आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्मुख करणारा कथासंग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हां, क्युबिझम. त्यातून माणसाचे चेहरे किंवा एकूणच जे सारं तिरफाळलेलं दाखवतो ना... त्यातून तो हेच सांगतो की, वरकरणी सुस्थितीत दिसतंय ते आतून विस्कटलेलं आहे.’ मॉल्स, सीसीडी, पिझ्झा हट, बरिस्तासारख्या चक्रवाढ व्याजाने वाढत जाणार्‍या संस्कृती, त्या तेवढ्याच वेगाने आत्मसात करणार्‍या आपल्या देशातील लोकांची म्हणजे खरं तर आपलीच, तुमची-आमची नेमकी मानसिकता शोधणार्‍या प्रसिद्ध लेखक सतीश तांबे यांच्या अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मॉलमध्ये मंगोल’ या कथासंग्रहातील ‘बेडरूम तिथे पिकासो’ या कथेतील मिनीचे हे उद्गार! मुळातच लेखक सतीश तांबे यांनी या कथासंग्रहातून या विस्कटलेपणाचा शोध घेतलेला आहे. या संस्कृतीला केवळ नावे ठेवण्याचा तांबे यांचा हेतू नसून त्यामागचा कार्यकारणभावही त्यांनी स्पष्ट केलेला आहे.

‘तळघरातील बुरखेधार्‍याची गोष्ट’ या कथेमध्ये ‘मनाला पटेल तेच कर’, असे विलासला वडलांनी सांगून जणू काही त्याच्या हातात स्वच्छंदीपणाचे कोलीत दिले. ‘मुटकुळा’ कथेत अधू नवर्‍याशी लग्न झाल्यानंतर मुटकुळाकाकूंच्या शारीरिक संबंधांतील मनाची अतृप्तता दाखवण्यात आलेली आहे आणि ही शरीराची भूक शमवण्याकरता अवलंबलेले मार्ग क्षणिक सुख आणि प्रायश्चित्त यांशिवाय त्यांच्या पदरी काहीही देत नाहीत. आपल्या वर्तनाचे योग्य प्रायश्चित्त मुटकुळाकाकूंनी स्वीकारलेले आहे, शिवाय मुलीचे लग्न होण्याअगोदर या विषयावर त्या त्यांच्या मुलीशी मनमोकळेपणाने बोलल्याही आहेत. एकूणच, स्वच्छंदीपणा ही कथेतील पात्रांची मानसिकता नसून त्यांची अगतिकता या सर्वांना कारणीभूत ठरते आहे. आजच्या घडीला वाढत जाणारे घटस्फोट, मोडकळीला आलेली लग्नसंस्था, राजरोस ठेवण्यात येणारे विवाहबाह्य संबंध या सर्वांमागची मानसिकता लेखकाच्या पात्रांमधून प्रातिनिधिक स्वरूपात स्पष्ट होते. ‘तळघरातील बुरखाधार्‍याची गोष्ट’ या पहिल्या कथेतील ‘स्त्री-पुरुष संबंध ही नेमकी काय भानगड असते?’ या प्रश्नानेच सुरू झालेल्या सदर कथासंग्रहाचा साधारण विषय लगेच लक्षात आला तरी तो नेमकेपणाने मांडण्यात आलेला आहे. लैंगिकता आणि शरीरसंबंध रेखाटताना कोणतीही कथा अश्लीलतेला स्पर्श करत नाही. मनाच्या तळघरात दडून राहिलेला बुरखाधारी, लेखकाला वेताळाचाच अवतार वाटतो आहे आणि त्यालाच बेधडक प्रश्न विचारून कथासंग्रहाला सुरुवात होते.

लेखक सतीश तांबे यांच्या कथेतील कोणतेही पात्र हे एक्स्ट्रॉऑर्डिनरी असे नाही. ‘सवाई आनंद’ कथेतील अविनाश किंवा ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला’ या कथेतील जयंतराव यांच्या विचारांचा पाया पक्का आहे. ते त्यांच्या मतांशी ठाम असतानाही त्यांच्यातील दुखरी नस अलगद दाखवली गेलेली आहे. त्यामुळे ही पात्रे केवळ कल्पनात्मक अशी वाटत नाहीत. अशा विचारी पात्रांतर्फेच लैंगिकता हा विषय शरीरसुखाच्या सीमा ओलांडून नकळत लिंगनिरपेक्ष अशा मनाच्या समाधानापर्यंत घेऊन जातो.

प्रत्येकालाच भेडसावणारे प्रश्न, नात्यानात्यांतील गुंता, मनामध्ये निर्माण झालेली अढी, अहंगंड, न्यूनगंड यातून प्रश्न सोडवण्याऐवजी त्यापासून पलायन करण्याची वृत्ती अचूक हेरली गेलेली आहे. सुख, समाधान म्हणजे नेमके काय? आणि ते आपण भौतिक वस्तूंमध्ये किंवा शरीरसुखामध्ये शोधू लागतो. आज सर्वत्र पसरलेली ही मनोवृत्ती हा या कथासंग्रहाचा गाभा आहे. पण समाजातील या मानसिकतेवर केवळ बोट ठेवलेले नाही, तर तशी मानसिकता बदलण्यासाठी अंतर्दृष्टीही दिलेली आहे. आपल्या कौटुंबिक समस्येपासून पळालेली स्लीला हेदेखील ‘मॉलमध्ये मंगोल’ या कथेतील एक प्रातिनिधिक पात्र. एकटे राहत असताना वेळ जावा, मनामध्ये अनावश्यक प्रश्नांनी गर्दी करू नये, मनाची अस्वस्थता घालवण्याच्या हेतूने मॉलमध्ये वेळ काढणारी, शॉपिंगसाठी पळणारी स्लीला. तिथे तिची भेट विनयशी होते. केवळ मॉलमध्ये फिरायला येणार्‍या लोकांची मानसिकता समजून घेणारा हा विनय, स्वत: कोणत्याही प्रकारची खरेदी करत नाही. सडाफटिंग असणार्‍या विनयला अशा वस्तूंच्या संचयाची तशी गरज नाही. त्यांची मैत्री, त्यांच्यातील जवळीक वाढत असतानाच विनयला एके दिवशी मॉलमध्ये मंगोल मुलगा दिसतो. ‘जसा एअर इंडियाचा महाराजा असतो ना- नेमॉनिक; तसा मला हा मुलगा मॉल कल्चरचा नेमॉनिक वाटतो. इथे जे खरेदीसाठी लोक येतात ना, त्यांच्या नजरेत अशीच वेडसर झाक असते.’ विनयच्या या उद्गारानंतर कथेला एक वेगळेच वळण मिळते.

‘सवाई आनंद’मधील मराठीचा प्राध्यापक आणि लेखक असणार्‍या अविनाशला मूलबाळ नाही आणि विनापत्य असण्याविषयी कोणीही लिहीत नाहीत, अशी त्याची तक्रार आहे. अविनाश आणि त्याची बायको सुचेता यांनी हे सत्य स्वीकारलेले आहे. त्याबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही. तरीही गाडीमध्ये समोर बसलेल्या बापलेकीला पाहून त्याची होणारी मनोवस्था साध्यासोप्या शब्दांत रेखाटलेली आहे. लैंगिकतेप्रमाणे असूया ही सामाजिक भावना असल्याचे लेखक सांगतात आणि जिथे असूया तिथे तुलना असणारच. भावनांचा जन्म कसा होतो, याचा शोध अतिशय समर्पक उदाहरणातून मांडलेला आहे. लेखक सतीश तांबे यांच्या कथांमधील वेगवेगळे प्रसंग, त्यातील संवाद यातून सर्व कथा अधिकाधिक प्रवाही आणि प्रभावी झालेल्या आहेत. प्रसंगांच्या आणि संवादांच्या माध्यमातून कथा पुढे जात असल्याकारणाने कोठेही उपदेश अथवा टीका यांचा सूर लागत नाही. त्याशिवाय सार्‍या कथा म्हणजे वास्तविकतेच्या पायावर कल्पनेचा मुकुट घातल्याप्रमाणे दिसतात. कथेमध्ये केवळ प्रसंगवर्णने नाहीत; तर प्रत्येक पात्राच्या बारीकसारीक सवयी, लकबी अगदी सहज दाखवलेल्या आहेत. त्यामुळे अविनाश, जयंतराव, विनय, ‘बेडरूम तिथे पिकासो’ या कथेतील मिनी, ‘सवाई आनंद’ कथेतील मानसी ही सारी पात्रं आपल्यातील, आपल्याच आजूबाजूची असल्याचे जाणवते. या सार्‍या पात्रांना एक जिवंतपणा येतो आहे. एकूणच कथेचा आकार, त्याची व्याप्ती ही नवकथांच्याही पलीकडे नेणारी आहे.

‘फक्त शोधत जायचं असतं, मग आपोआप सापडते ना ती अमेरिका असते...आपापली अमेरिका’ हे जयंतरावांचे उद्गारच आपल्याला नकळत सुखाची गुरुकिल्ली देऊन जातात. हरवत चाललेला मनमोकळा संवाद, प्रत्येक मनातील घुमेपणा, आतल्याआत कुढण्याची वृत्ती आपल्याला आनंदापासून दूर ठेवते आहे. ‘जिथे आनंद नाही, तिथे सवाई आनंद कसा मिळवावा? मनातले आडपडदे गेल्याशिवाय आनंद मिळणं शक्य नाही. प्रश्न आहे, आडपडदे घालवायचे कसे?’ लेखक सतीश तांबे यांनी केवळ प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत, तर आपल्यासमोर असे प्रश्न मांडून विचार करण्यास प्रवृत्त केलेले आहे. म्हणूनच, मेंदूला खाद्य पुरवणारा, अंतर्मुख करणारा हा कथासंग्रह आहे.
पुस्तक - मॉलमध्ये मंगोल
लेखक - सतीश तांबे
प्रकाशक - अक्षर प्रकाशन
पृष्ठसंख्या - 208
मूल्य - 225 रु.