आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूख-काजोलची 'दिल'वाली दोस्‍ती (अनुजा कर्णिक)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पडद्यावरची मैत्री सहसा पडद्यावरच राहते. मात्र शाहरुख खान-काजोल ही जोडी नियमाला सणसणीत अपवाद. ‘दिलवाले’च्या निमित्ताने आपल्यासमोर बसलेला शाहरूख आपल्या मैत्रीची सुरुवात सांगताना थोडा नॉस्टॅल्जिक होत म्हणतो, “बाजीगर चित्रपटाच्या सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा काजोल १९ वर्षांची होती. मीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत नवीन होतो. आम्हा दोघांनाही फिल्ममेकिंग काय असतं, हे अजिबात माहीत नव्हतं. पण नंतर आम्ही सोबतच या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. पुढे पुढे तर माझा टेक्निकल गोष्टींमध्ये रस वाढू लागला आणि मी मग स्वत:च प्रॉडक्शन हाउसही सुरू केलं. मी आणि काजोलने दरवर्षी एकत्र चित्रपट केले नाहीत. पण ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘करन-अर्जुन’, ‘कभीं खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ आणि आता ‘दिलवालें’ जेवढे काही सिनेमे केले, तेवढे लोकांना आवडले. आम्ही सुरुवात केली, तेव्हा आमची जोडी लोकांना आवडेल, असं कधीच वाटलं नव्हतं.”

‘बाजीगर’च्या यशामुळे नवी लोकप्रिय जोडी बॉलीवूडला मिळालीच. सोबतच त्यांच्या आयुष्यभराच्या गाढ मैत्रीची सुरुवात झाली. आता पाहता पाहता ह्या मैत्रीला २३ वर्षं झाली. शाहरूख खान सांगतो, “इतक्या वर्षांत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहून आमची मैत्री पक्की होत गेली. आता मैत्रीसाठी आम्हाला एकमेकांना काही वेगळं करून दाखवावं लागतं नाही.”
काजोल शाहरूखची री ओढत म्हणते, “आपापल्या संसारामुळे, वाढत्या कामाच्या व्यापामुळे, आम्ही कधी कधी चक्क दोन-दोन वर्षं भेटू शकलो नाही. पण आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा कालच भेटल्यासारखे भरभरून बोलतो. आम्हाला बोलायला कधीच विषय अपुरे पडत नाहीत. भेटलो की दोन वर्षांत एकमेकांच्या आयुष्यात काय घडून गेलं, वगैरे असं काही सांगणं गरजेचं नसतंच. मारायच्या असतात त्या आपल्या गाढ मित्रासोबत अनलिमिटेड गप्पा.”
काजोलच्या या गप्पा मारण्याच्या सवयीविषयी शाहरूख सांगतो, “बापरे, काजोल केवढी बोलते ते तुम्हाला ठाऊक नाहीये. एरवी मी लोकांना खूप बोलताना दिसतो. पण जेव्हा सेटवर असतो, तेव्हा मी तसा शांतच असतो. आणि काजोल अखंड बोलत, ओरडत असते. २३ वर्षांपूर्वीही ती तशीच होती आणि आजही तशीच आहे. कधी कधी मी तिला अधिकाराने दटावतो, ‘अगं, जरा चूप बस, थोडी शांत राहा.’ पण ती उलट मलाच बोलते. ‘अरे असं कसं, कोणाला तरी बोलायला हवं ना. कोण तरी ओरडलं पाहिजेच ना.’ ती अशीच आहे. आणि वर्षानुवर्ष ती अशीच राहील.”
काजोलचा नुकताच घडलेला एक किस्सा शाहरूख खान सांगतो, “आम्ही ‘दिलवाले’साठी लंडनला चाललो होतो. सगळेच खूप दमले होते. मी फ्लाइटमध्ये असलेला एक सिनेमा पाहिला आणि झोपलो. त्यानंतर लंडनला उतरल्यावर मी, काजोल, वरुण आणि क्रिती प्रत्येकासाठीच वेगवेगळ्या गाड्या होत्या. पण आम्ही जसं एअरपोर्टला उतरलो, तसं काजोलने हट्ट केला, ‘आपण सगळे एका कारने जातोय. मी आठ तास कोणाशीच बोलले नाही, मला चैन पडत नाहीये. चला, चुपचाप माझ्यासोबत एकाच कारमध्ये बसा’. तिचा हट्ट आम्ही पुरवला. त्यानंतर पुढचे दीड तास हॉटेल येईपर्यंत ती बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो.”
इतक्या वर्षांच्या जिव्हाळ्यामुळे शाहरूख खानचे आता काजोलच्या कुटुंबाशीही अगदी जवळचे संबंध आहेत. काजोलची आई तनुजा शाहरूखवर अगदी आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम करते. केवळ तनुजाच नाहीत तर काजोलचा नवरा अजय देवगणही शाहरूखच्या जवळ असल्याचं किंग खानच्या बोलण्यातून जाणवतं. शाहरूख सांगतो, “मला आठवतंय, काजोलचे वडील वारले होते, तेव्हा अजयने पहिला फोन मला केला होता. मी त्या वेळी एअरपोर्टच्या दिशेने जात होतो. अजय म्हणाला, ‘ती एकटी आहे रे आणि खूप रडतेय. तू लवकर पोहोच.’ मी तातडीने गाडी वळवली.” गेल्या २३ वर्षांत काजोल आता गौरीची आणि शाहरूखच्या मुलांचीही मैत्रीण झालीय. शाहरूख याविषयी सांगतो, “काजोलचा कधी कधी अचानक फोन येतो. तेव्हा मी कुठेतरी चित्रीकरणात व्यग्र असतो. ती विचारते, ‘कुठे आहेस? बिझी आहेस का? घरी कोण आहे? गौरी आहे? मुलं आहेत? बरं, चल मग मी घरी जाते.’ अशी आमची मैत्री आहे. ती घरी येतेय, म्हणून मी त्यासाठी घरी असायलाच हवे, अशी आवश्यकता मुळीच नाही. आमच्या मैत्रीत औपचारिकता नाही.”
काजोलला शाहरूख खानच्या मुलांशी असलेल्या मैत्रीबद्दल विचारल्यावर ती म्हणते, “माझं आणि आर्यनचं कमी बोलणं होतं. पण सुहानाशी माझी छान मैत्री आहे. आता अब्रामसोबत पण मस्त दोस्ती झाली. तो आमच्या ‘दिलवाले’च्या चित्रीकरणावेळी यायचा. आता आम्ही प्रमोशनसाठी फिरत होतो, तेव्हाही तो आला होता. तो पटकन लोकांमध्ये मिसळतो. शाहरूखची सगळीच मुलं मिळून मिसळून राहणारी आहेत. माझी मुलं मात्र थोडीशी लाजरी-बुजरी आहेत.”
२३ वर्षांत शाहरूख खानमध्ये काय बदल जाणवले, असं विचारल्यावर काजोल म्हणते, “२३ वर्षांत तो अधिकाधिक कामात गढून गेला. त्याने तर एका वर्षी पाच-पाच चित्रपटही केलेत. तो आजही ‘बाजीगर’मध्ये मेहनत करायचा तशीच मेहनत करत असतो. त्याचा कामाचा आवाका पाहून मी कधी कधी ‘आता काम थोडं कमी कर. काही वेळ शांत बसं.’ असाही सल्ला देते. पण तो सातत्याने काम करत असतो. मी त्याच्या अगदी विरुद्ध आहे. मला सतत काम करायला नाही आवडत. पण मित्राला पुढे जाताना पाहून छान वाटतं.”
शाहरूख खान काजोलविषयी सांगताना म्हणतो, “ती मनाने एकदम निर्मळ आहे. आणि जे मनात आहे, ते सरळ तोंडावर बोलणाऱ्यातली आहे. ग्लॅमर, स्टारडमच्या मागे धावणाऱ्यांमधली ती नाही. तिला जे आवडतं, तेच ती करते. आणि ते मनापासून करते. जे तिच्या कामातही प्रतिबिंबित होतं.”
अनुजा कर्णिक
karnikanuja@gmail.com
बातम्या आणखी आहेत...