आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण म्हणतं, भारतात संशोधनास वाव नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणित विषयाचा दैनंदिन आयुष्यात उपयोग काय, असा प्रश्न बर्‍याचदा विचारला जातो. त्याचमुळे गणिताला नोबेल दिलं जात नाही, अशी एक ‘दंत’कथाही आपल्याकडे सांगितली जाते. पण खरं म्हणजे, याच गणितावर आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. अशा गोष्टीत आपल्या संगणकाचा सर्वप्रथम समावेश होतो. संगणकीय विज्ञानाच्या गणिताची गुंतागुंत सोडविणार्‍या सुभाष खोत यांना नुकताच त्यांच्या कामाबद्दल आंतरराष्ट्रीय संघाने संगणकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा रोल्फ नेवालीन्ना पुरस्कार जाहीर केला आणि त्यांचे संशोधन जागतिक पटलावर अधिकृतरीत्या मान्य झालं. १९९५मध्ये झालेल्या आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत सुभाष आपल्या कुशाग्र बुद्धीच्या बळावर संपूर्ण भारतात प्रथम आले.

त्या वेळी आताच्यासारखे ठिकठिकाणी कोचिंग क्लास नव्हते आणि इचलकरंजीत तर नाहीच नाही. त्यामुळे त्यांचे हे यश ‘अतिशय असामान्य’ या प्रकारात मोडणारे होते. त्याच वर्षी त्यांनी आयआयटी मुंबईत (अगोदर कधीही कॉम्प्युटर पाहिलेले नसताना) कॉम्प्युटर सायन्स विभागात प्रवेश घेतला. खोत म्हणतात, “आयआयटीत येण्याअगोदर काही प्रश्न सोडवायला त्यांना सहा-सहा महिने किंवा वर्षदेखील लागायचे.” पण त्याचमुळे त्यांना पुढील आयुष्यात प्रत्येक प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी मिळाली, अशी पुष्टीही ते जोडतात. आयआयटीतून पदवी संपादित केल्यावर खोत यांनी प्रा. संजीव अरोरा या गणितातल्या मान्यवर प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यास सुरुवात केली. संशोधनाच्या पूर्वतयारीकरिता जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास ‘तथाकथित योग्य’ मुलांना एक ते दोन वर्षे लागतात, तो अभ्यासक्रम सुभाष यांनी अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केला.

त्यानंतर सन २००२मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात त्यांनी Unique Game Conjecture (UGC) मांडले आहे. त्यांच्या शोधनिबंधानुसार हा तर्क (conjecture) सत्य मानल्यास कॉम्प्युटर क्षेत्रात एक नवीच क्रांती होणार आहे. या तर्कानुसार आपणास कॉम्प्युटर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या किती जवळ पोहोचू शकतो, ते समजू शकणार आहे. १९९४मध्ये जोहान हस्ताड (johan hastad) या स्वीडिश शास्त्रज्ञाने याबाबत खोलात काम केले होते. त्यांच्या या कामाला खोत यांनी एका नव्या दिशेने नेतृत्व करीत एका वेगळ्याच उंचीवर आणून ठेवलंय. खोत यांचा तर्क सिद्ध होण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत परिमाणे उपलब्ध नाहीत, पण उपलब्ध परिणामांमध्येही त्यांचा तर्क सिद्ध होण्याच्या अगदी जवळ पोहोचलाय. हे लक्षात घेऊनच आंतरराष्ट्रीय महासंघाने हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. त्यांचे गाइड प्रा. अरोरा यांच्या मते, जर हा तर्क सिद्ध झाला तर फारच उत्तम; पण जर कोणी याला खोटे ठरवले, तर त्यासाठी वापरला जाणारा तर्क हा इतक्या उच्च पातळीचा असणार आहे, की त्यामुळे आपल्याला संगणकातल्या अनेक शाखांचे दरवाजे उघडे होतील.

आसफ नॉर हे इस्रायली शास्त्रज्ञ सुभाष खोत यांच्याबद्दल लिहिताना असे म्हणतात, “There are many talented persons who can solve problems; very few can change the way we look at it.” (‘या जगात बरेच बुद्धिमान लोक प्रश्नांची उकल करू शकतात, पण फारच थोडे आपला त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात.’)

महाराष्ट्रातल्या इचलकरंजीसारख्या गावातून आलेला एक मुलगा आज जगातील सगळ्यात कठीण समजल्या जाणार्‍या परीक्षेत सर्वप्रथम येतो नि त्यानंतर त्याला २ लाख डॉलर्सची स्कॉलरशिप मिळते काय, हे सगळं इतकं अफाट आणि अचाट आहे, की भारतात संशोधनाला वाव नाही, असे म्हणणार्‍या ‘आत्ममग्न’ लोकांना मला सुभाष खोतांचं नाव ओरडून सांगावंसं वाटतं. सुभाष खोत यांच्या रूपाने भारताला पुन्हा एक आदर्श मिळालाय, आपण भारतीय फक्त अनुकरण चांगलं करू शकतो, असे ‘स्वहिता’साठी म्हणणार्‍या लोकांना यामुळे पुन्हा एकदा चपराक बसेल. सुभाष यांनी केलेले संशोधन जागतिक पातळीवर संगणकीय गणितासाठी अतिशय पूरक असेल हे तर निर्विवाद; पण त्यामुळे भारतीयांना पुन्हा एकदा आपल्या क्षमतेची जाणीव होईल आणि एक नवी संशोधनाची लाट भारतात येईल, या आशेने आपण भारताकडे बघायला हवे.
patilankit.iitb@gmail.com