चित्रपटातील ‘तुळसा’च्या भूमिकेसाठी वीणा जामकरला नुकताच ‘इफ्सा’ अर्थात ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिका’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या निमित्ताने हा संवाद.
तुझ्या आजवरच्या भूमिका या नेहमीच वेगळ्या धाटणीच्या वाटत आल्या आहेत; काहीशा आर्ट फिल्म्सच्या प्रकारात मोडणा-या. तुला व्यावसायिक सिनेमा करावासा नाही वाटला? की तू व्यावसायिक सिनेमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवतेस?
- नाही, असं अजिबात नाही. व्यावसायिक सिनेमांपासून दूर राहायचं असं मी कधी ठरवलं नव्हतं, आणि आताही तसा दृष्टिकोन नाही. मुळात कोणताच दिग्दर्शक वा निर्माता हा आर्ट किंवा व्यावसायिकतेच्या चौकटी पाहून स्वत:चा चित्रपट बनवत नसतो. काही चित्रपट हे थोडे वेगळ्या धाटणीचे असतात. ते प्रचलित व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत बसत नाहीत; म्हणून ते आपल्याला वेगळे वाटतात, इतकंच. खरं सांगायचं तर नेमका याच धर्तीवर ‘टपाल’ इतर चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो.
असं लक्षात येतं, की ब-याचदा तुझ्या भूमिका या मध्यवर्ती भूमिकाच असतात, असं नव्हे; पण तरी त्यात काही तरी विशेष असतं. ज्यामुळे या छोट्या रोलनंतरही तू प्रेक्षकांच्या लक्षात राहतेस. नेमकं काय पाहून तू भूमिका स्वीकारतेस? भूमिकेतलं नक्की तुला काय भावतं?
-आधी तर मी चित्रपटाची कथा ऐकते, मग त्या कथेत माझ्या भूमिकेचं स्थान काय आहे, तिचा कथेशी नेमका कसा संबंध आहे, हे मी पडताळून पाहते. भूमिका मध्यवर्ती आहे की साईड रोल, हा प्रश्नच मला निरर्थक वाटतो. ज्या भूमिकेमुळे माझ्यातल्या अभिनय कौशल्याचा कस लागणार असेल, काही तरी आव्हानात्मक करण्याचा अनुभव मिळणार असेल, अशा भूमिका मला स्वीकारायला आवडतात. कारण अशी आव्हानात्मक भूमिका वठवताना आकारास येणारी विकासाची प्रक्रिया मला अधिक महत्त्वपूर्ण वाटते.
‘टपाल’मध्ये तू ‘तुळसा’ नावाचं पात्र साकारलं आहेस. ही ‘तुळसा’ तुला का करावीशी वाटली? आज या ‘तुळसा’ने तुला दक्षिण आफ्रिकेतही मान मिळवून दिलाय.
-दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने जेव्हा मला ‘टपाल’ची गोष्ट पहिल्यांदा ऐकवली, तेव्हाच ही कथा आणि त्यातली तुळसाची भूमिका मला मनोमन खूप आवडली होती. याचं एक कारण हेही होतं की, या व्यक्तिरेखेला फारसे संवाद नव्हते. त्यामुळे तिची व्यथा पडद्यावर केवळ अभिनयातून साकारण्याचं मोठं आव्हान मला स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे ही भूमिका मी स्वीकारली.
''स्त्रीचं अस्तित्व निव्वळ तिच्या प्रजनन क्षमतेशी जोडलं जाण्याचं दु:ख मी या निमित्ताने अनुभवू शकले. आपल्या आजच्या अनुभवांचा परीघ ओलांडून अधिक व्यापक अर्थाने मला स्त्रीचं दु:ख समजून घेता आलं. ही संधी मला तुळसाने दिली.''
मग या आव्हानात्मक भूमिकेसाठी तू काय खास तयारी केलीस?
-प्रांजळपणे सांगायचं तर काहीच नाही. पण हो, तुळसाला समजून घेण्यासाठी मला लक्ष्मण आणि मंगेश हाडवळेची खूप मदत झाली. ही मूळ कथा मंगेशचीच आहे. तो या चित्रपटाचा क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. त्यामुळे त्याच्या मनातली तुळसा त्याने मला समजावून दिली आणि ती पडद्यावर कशी आणावी, हे लक्ष्मणने सांगितले. चित्रीकरणादरम्यान वारंवार या दोघांशी केलेल्या चर्चांतून मला तुळसा आपसूकच उलगडत गेली.
आतापर्यंत ‘टपाल’ने एकूण नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तर दोन राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आपला ठसा उमटवला आहे. यापैकी गोव्यातल्या 44व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या प्रदर्शनाच्या वेळी तू उपस्थित होतीस. प्रदर्शनाचा हा पहिलावहिला अनुभव कसा होता?
-खूप स्पेशल अनुभव होता तो. वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या भाषांचे प्रेक्षक तिथे चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट संपल्यावर काही मध्यम वयाच्या बायका हळूच माझ्याजवळ आल्या. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांनी काही क्षण फक्त माझा हात आपल्या हातात घेऊन माझ्याकडे डोळे भरून पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. खरं तर काहीच बोलायची गरज उरली नव्हती. त्या नुसत्या स्मित करून अव्यक्तपणे खूप काही सांगून निघून गेल्या.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू नेहमी सांगतात की, प्रत्येक भूमिका ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे नटाला समृद्ध करत असते. वीणाला ‘तुळसा’ने काय दिलं?
-अगदी खरं आहे हे. मलाही तुळसामुळे 70च्या काळातल्या खेड्यातल्या बाईची वेदना जगता आली. त्या काळातल्या स्त्रियांचं दु:ख मी तुळसामुळे समजू शकले. माझ्या मागच्या पिढ्यांशी समरस होऊ शकले. याचं श्रेय पूर्णपणे तुळसाला. स्त्रीचं अस्तित्व निव्वळ तिच्या प्रजनन क्षमतेशी जोडलं जाण्याचं दु:ख मी या निमित्ताने अनुभवू शकले. आपल्या आजच्या अनुभवांचा परीघ ओलांडून अधिक व्यापक अर्थाने मला स्त्रीचं दु:ख समजून घेता आलं. ही संधी मला तुळसाने दिली...
(mestryanu@gmail.com)