आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशात वाटा अनेकांचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेकॅनिकल इंजीनिअरिंग हे म्हटले तर पुरुषांचे क्षेत्र. परंतु अशा क्षेत्रात अनेक दशकं उत्तम काम करून आपला ठसा उमटवणाऱ्या लेखिकेच्या अनुभवांवर आधारित लेखमालेचा आजचा शेवटचा भाग.

माझ्या वयोगटातील बहुतेक जणांचा हा अनुभव असेल की, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही विशिष्ट करायचं असं खूप जास्त प्लॅनिंग केलं नव्हतं. शिक्षण झालं की, जी मिळेल ती नोकरी, अगदीच आपल्या आवडीच्या विरुध्द नसेल तर, स्वीकारली आपण. अन मग काम करता करता हे उमगत गेलं की, आपल्याला नक्की काय आवडतंय, नक्की कोणत्या क्षेत्रात आपण जास्त रमतोय. माझंही असंच झालं. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं हे नक्की होतं, पण नंतर कोणत्या उद्योगक्षेत्रामध्ये काम करायचं हे काहीही ठरवलेलं नव्हतं.
 
मिळाली ती नोकरी करत गेले आणि अत्यंत मनापासून काम करत गेले. नवी आव्हाने स्वीकारत राहायचं आणि जे काम करेन त्यामधे आपल्या बाजूने १०० % द्यायचं हे नक्की होतं आणि ते मी केलं. जसजशी नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारत गेले तसतशी शिकत गेले, चुकत गेले. घडत गेले. जेव्हा जेव्हा काही चुका झाल्या तेव्हा तेव्हा नाराज न होता त्यातून काय शिकता येईल, शिकले हे पाहात गेले आणि पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी झटले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात मी इतकी वर्षं काम केलं त्यामधे जितका वाटा माझा आणि माझ्या घरच्यांचा आहे तितकाच, किंबहुना त्याहून काकणभर जास्तच वाटा माझ्या सर्व पुरुष सहकारी आणि वरिष्ठांचा आहे.
 
हे मुद्दाम लिहिण्याचं कारण इतकंच की, काही अपवाद वगळता माझे काम पाहूनच माझी योग्यता ठरवणारे जास्त भेटले मला. केवळ मी स्त्री आहे म्हणून मला उजवं माप देणारे अगदीच विरळा होते. आणि याबद्दलचे माझे विचारही अगदी असेच होते. कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना तिथले इतर कर्मचारी तशी मी. त्या एका छताखाली एक स्त्री म्हणून मला काही वेगळी, विशेष वागणूक दिली जावी, अशी अपेक्षा मी कधीही केली नाही. याला अपवाद फक्त मी गरोदर होते तेव्हाच्या काही महिन्यांचाच होता. अनेक मुलंमुली माझ्यासोबत काम करता करता तयार झाली याचा आनंद आहे मला.

या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनेकांना मी तयार करू शकले हे समाधान पण आहेच. कोचीपासून जामनगरपर्यंत आणि बांगलादेशपासून अमेरिकेपर्यंत असलेल्या अनेक साइट्सवरचा आणि ऑफिसमधील कामाचा अनुभव मिळाला. अनेक बरेवाईट अनुभव आले. खूप सहकार्य करणारे सहकारी भेटले, तसंच केवळ मी स्त्री आहे म्हणून माझ्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारेही भेटले. पण काहीही झालं तरी मी माझं काम तसंच आणि तितक्याच उत्साहाने करत आले. आपल्या प्रत्येकामधे अशा अनेक क्षमता असतात की, ज्यांची जाणीव खडतर वाटेवर चाललो तरच होऊ शकते. कित्येकदा ही जाणीव आपल्यालाच अचंबित करून टाकणारी असते. कोणत्या प्रसंगाला आपण नक्की कसे सामोरे जाऊ, हे प्रत्यक्ष त्या प्रसंगाला सामोरं गेल्याशिवाय नाही समजू शकत.
 
जाताजाता एक छोटासा किस्सा सांगते. २४ वर्षांची होते तेव्हा एका मोठ्या कंपनीत कामाला लागले. तेव्हा काही कारणाने माझ्यावर जरा अवघड अशी एक जबाबदारी देण्यात आली. ज्या लोकांनी माझे सहकारी म्हणून काम करायला हवं त्यांनाच मी एक प्रकारे असिस्ट करावं, असं काहीसं काम होतं ते. मनातून खरंतर नाराजच झाले होते मी. तिथल्या एका वरिष्ठांना मी या संदर्भात भेटायला गेले आणि मला नक्की कशाचं वाईट वाटतंय, हे सांगितलं. तेव्हा त्यांनी मला समजावलं. म्हणाले, जे काम दिलं आहे ते सहकाऱ्यांना असिस्ट केल्यासारखं आहे हा विचार करू नकोस. तर असा विचार कर की, हे काम करताना तुला यात किती आणि कायकाय शिकायची संधी आहे. असाही विचार कर की, काम उत्तम झालं तर त्याचं संपूर्ण श्रेय तुझं एकटीचं असेल. दिलेली जबाबदारी एक नवीन आव्हान म्हणून स्वीकार. त्यातील खटकणारी बाजू न पाहाता त्यामधे सकारात्मक काय आहे ते बघायला शीक. त्या दिवशी मला हे काही फारसं पटलं होतं असं नाही, पण ते वरिष्ठ स्वत: किती कष्टातून वर आले आहेत हे माहीत होतं. म्हणूनच त्यांच्या विचारांवर पूर्ण श्रद्धा ठेवून मी माझं काम करत राहिले आणि अवघ्या तीन महिन्यांतच मला एका संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आली. हे मी करू शकले कारण माझ्या वरिष्ठांनी त्या कामाकडे सकारात्मकपणे पाहाण्याची दृष्टी मला दिली.
 
हे असे छोटेछोटे पण खूप मोलाचे काहीतरी मला शिकवणारे वरिष्ठ जसे मला भेटले तसेच क्लाएंटसमध्येही अशी अनेक वरिष्ठ मंडळी भेटली ज्यांच्याकडून खूप काही शिकता आले. आज हा समारोपाचा लेख लिहिताना या सगळ्यांची आठवण येणं साहजिकच आहे.
इतके अनुभव घेतले आणि घडत गेले त्यामधे खूप मोठं श्रेय जसं या सगळ्यांचं, तसंच हे सगळे लेख लिहीत गेले त्याचं श्रेय तुमच्यासारख्या मधुरिमाच्या वाचकांचं. अगदी पहिल्या लेखापासून आत्तापर्यंत खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या अन त्यातूनच पुढचे अनुभव लिहायची ऊर्जा मिळत गेली. या सदरापुरता तुम्हा वाचकांचा निरोप घेते.
पुन्हा नक्की भेटू. एका वेगळ्या सदरामध्ये. धन्यवाद.
 
 jayashree.anu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...