आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद कायम ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नातं वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक; संवाद महत्त्वाचाच. पण हा संवाद जितका प्रत्यक्ष, समोरा-समोर होईल तितकं त्या नात्याचं आयुष्य अधिक. कारण प्रत्यक्ष संवादात केवळ ‘बोलणं’ होत नाही तर ‘ऐकणं’ ही क्रियाही घडत असते.

मागील अर्ध्या तासातच मनवाचा हा पाचवा फोन! पण वासंती तो रिसिव्ह करत नव्हती. याच अर्ध्या तासात मनवाचे अनेक मेसेजेस मोबाइलवर आले, पण वासंती ते न वाचताच डिलिट करत होती. कारण कॉलेजमधून परतत असतानाच त्यांचा एका मुद्द्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात झालं. ‘आयुष्यभर मी तुझं तोंड पाहणार नाही आणि तूही माझं पाहू नकोस,’ असं एकमेकींना म्हणत फणकाऱ्यानंच त्यांनी निरोप घेतला होता.
घरी परतल्यावर, राग शांत झाल्यावर मनवाला वासंतीसोबतचे अनेक आनंदी क्षण आठवले. एका छोट्या मुद्द्यावरून एवढ्या वर्षांची मैत्री तुटणं योग्य नाही, असं तिला वाटलं. म्हणूनच ते सगळं बोलण्यासाठी ती वासंतीला फोन, मेसेजेस करीत होती. पण, आता तर वासंतीने मोबाइल बंदच करून ठेवला होता.

आपल्याही बाबतीत अनेकदा असं घडतं. काहीतरी होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण संवादच तोडून टाकतो. पण, त्यामुळे ते नातं परत फुलवण्याच्या सर्व वाटा आपण बंद करतो, हे त्या वेळी कळतं का आपल्याला?
एखादे वेळी परिस्थितीची निकड म्हणून काही काळ परस्परांच्या संपर्कात न राहणं फायद्याचंही ठरू शकतं. कदाचित त्यानंतर निर्माण होणारं नातं अधिक अभेद्य ठरत असेल! परंतु, त्याही परिस्थितीमध्ये अबोला ठेवण्याबाबत निर्णय घेतलेला असावा, केवळ भांडणावरची ती प्रतिक्रिया असू नये. प्रतिसादात्मक अबोला परतीचे मार्ग कायम ठेवतो, तर प्रतिक्रियेतून निर्माण झालेला अबोला ते दोरखंड कायमसाठी कापून टाकतो, हे विसरून कसं चालेल?त्यामुळेच संवाद तोडू नका! गरज भासलीच तर काही काळासाठी तो थांबवा अन् परिस्थिती अनुकूल होताच पुन्हा सुरू करा.

त्याचप्रमाणे एखाद्या संवादाची पार्श्वभूमी अत्यंत नाजूक असेल किंवा खूप क्रिटिकल असेल, तर तसा संवाद आवर्जून समोरासमोरच करण्याची दक्षता घ्या. कारण मागच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे दृश्य, श्राव्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आपली यथायोग्य भूमिका निभावतील. त्यावरूनच लक्षात येईल की, समोरची व्यक्ती ‘सॉरी’ म्हणतेय तर ते खरोखरच मनापासून आहे का? तसेच जेव्हा आपणही म्हणू की, ‘ठीक आहे, केलं मी माफ,’ तर समोरच्या व्यक्तीलाही कळेल की, आपण मनापासून माफ केलं आहे की वरवर म्हणतोय ते!
क्रिटिकल स्वरूपात संवाद फोनवरून केला तर त्यामध्ये माध्यमाचाही अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाषण अगदी निर्णयाप्रत आलं आणि मोबाइलची रेंज गेली, त्याचा टॉकटाइम संपला… असा काही अडथळा आला तर? अन् तो अडथळा दूर करेपर्यंत समोरच्या व्यक्तीचा मूड बदलला तर? म्हणून नकोच तो धोका! त्यापेक्षा समोरासमोर बोलणं केव्हाही अधिक उपयुक्त ठरेल!

त्याशिवाय, बोलणाऱ्या व्यक्तीचं लक्षपूर्वक ऐकणं, ही बाबदेखील आवर्जून पाळलीच पाहिजे. सामान्यपणे समोरील व्यक्ती बोलत असताना तिचं ऐकण्याऐवजी ‘त्या बोलण्यावर मी काय बोलू’ याचाच विचार आपण करतो. परिणामत: बोलणाऱ्यानं सांगितलेल्या अनेक बाबींकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणूनच अगोदर शांतपणे ऐकून घ्या. संवादकौशल्य वाढविण्यासाठी ‘ऐकण्याचं कौशल्य’ मिळवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

…आणखी एक, कार्यालय असो किंवा घर, संवाद साधण्यासाठी मध्यस्थांचा वापर नकोच! हा मध्यस्थ आपला खरोखरच हितचिंतक आहे का, याबाबत पूर्णपणे खात्री देता येत नाही. आपल्या वतीनं संवाद साधताना तो स्वत:चे फिल्टर्स वापरण्याची आणि अन्वयार्थ लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मध्यस्थ ज्याच्याशी बोलणार आहे, त्याच्याबाबत खरंच काय विचार करतो, हेदेखील सत्य आपल्याला माहीत नसतं. शिष्टाई करणारा कृष्ण कोणाच्याही रूपात आता अस्तित्वात नाही. त्यामुळे मध्यस्थीसाठी किंवा शिष्टाईसाठी पाठवलेल्या आपल्या मध्यस्थाने आपल्या वतीने भलतेच आश्वासन दिले किंवा अयोग्य अटीचाही स्वीकार केला तर? अशा कितीतरी प्रतिकूल शक्यता संभवतात.त्यापेक्षा वाढवा स्वत:चंच संभाषण-कौशल्य आणि बोला कोणाशीही! स्वत:च!

anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...