरूण आणि आमच्या दोघांचेही कपडे खराब झाले. कपडे तर आम्हाला बदलता आले, पण गादी आणि पांघरूणाचं काय? उलटी भरून टाकायला हवी होती. पण तोपर्यंत हे काम मी कधीच केलेलं नव्हतं. कारण उलटीजवळ जाताच मला मळमळू लागे. त्यामुळे घरातील दुसरं कोणी तरी ते काम करीत असे.

पण त्या वेळी घरात माझ्याशिवाय कोणी नव्हतं. मावशीबाई थेट सकाळी येणार होत्या. आम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकलो असतो. पण रात्रभरामध्ये गादी खालपर्यंत खराब झाली असती आणि घरभर वासही सुटला असता.

या परिस्थितीत एकच केलं, त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. उलटीचा तो सारा पसारा निस्तरणं अपरिहार्य आहे, तो मलाच निस्तरावा लागणार आहे आणि मला मळमळून चालणार नाही, असा विचार केला. उलटीमध्ये वाईट, घाणेरडं असं काही नसून अन्नाचंच ते बिघडलेलं स्वरूप आहे, असं स्वत:ला सांगितलं आणि ते सर्व स्वच्छही केलं!

असा महत्त्वपूर्ण ठरतो दृष्टिकोनामधला फरक, जो प्रत्येक वेळी सुखाच्या मार्गावर घेऊन जातो. ‘छे बाई! मी आतापर्यंत कधीच स्लीव्हलेस ब्लाउज घातला नाही’, ‘मी आतापर्यंत कधीच केस मोकळे सोडले नाहीत’ अशा किती तरी मर्यादा आपण स्वत:च स्वत:वर लादून घेतलेल्या असतात. ‘मला नाही चांगलं दिसणार’, ‘लोक हसले मला तर’ अशा विचारांपायी अनेकदा स्वत:ला मोकळं फुलूच देत नाही. अशा वेळी स्वत:चा दृष्टिकोन तपासा. स्वत:साठी जगणार आहात की लोकांच्याच मर्जीनं वागणार आहात, हे स्वत:ला विचारा. ज्यांचा विचार करून मनसोक्त जगणं आपण नाकारत आहोत, ते त्या योग्यतेचे आहेत का, हे तरी बघा एकदा! बदललेला दृष्टिकोन नवा विचार देऊन जाईल.

तुमच्याही बाबतीत असं काही वेळा घडलं असेलना! घरातून बाहेर पडताना मुलांना काही सूचना करून, कामवाल्या साहाय्यकांना काही सांगून बाहेर पडावं. आणि घरी परतून आल्यावर त्या सूचनांमध्ये मुलांनी गोंधळ केल्याचं लक्षात यावं. कामवाल्यांनी वेगळंच काही करून ठेवलेलं असतं! हेदेखील घडतं दृष्टिकोनामुळे! मुलांना एका पाठोपाठ काही बाबी सांगताना पडताळून पाहिलं का? त्यांचं लक्ष तुमच्या बोलण्याकडे आहे का? ते दुसऱ्याच विचारात आहेत, तरीही तुमचं बोलणं चालूच! हे पाहायला हवं. इतरांशी बोलत असताना, काही सांगत असताना उद्देश कोणता होता? बोलून किंवा सांगून मोकळं होण्याचा, की त्यांच्यापर्यंत ते पोहोचविण्याचा? त्यांच्यापर्यंत ‘पोहोचविताना’ ते ‘ऐकत’ आहेत का, याची खात्री आता नक्कीच करून घ्यायला हवी. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की, प्रत्येक नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता दिसू लागते, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो. स्वत:वरची अनावश्यक बंधनं झुगारून देण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि कोणी त्याचं कारण विचारलंच तर ते ठामपणानं सांगताही येतं!
म्हणूनच तर जेफ केलरनं म्हटलं आहे- दृष्टिकोन म्हणजेच सर्व काही!
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...