Home | Magazine | Madhurima | Anjali Ojharkar short story

घेईन भरारी मी

अंजली ओझरकर | Update - Oct 10, 2017, 12:04 AM IST

अंतराळयानात अनेक गमतीजमती तर रोजच व्हायच्या. तरंगताना प्यायलेले पाण्याचे थेंब चुकून सांडले तर ते फुग्यासारखेच तरंगत राहा

 • Anjali Ojharkar short story
  अंतराळयानात अनेक गमतीजमती तर रोजच व्हायच्या. तरंगताना प्यायलेले पाण्याचे थेंब चुकून सांडले तर ते फुग्यासारखेच तरंगत राहायचे. शिवाय तरंगत्या स्थितीतच झोप काढणे, सहप्रवाशांचे विदेशी भाषेतले थट्टाविनोदाचे आविर्भाव, सर्कशीचे झोके घेतल्यासारखे मजेचे प्रयोग यामुळे हा प्रवास मनसोक्त सुखाची अनुभूती देणारा वाटू लागला.

  याएकविसाव्या शतकातली स्त्री काय करू शकत नाही? सर्वच क्षेत्रांतले विक्रम ती मोडत आहे. अंतराळ प्रवासातही सुनीता विल्यम्सने स्पेसवॉकचा विक्रम केलाच नं? मी लहान असताना जेव्हा तारांगण पाहायचे, आकाशीचा चंद्र पाहायचे तेव्हा आपणही कल्पना चावलासारखे अंतराळात जावेसे सहजच वाटायचे. त्यांच्या साहसकथा पाहून उल्हसित झालेल्या माझ्या चित्तवृत्तींना एका टीव्ही चॅनेलवरच्या एका विदेशी पर्यटन संस्थेच्या अॅडमुळे पालवी फुटली. त्यांना व्यावसायिक अंतराळ प्रवासी तर हवेच होते; परंतु मोजकेच हौशी, अभ्यासू आणि धाडसी असे काही अंतराळ प्रवासीही निवडून प्रोत्साहनपर विनामूल्य अंतराळ प्रवासासाठी धाडायचे होते. त्यासाठी त्यांनी एक प्रश्नमालिका आणि काही चाचण्यांची अट घातली होती. या अंतराळयानात बहुतांश महिलाच होत्या. ती अॅड पाहता-पाहताच मला साखरझोप लागली. झोपेतच मग, मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायानं मला अंतराळ प्रवासाचे ते रम्य स्वप्न पडले. स्वप्नात मी भराभर त्यांच्या प्रश्नमालिका नि चाचण्यांमध्ये सरस ठरून निवडले गेले.

  आता मला नासामध्ये ट्रेनिंगसाठी काही दिवस आधीच जावे लागणार होते. खरोखरच तेथे माझे दैनंदिन आयुष्य बदलून गेले होते. ऑक्सिजन नळकांडे, यानातले तरंगत राहणे, वेगळेच वातावरण आता अंगवळणी पडत चालले होते. आम्ही अंतराळातल्या चंद्र आणि मंगळ या ग्रहांवर सफर करणार होतो. माझ्या कुंडलीत म्हणे मंगळ होता. ऐश्वर्या रायलादेखील छळणारा हा मंगळ मला प्रत्यक्षच पाहायचा होता. फिटनेस टेस्ट पार पडून यान आता गगनभरारीसाठी सिद्ध झाले होते. अंगावर जाडजूड अंतराळयात्रीचा तो पोशाख, ते ऑक्सिजनचे नळकांडे आणि सर्वांवर ताण म्हणजे ते यानातले तरंगतच खाणे-पिणे. गुरुत्वाकर्षणरहित अवस्था म्हणजे मौजच. हे सर्व नुसते पुस्तकात वाचले होते. पण यानाने उड्डाण घेताच हे सारे रोमांचकारी अनुभव चित्तवृत्ती उल्हसित करत होते. या यानाच्या प्रवासापुढे विमानाचा प्रवास फिका वाटू लागला.

  आता अंतराळ प्रवासाच्या पहिल्या टप्प्याच्या दिशेने यान चालले होते. यानातून मंद निळसर पृथ्वी दूरवर दिसू लागली. मनात आता सहजच आले की, हीच का आपली पृथ्वी जिच्या एवढ्यातेवढ्या भूभागासाठी भयंकर युद्धे होतच आहेत? आपण कुठल्या भ्रमात पृथ्वीवर जगत असतो? विश्वाच्या अफाट प्रवासातला, पसाऱ्यातला एक छोटासा ग्रह एवढीच काय ती या पृथ्वीची मातब्बरी. परंतु हेही खरेच की, याच पृथ्वीवरला मानवप्राणी बुद्धिचातुर्याच्या जोरावर अवघे विश्व पालथे घालू पाहात आहे. या अंतराळयानात अनेक गमतीजमती तर रोजच व्हायच्या. तरंगताना प्यायलेले पाण्याचे थेंब चुकून सांडले तर ते फुग्यासारखेच तरंगत राहायचे. शिवाय तरंगत्या स्थितीतच झोप काढणे, सहप्रवाशांचे विदेशी भाषेतले थट्टाविनोदाचे आविर्भाव, सर्कशीचे झोके घेतल्यासारखे मजेचे प्रयोग यामुळे हा प्रवास मनसोक्त सुखाची अनुभूती देणारा वाटू लागला.

  अखेर आमचा लाडका उपग्रह चंद्र आता समीप आलाच. यानात लगबग सुरू झाली. काउंटडाऊननंतर पाहता पाहता चंद्र, कवी लोकांचा स्वर्ग आला. मला मराठीतले भावगीत आठवू लागले. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी… चंद्रावर टुणकन उडी मारावीशी वाटत होती. पण ते शक्य नव्हते. यानाच्या तांत्रिक शिडीनं चंद्रावरच्या खडकाळ भागावर जणू गिर्यारोहण करावे तसे आम्ही तंत्रज्ञानाने बनवलेल्या काठीच्या साह्याने चालत गेलो. आठवणीने तिथले मूनस्टोनदेखील चंद्रप्रवासाची साक्ष म्हणून पृथ्वीवरच्या संशयखोर मैत्रिणीसाठी घेतले. देशाचा तिरंगा, शा कॉलेजचे सोबत आणलेले लोगो सर्व सर्व तिथे रोवले. यानातल्या अन्य देशांच्या संशोधकांनी तिथली माती, दगड, पाणीसदृश द्रव्याचा अंश असावा, असे वाटणारे काही नमुने असणारी माती, दगड, वातावरणाचे निष्कर्ष, टिपणे, फोटो, व्हिडिओ आदी गोळा करून यानात आणून ठेवले. चंद्रावरचे आमचे वास्तव्य संपले होते. पृथ्वीवर ओके रिपोर्ट पाठवला गेला.

  चंद्रानंतर आता आम्हाला मंगळाचे वेध लागले होते. प्रवासात अन्य काही ग्रहही दूरवर दिसायचे. मोठ्या दुर्बिणीमधून अवकाश न्याहाळण्याचा अवर्णनीय आनंद लुटण्याची दुर्मिळ संधी मला लाभल्यानं, स्वर्ग दोन बोटेच उरला होता. पण यानात सहजच म्हणून सुनीता विल्यम्सचा अनुभव मला आठवला. त्या साहसी स्त्रीने पुस्तकात लिहिले होते की, अंतराळ प्रवासाचे सुवर्णक्षण वेचतानाही गगनाला गवसणी घालण्याआधी आपल्याला आपले घर, लाडकी पृथ्वी ही सोडावीच लागते. आपल्या आईपासून ताटातूट झालेले लेकरू जसे दूर परगावी गेल्यावर कासावीस होते तसे यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा सोडल्यावर आपल्याला वाटायला लागते. एवढे छानछान ग्रह अवकाशात पाहिले तरी शेवटी पृथ्वी हेच आपले खरे घर, असे वाटायला लागते. क्षणभर दूर पृथ्वीवरले माझ्या प्रेमळ माणसांचे घर आठवल्यानेच डोळ्यात पाणी आले. किती खरे अनुभवाचे बोल होते ते.

  ज्या ग्रहाच्या अनिष्ट प्रभावाने वा ग्रहयुतीनं म्हणे जमलेली लग्नेही आपल्या देशात मोडतात, त्या अशुभ अशा मंगळ ग्रहाकडे यान वेगाने झेपावत चालले होते. मला स्वत:ला या मंगळाने बरेच छळले होते. म्हणूनच तर मला हा ग्रह प्रत्यक्षच पाहून त्याचा नूर असा का, हे समजून घ्यायचेच होते. आणि अखेर तो तांबूस मोठा ग्रह यानाच्या टप्प्यात आलाच. तसा काही विचित्र ग्रह नसला तरी अन्य ग्रह किंवा पृथ्वी याहून खूपच हा ग्रह वेगळा वाटला. प्रचंड आकार, इतर भौगोलिक रचना, जीवसृष्टीचा अंश या सर्वांमुळे हा ग्रह वेगळेपणानं उठून दिसत होता खरा. अंधश्रद्धा किवा संकुचित आम्ही पृथ्वीवासीय लोक क्षुद्र मनोवृत्तीमुळे आत्मनिर्भर होऊ शकत नाही. स्त्रियांना कमी लेखून अवहेलना करतो. हे सारे मनात आले आणि दु:खही झालेच.

  मंगळावरचे माती, खडक, छोटे रंगीत दगड मी गोळा केले. इतरांना आणखी काही आनंददायी अनुभवही आले. चंद्रापेक्षा फार वेगळा असा हा सूर्यमालेतील दूरवरचा ग्रह. मला मात्र काहीही अमंगळ असे मंगळ ग्रहावर आढळलेच नाही. आता मंगळ पाहण्याची हौसही फिटली होती. मंगळाला बाय बाय करून परतीचा प्रवास करणे भाग होते. अंतराळात तरी किती दिवस फिरणार? शेवटी तोही एक प्रवासच ना? आपण शेवटी पृथ्वीवरचेच मानव. जाऊन जाऊन जाणार कुठे?

  परतीच्या प्रवासात परत तेच यानातले अनुभव येत होते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपली मंद निळी पृथ्वी दिसायला लागली. काय सांगू… सर्वांनाच नाचावेसे वाटू लागले. पण तेही तिथे शक्य नव्हते. इतरही एकापेक्षा एक ग्रह आहेत या अफाट विश्वात. परंतु आपले घर, माणसे, प्राणी, झाडे, फळे, फुले, नद्यांनी नटलेला ग्रह मात्र यासम हाच. पृथ्वी.

  अखेर ती प्रतीक्षा संपून यानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. का कुणास ठाऊक पण अंतराळयात्री कल्पना चावलाच्या आठवणीने मला भरून आले. यशस्वी मोहिमेनंतर असेच परत येताना गुरुत्वाकर्षण कक्षेत शिरतानाच यानाने पेट घेतल्यानं तिचा दुर्दैवी अंत झाला होता. तिचे साहसच माझ्या अंतराळ प्रवासाची स्फूर्ती होती.

  आता अलगदपणे अंतराळयान पृथ्वीवर उतरू लागले होते. मी आता यानाबाहेर पडते न पडते तोच मला माझ्या जाडजूड पोशाखासह ऑक्सिजनच्या नळकांड्याही गदागदा हलवून ओढत असल्याचा भास झाला. असे तर या अंतराळ प्रवासात कधीही झाले नव्हते. मला तर आता या पृथ्वीवरच्या माणसांचा रागच आला होता. रागानेच मी डोळे उघडून पाहते तो काय?

  माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझीच आई मला कॉटवरून गदागदा हलवून कॉलेजला जाण्यासाठी झोपेतून जागे करत होती. मग मी डोळे किलकिले करून अंदाज बांधला की, तो सुखकारक आणि रोमांचकारी अंतराळ प्रवास बहुधा स्वप्नातच केला असावा. हळुवारपणे पृथ्वीवरली सूर्याची कोवळी किरणे घरात आली होती. मग मात्र माझी खात्रीच पटली की, हीच ती माझी लाडकी पृथ्वी. मी मग आनंदाने बेभान होऊन ओरडलेच, ‘ येस,आय अॅम हिअर ऑन द अर्थ!’
  - अंजली ओझरकर, धुळे,

Trending