आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकाला घडवतो विद्यार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वेदांत संस्कृतीमध्ये सेल्फ रिअलायझेशन अर्थात स्वत:च्या सत्य स्वरूपाची जाणीव व ज्ञान या गोष्टींना शिक्षणाचे अंतिम ध्येय मानले आहे. गुरू ही संकल्पना त्या अर्थाने विशाल आहे. गुरू हा या अंतिम ध्येयाकडे जाणाऱ्या दिशेने मार्गस्थ झालेला आणि शिष्य हा त्याच मार्गावर पाऊलखुणा उमटवण्याचा प्रयत्न करणारा अशी संकल्पना आहे. काळाच्या ओघात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत गेला आणि गुरूची जागा शिक्षकांनी आणि शिष्याची जागा विद्यार्थ्याने घेतली. परंतु मला प्रामाणिकपणे असे म्हणावेसे वाटते की गुरू आणि शिक्षक या दोघांमध्ये गुरू ही श्रेष्ठ जागा आहे. गुरू हा उत्तम शिक्षक असतोच, पण शिक्षक गुरुपदाला पोचतोच असे नाही. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या शिक्षक या भूमिकेचा मागोवा मी या लेखाच्या निमित्ताने घेणार आहे. गेली जवळपास १५ वर्षे मी या क्षेत्रामध्ये काम करते आहे. बरेच विद्यार्थी हाताखालून गेले. आज त्यांची आठवण करायची अनमोल संधी मला मिळाली आहे.

माझ्या विद्यार्थ्यांनी मला काय दिलं? या प्रश्नाला एकच उत्तर आहे, त्यांनी मला घडवलं. मी आज जी काही आहे त्यात सर्वात मोठा वाटा माझ्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यांनी मला काय नाही दिलं? काय नाही शिकवलं? त्यांनी मला प्रेम करायला शिकवलं. वशि्वास ठेवायला शिकवलं. त्यांच्या माझ्यावरच्या वशि्वासाला सार्थ ठरवण्यासाठी मी अधिकाधिक चांगलं काम करायला उद्युक्त झाले. माझे विद्यार्थी माझं अनुकरण करतात हे जाणवताच मला माझं राहणीमान, माझी भाषा, माझ्या सवयी, माझ्या आवडीनविडी या सर्वांना चांगलं वळण लावावं लागलं. मुलांना नियमितता, स्वयंशिस्त, स्वनियंत्रण यावं म्हणून आग्रह धरणारी मी स्वत: या सर्वांचं पालन अधिक काटेकोरपणे करू लागले. माझी एक आदर्श प्रतिमा माझ्या मुलांच्या मनात पाहिल्यानंतर मला माझं व्यक्तिमत्त्व त्या प्रतिमेशी ताडून पाहावंच लागलं आणि जाणवलं, की त्या आदर्शांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं हेच खऱ्या शिक्षकाचं कार्य आहे.
विद्यार्थी शिक्षकावर डोळे झाकून वशि्वास ठेवतो, प्रेम करतो. हा वशि्वास, हे प्रेम असंच कायम राहावं यासाठी प्रयत्न करायचा माझा नशि्चय पक्का होत गेला. विद्यार्थी त्यांच्या समस्या मला सांगतात. त्या समजून घेताना मला माझ्या विद्यार्थीदशेतील दविस आठवतात. माझ्या मनातल्या लहानपणातील सलांना मोकळे करण्याची संधी त्यातून मला मिळते. त्यांच्या समस्या सोडवताना मला माझ्या भावनांचा निचरा झालेला जाणवतो आणि मग मी त्याची आवश्यकता शिकले. मानसिकतेचा किती परिणाम मुलांच्या भविष्यावर, त्यांच्या करिअरवर होताे हे मला मुलांनीच शिकवलं. मुलांकडून पालकांच्या अपेक्षा, काळाची गरज, मुलांचा असमंजसपणा, वयानुरूप त्यांच्यात होणारे बदल हे सर्व कितीही वर्षं उलटली तरी पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनरेशन गॅप तशीच तयार करतात हे मी विद्यार्थ्यांकडून शिकले.
विद्यार्थ्यांच्या पिढ्या जशा हाताखालून गेल्या तसं मी त्यांच्याकडून काळानुरूप होणारे सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक बदल शिकले. शिक्षण ही एक प्रवाही प्रक्रिया आहे. तशीच ती लवचिकही आहे. या बदलांचे भान मला माझ्या विद्यार्थ्यांमुळे आले. शिक्षण प्रक्रियेला म्हणूनच लवचिक असावे लागते. आजचा विद्यार्थी नव्या बदलांना चटकन सामोरा जातो आणि स्वीकारतोही. समायोजनाचा हा गुण मी विद्यार्थ्यांकडून शिकले.
विद्यार्थ्यांमध्ये सतत राहून मनाला तरुण ठेवायला शिकले. आजच्या विद्यार्थ्याला तंत्रज्ञान, जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण घ्यायचे आहे. त्यांना शिकवता शिकवता या सर्वांची जाणीव मला झाली. त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठी होताना... कारण विद्यार्थी नवीन नवीन येत गेल्यामुळे माझा विद्यार्थी आणि मी यांच्यातील वयाचे अंतर वाढत गेले. त्यामुळे आधुनिकीकरण आणि पूर्वापार चालत आलेली भारतीय संस्कृती आणि संस्कार यांची सांगड घालण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी मला भाग पाडले. त्यासाठी नवनवीन प्रकल्प, प्रयोग करता करताच मला जाणवले की माझे व्यक्तिमत्त्व चांगल्या दशिेने घडत आहे. आणि मग कळले की शिक्षक आणि विद्यार्थी या भूमिकेत सरमिसळ होत होत त्या बदलत गेल्या. माझ्या विद्यार्थ्याला शिकवणारी माझ्यातली शिक्षिका, विद्यार्थ्याचे रूप धारण करून कधी शिकत गेली ते माझे मलाच कळले नाही.

मी नेहमी एक उदाहरण देते. संगीत शिक्षक जेव्हा आपल्या शिष्याचा एक एक स्वर घोटून घेतात तेव्हा खरं तर आपला स्वर पक्का करत असतात. त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता माझे विचार पक्के होत गेले. एकमेकांचा हात धरून आम्ही खूप प्रवास केला आहे, अजूनही करतच आहोत. या लहानग्या हातांचे ऋण आज व्यक्त करावेसे वाटतेय. त्यांचाच तर आधार आहे. आता अंतिम ध्येय दूर नाही.

- मुख्याध्यापिका, निशू नर्सरी अँड कोठारी कॉन्व्हेंट