आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायझेन घरातली !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉर्पोरेट जगातील ‘कायझेन’ ही संकल्पना मला खूपच आवडते. आहे त्या परिस्थितीमध्ये, उपलब्ध संसाधनांसहित उत्पादकता वाढविण्याकरिता ही संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. मानवी साखळीमधील जे घटक कमकुवत आहेत, त्यांना लगेच बदलण्याऐवजी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यामध्येच अपेक्षित बदल घडवून आणले जातात. ही संकल्पना एकदा समजावून घेतली की, ती घरातही राबवणे खूप सोपे होते. घराच्या अनुषंगाने त्यामध्ये काही बदल करावे लागतील इतकेच!

विदुलाच्या घरी कामवाल्या बायका खूप अल्पकाळ टिकतात. ही उशिरा आली, तिनं न सांगता खाडा केला, ती भांडी स्वच्छ घासत नाही, ही धुणं नीट पिळत नाही… तिची अशी भलीमोठी यादीच तयार असते. बायका बदलल्या जातात. मात्र समस्या संपत नाहीत. बदलणाऱ्या बायकांसोबत या समस्याही बदलतात इतकंच! अगोदरची स्वयंपाकवाली तेल खूपच वापरते म्हणून तिला काढलं, तर ही पोळ्या कच्च्या ठेवते! समस्यांचं स्वरूप बदलतं, त्यांचं मुळापासून निराकरण होत नाही.

कमकुवत घटकांना प्रशिक्षित करण्याचा ‘कायझेन’ मुद्दा तिला अचूक मदत करेल. आपल्याला त्यांच्याकडून कसं काम हवं आहे, याबाबतच्या अपेक्षा योग्यरीत्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षितही करता येईल. त्यासाठी थोड्या वेळाची गुंतवणूकही करावी लागेल. मात्र त्यानंतर मिळणारे रिझल्ट्स नक्कीच समाधानकारक असतील. मालक, नोकर नात्याऐवजी माणुसकीचंही नातं या निमित्तानं तयार होईल. ‘माझं शिक्षण चांगलं झालेलं असतं, तर मी हे केलं असतं’, ‘माझ्याकडे पैसा असता तर मी ते केलं असतं’, अशी ‘आत्याबाईला मिश्या असत्या तर…’ची पठडी संपतच नाही. ‘कायझेन’ उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याबाबत सांगते. त्यामुळेच आपल्याकडे काय नाही, याऐवजी काय आहे, याबाबत विचार करून त्या आधारे स्वत:चा आणि कुटुंबाचाही विकास साधता येतो.

‘कायझेन’ या जपानी शब्दाचा आणि जपानी संकल्पनेचा अर्थच मुळी ‘सातत्याने सुधारणा’ (continuous improvement) असा आहे. त्यामुळे ‘पी हळद हो गोरी’सारखे अवास्तव रिझल्ट्स अपेक्षित न ठेवता एकेका पायरीने, टप्प्याने विकास साधण्यावर भर देता येतो. पदांच्या उतरंडीचा विचार न करता प्रत्येक जण रचनात्मक विचार करून प्रगतीचे उपाय सुचवू शकतो. या अनुषंगाने सर्व जण समान असतात.

हीच बाब घरातही लागू करता येते. ‘मला येतं सगळं’, ‘मला नको कोणी काही शिकवायला’, हा दृष्टिकोन बदलता येतो. नवनवीन शिकण्याची मानसिकता तयार होते. छोटे-छोटे असले तरीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढते. भर उन्हाळ्यातही सोनल स्वयंपाकवाल्या आजींना पंखा चालू करू देत नाही. कारण त्या हवेने गॅस वाया जातो. गॅस राष्ट्रीय संपत्ती आहे, तो वाचवायलाच हवा; पण पंख्याअभावी घामाघूम होणाऱ्या आजींच्या मन:स्थितीचं काय? त्या जरी पगारी नोकर असल्या तरीही या वैतागाचं प्रतिबिंब स्वयंपाकामध्ये आणि त्या दोघींच्या नातेसंबंधांवरही निश्चितच पडणार. शिवाय, घामाचे थेंब त्यांच्याही नकळत स्वयंपाकात पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. घाम पुसलेलाच हात कणकेला लावला जाणार नाही, याची काय खात्री? अशा वेळी महत्त्व कोणत्या बाबीला किती द्यायचे, किंवा परिस्थितीमध्ये बदल कसे घडवून आणायचे, याबाबत योग्य निर्णय घेणं शक्य होतं. इतरांची उणीदुणी काढत स्वत:चा आणि इतरांचाही वेळ वाया घालवणं टाळता येतं. वेळेची आणि स्वत:मधील ऊर्जेचीही योग्य गुंतवणूक करता येते. इतरांमधील चांगल्या गुणांचा स्वीकार करतानाच स्वत:मधील दोषही प्रामाणिकपणानं कबूल करता येतात. सर्वांशी सुसंवाद साधणं शक्य होतं. वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील कायझेनचा वापर आपल्याला सुखी-समाधानी बनवेल, यात शंकाच नको!

अंजली धानोरकर, औरंगाबाद
anjalidhanorkar26@gmail.com
बातम्या आणखी आहेत...