आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यलो गँगची कमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं मतदान आणि निकालही नुकतेच पार पडले आहेत. या किचकट, संवेदनशील, जोखमीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग दरवेळप्रमाणेच लक्षणीय होता. या सहभागाचे वेगवेगळे पैलू या लेखांमधून तुमच्यासमोर मांडतोय. जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला एकीकडे, तर दुसरीकडे हीच जबाबदारी टाळण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या महिला. आणि तिसरीकडे त्यांना जबाबदारी न देणारा वा त्रासदायक कामं अंगावर टाकणारा असंवेदनशील अधिकारी वर्ग. यातनं काय शिकता येईल आपल्याला?
 
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासूनच आमच्या निवडणूक-विषयक कामकाजांना सुरुवात होते. या कामांची गती वाढत जाऊन थेट निवडणुकीचा निकाल जाहीर करेपर्यंत ती कायम राहते. अशा रितीने मी व माझ्या अनेक वरिष्ठ/कनिष्ठ सहकारी अहोरात्र निवडणूकविषयक जबाबदाऱ्या पार पाडत असताना एका वारंवार घडणाऱ्या गोष्टीमुळे मी व्यथित होत होते. मतदान पथकात घेतलेल्या अनेक व्यक्ती ड्यूटी रद्द करण्यासाठी माझ्याकडे येत होत्या. काही मोजक्या व्यक्तींचे कारण खरे होतेही! पण, काहींना मात्र केवळ जबाबदारी नको होती, निवडणुकीच्या कामामुळे दोन दिवसांपुरता का असेना-पण, होणारा त्रास नको होता, हे मला जाणवलं.
 
अन् त्यावेळीच विचार आला, संपूर्ण मतदान केंद्रच महिलांचे स्थापन करून या ड्यूटी रद्द करण्यासाठी येणाऱ्या केवळ महिलांसमोरच नव्हे, तर पुरुषांसमोरही आदर्श का निर्माण करू नये! या संदर्भात प्रतिनियुक्तीवर घेतलेले आणि राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे यांच्याशी चर्चा केली. एका प्रशिक्षणात आम्ही मतदान-पथकातील महिलांसमोर ही संकल्पना मांडली. ती प्रत्यक्षात आणत असताना येऊ शकणाऱ्या अडचणींची आणि वस्तुस्थितीचीही त्यांना स्पष्ट जाणीव करून दिली. मतदान केंद्राध्यक्ष आणि इतरही सर्वच मतदान अधिकाऱ्यांना मतदानाच्या आदल्या दिवशी केंद्रावरच मुक्काम करावा लागणारच, याबाबतही सांगितले. 

ही संकल्पना खरोखर प्रत्यक्षात अवतरली तर आपण एक खूप चांगला आदर्श निर्माण केलेला असेल, इतिहास घडवलेला असेल, असे सांगून त्यांना प्रेरणा देत त्यांचे प्रबलनही करण्यात आले. आतापर्यंतच्या  प्रत्येक निवडणुकीत महिला केवळ बोटाला शाई लावण्याचेच पारंपरिक काम करीत आल्या आहेत. आता त्यापुढेही जाऊन त्यांना बाकीच्या जबाबदाऱ्याही पार पाडणं गरजेचे आहे, आणि सहजशक्यही आहे, हेही त्यांना समजावून सांगण्यात आले. यामधूनच २६ महिला कामासाठी तयार झाल्या. या महिलांचा आत्मविश्वास वाढावा तसेच मतदान यंत्र सहज हाताळण्यातील विश्वास वाढावा यासाठी काळजी घेण्यात आली.
 
या सर्व महिला मतदानाच्या आदल्या रात्री केंद्रावरच मुक्कामाला राहणार होत्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठीही १०० मीटरच्या आत महिला पोलिसांचाच बंदोबस्त दिला जावा, याबाबत मी आग्रही राहिले. बंदोबस्त प्रमुख म्हणून उपअधीक्षक संगीता यादव उपलब्ध झाल्या. केंद्र निवडताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून जवळ असणाऱ्या वेरुळची निवड केली. वेरुळमध्ये चार मतदान केंद्रे आहेत. या महिलांना या केंद्रावर सामावून घेणे शक्य होते. वेरुळ निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण महिलांसाठी राखीव असल्याने उमेदवार महिलाच होत्या. मतदान प्रतिनिधीही महिलाच असाव्यात, या अनुषंगाने मी राजकीय पक्ष्यांशी संपर्क साधला व त्या सर्वांनीच या चारही मतदान केंद्रांवर मतदान प्रतिनिधी म्हणून केवळ महिलांचीच नेमणूक केली. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निधि पांडे यांनीही या संकल्पनेला परवानगी दिली. 
 
निवडणुकीच्या वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे, मुलांच्या अत्यावश्यक गरजांकडेही लक्ष देणे अजिबात शक्य होत नाही. अशा परिस्थितीत हा उपक्रम घेणे म्हणजे अधिकचा वेळ आणि ऊर्जा देणे होते. त्यामुळे तर घराकडे, मुलांकडे पूर्णच दुर्लक्ष होणार, हे निश्चित ! त्या वेळी माझे पती डॉ. अभय यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. याच काळात माझा मुलगा (वय 09 वर्षे) आजारी असतानाही, केवळ माझे निवडणुकीवरचे लक्ष विकेंद्रीत होऊ नये, यासाठी त्याबाबत मला सांगितलेही नाही, आणि यशस्वीपणे जबाबदारीही पार पाडली. असाच भक्कम पाठिंबा या मतदान केंद्रांवरच्या महिलांनाही त्यांच्या कुटुंबियांचा मिळाला. त्यामुळे लहान बाळ असणाऱ्याही महिला यामध्ये सहभागी झाल्या. मतदान केंद्रावर त्यांनी मुक्कामही केला.
 
नागरिक आणि प्रशासन यांमधील दुवा म्हणजे प्रसारसाध्यमे ! त्यांनी हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवला. परिणामी या महिलांचा उत्साह तर द्विगुणित झालाच, परंतु अन्य महिलांवरही त्याचा खूप सकारात्मक परिणाम झाला. ‘पुढच्या वेळी आम्हीही केंद्राध्यक्ष होणार,’ ‘मतमोजणीसाठीही आम्हाला घ्या,’ असं सांगणाऱ्या महिलांची संख्या खूप वाढली. मतदान पथकातील पुरुषांनीही मतदानाच्या सायंकाळी आवर्जून सांगितले की, आतापर्यंत आमच्या केंद्रावरच्या महिला मतदान संपताच निघून जात असत. आज मात्र त्या सीलिंग प्रक्रियेतही समाविष्ट झाल्या.
 
या उपक्रमात सहभागी महिलांनी पिवळ्या साड्या नेसून स्वत:ची एकजिनसी ओळख निर्माण केली. योगायोगाने इमारतीचाही रंग पिवळाच असल्याचे पत्रकारांनीच निदर्शनास आणून दिले आणि ‘यलो गँग’ या शब्दांची देणगी मिळाली. सर्वांचा उत्साहच एवढा होता की, त्यासमोर निवडणूक प्रक्रियेचा तणावही फिका पडलेला होता. प्रथमच मतदान प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवण्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरही झळकत होता. महिला कार्यक्षम आहेतच , त्यांना संधी उपलब्ध करवून द्या आणि त्या कार्यक्षमता सिध्द करतील, त्यांच्यावर विश्वास दाखवा आणि त्या तो विश्वास सार्थ ठरवतील. भक्कम कौटुंबिक पाठिंबा मिळाला की, त्या इतिहासही निर्माण करतील.
 
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...