घरच्या परिस्थितीमुळे मी खूप लवकर, वयाच्या अठराव्या वर्षीच, नोकरी करायला लागले. मेकॅनिकल इंजीनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतरची पहिली नोकरी एका स्मॉल स्केल युनिटमध्ये होती. माझ्यासोबतच माझ्या दोन वर्गमैत्रिणींनाही इथेच नोकरी मिळाली होती. अॅल्युमिनियम फाउंड्री होती ती. त्यासाठी लागणाऱ्या पिट फर्नेस, काही लेथ मशीन, २ ड्रिलिंग मशीन हे आमचं आॅफिस. कामगार आणि एक सुपरवायझर धरून २०-२५ जण होतो. एकत्र काम करता येईल, म्हणून आम्ही मैत्रिणी खूश होतो. प्रत्यक्ष कास्टिंग करण्यापासून ते क्लायंटकडे पोहोचवण्यापर्यंत सगळी कामे करायचो आम्ही. त्याशिवाय नवीन क्लायंट मिळवणे, जुन्या क्लायंटकडून फीडबॅक घेऊन त्यांच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करणे, या जबाबदाऱ्याही सांभाळत असू.
एकदा साहेब बाहेरगावी असताना एका क्लायंटकडून फोन आला. Oil level indicatorsच्या ३०० assemblies तातडीने हव्या होत्या त्यांना. कास्टिंग तयार होती पण जोडणीला लागणारे सुटे भाग जेमतेम शंभरच होते. संपर्काची साधनं मर्यादित असल्याने साहेबांशी संपर्क होणं कठीण होतं अन् मुळात तितका वेळ नव्हता. मग काय? सुपरवायझरला कास्टिंग्जच्या फिनिशिंगची आणि इतर काही कामे सांगून त्यांचीच लँब्रेटा स्कूटर घेऊन आम्ही दोघींनी थेट बोहरी आळी गाठली. आमच्या नेहमीच्या पुरवठादाराकडून सर्व सुटे भाग घेऊन पायाशी ठेवले अन् परत भोसरीत युनिटवर पोहोचलो. संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या मदतीने ३०० assemblies inspection करून पॅक केल्या आणि पाठवून दिल्या. टीमवर्कचा हा असा पहिला अनुभव. १९८२-८३चा काळ आणि
आपली सामाजिक परिस्थिती पाहता आम्ही मुली त्यांच्या वरिष्ठ म्हणून स्वीकारायला ज्या कामगारांना जरासं कठीण गेलं होतं, तेच कामगार या प्रसंगानंतर आमच्याशी खूप आदराने बोलायला लागले. आपला निर्धार ठाम असेल तर जेंडरमुळे फारसा फरक पडत नाही, याची पहिली जाणीव झाली ती त्याच वेळी. त्यानंतरची नोकरी heavy engineering field मधली. साइटवर कधी जायचं झालंच तर कोणी ना कोणी सोबत असे. पाच वर्षं तिथे काम करून मी एका प्रथितयश कंपनीत लागले. तिथले माझे वरिष्ठ अतिशय चांगले होते व्यक्ती म्हणून. माझी एक व्यावसाियक म्हणून खरी वाढ तिथेच झाली.
तेव्हा त्या इतक्या मोठ्या कंपनीमध्ये इंजीनिअर आम्ही तिघीच होतो. त्यातही मेकॅनिकल इंजीनिअर मी एकटीच. काही परवानग्यांसाठी नेहमीच मुंबईला जावे लागे. पण एक मुलगी म्हणून मला पाठवलं जात नसे. प्रकल्प माझा अन् परवानगीसाठी इतरांनी जायचं, हे परावलंबित्व आवडायचं नाही मला. शिवाय काळजीपोटी का होईना, पण मी मुलगी आहे म्हणून केवळ हे केलं जायचं, याचाही राग यायचा कधीकधी.
एकदा मात्र माझ्या प्रकल्पाशी संबंधित काम होतं तेव्हा धीर करून मी सरांना म्हटलं, ‘सर मी जाऊ का? प्रत्येक वेळी असं दुसऱ्यावर अवलंबून राहणं नको वाटतं हो मला.’ सरांचा होकार होता. पण प्रश्न होता आमच्या विभागीय प्रमुखांचा. त्यांच्याशी बोलून त्यांची परवानगी घेणं आवश्यक होतं. सर म्हणाले, ‘तुम्ही नका काळजी करू. मी बोलतो साहेबांशी.’ सरांनी त्यांना समजावलं, ‘आज ना उद्या मॅडमना असं एकटं जावंच लागेल. मग आजच का नको त्याची सुरुवात? मी घेतो जबाबदारी.’
हो ना करता करता शेवटी तयार झाले आमचे विभागीय प्रमुख.
त्यांनी मला विचारलं, ‘क्यों? आप अकेले जा पाओगे? बाकी अब तुम्हारे सर बोल रहे हैं, तो मैं ना नहीं कहूँगा. बस अपना खयाल रखना. ठीक ठीक जाके आना.’
मी खूश. साहेबांची परवानगी मिळाली. अजून काय हवं?
मग सरांच्या सूचना सुरू झाल्या. १९८९-९०ची गोष्ट आहे ही. सेलफोन नव्हते. संपर्काचं साधन म्हणजे पब्लिक फोन. मी एकटी कधीच ऑफिसच्या कामासाठी गेले नव्हते. अन् मुंबई मला अगदी नवीन. ट्रेनचा प्रवास माहीत नाही. बहुधा कंपनीच्या गाडीने नाहीतर एसटीने अन् तेही कुणाच्या तरी सोबत जायचे मी. मुंबईत आधी आमच्या फोर्टमधल्या आॅफिसात जायचं होतं अन् मग तिथून ताडदेव सर्कलला.
सरांनी मला काय काय सांगितलं असेल?
कोणत्या ट्रेनने जायचं, कुठे उतरायचं, टॅक्सी केली की कोणत्या एरियामध्ये आहोत हे कसं ओळखायचं, साधारण टॅक्सीचे किती होतील, किती वेळात मी कुठे पोहोचेन, असं बरंच काही. माझ्यावर ताण आला होता, हे नक्की; पण नवीन आव्हानं स्वीकारत जायचे बाबांनी केलेले संस्कार होते सोबत. त्यामुळे खूप सकारात्मक विचार होते मनात. सरांनी दाखवलेला विश्वास खरा ठरवून मी ते काम संपवून आले. आयुष्यात पहिल्यांदाच आॅफिसच्या कामाला अशी अगदी एकटीने जाऊन माझी जबाबदारी मी पार पाडली. तिथून मागे वळून पाहिलंच नाही कधी.
मुलगी म्हणून कुठेही मी कमी नाही, याची जाणीव ठेवायला लावणारी आईची शिकवण, माझा आत्मविश्वास आणि ठाम निर्धार, अन् जोडीला ही अशी संधी देणारी, विश्वास टाकणारी माणसं भेटणं हे भाग्यच.
मुंबईहून परत आल्यावर सरांचे खूप मनापासून आभार मानले मी. त्यानंतर कितीतरी वेळा देशविदेशात एकटीने प्रवास केला. भारतातच नव्हे तर अमेरिका, इजिप्त, बांग्लादेश, थायलंड अशा देशांमध्येही कधी साइटवरच्या कामाला तर कधी काही बैठकांसाठी गेले. प्रत्यक्ष तिथल्या कामगारांसोबत साइटवरची कामंही केली. पण त्या पहिल्या भेटीच्या वेळी सरांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा हे माझ्या एकूणच व्यावसायिक आयुष्यासाठी एक मौल्यवान असं वरदान होतं, ही जाणीव नंतरच्या प्रत्येक भेटीच्या वेळी होती मनात.
अनुराधा रवींद्र, पुणे