आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादाची समस्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टीव्ह आमच्या डिपार्टमेंटमधील व्यवस्थापनापुरता बॉस होता. प्रोजेक्ट कोणाकडे द्यायचा हे ठरवणं, त्यातील तांत्रिक शंका दूर करणं इतकाच त्याचा सहभाग असे. एकदा मला जे काम दिलं होतं त्यातील शंका त्याला विचारायला गेले तेव्हा मला म्हणाला की, तू हे माइकला विचार. तो यातला एक्स्पर्ट आहे. मी नाही. ही आणि अशी स्पष्टता असणं हा आपल्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीमधे मला जाणवलेला मोठा फरक.

“आणि आज कॅरीचा लास्ट डे आहे. आपण आज त्याला शुभेच्छा देतोय,” साप्ताहिक कॉन्फरन्समधे टॉमने सांगितलं. कॅरी गेले ५ महिने भारतातील ऑफिससोबत तिकडून चेकिंगचे काम करत होता. पण तो काँट्रॅक्टवर होता. टॉमचं ऐकून आम्ही सगळे अवाक. पण  कॅरी  इतका शांत  होता. अगदी नॉर्मल. आम्हाला हे नवीन होतं. आमच्यासाठी एखादा सहकारी ऑफिस सोडून जाणं ही इतक्या नॉर्मली घ्यायची गोष्ट नव्हती. असे बरेच फरक तिथल्या आणि इथल्या कार्यपद्धतीमधे आणि एकंदरच ऑफिसमधल्या ह्यूमन रिलेशनशिपमध्येही नेहमीच जाणवले मला.
 
माझा बॉस स्टीव्ह. वय वर्षं ५९. त्याचं ऑफिस पाहाण्यासारखं असे. आम्हाला ॲनॅलिसिस करताना लागणारे रेफरन्स कोड, अनेक पुस्तकं हे सगळं दोन कॅबिनेटमध्ये. त्यातलं एक त्याच्या टेबलच्या मागे. आणि तो ज्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असे त्याच्या पेपर्सचे गठ्ठे जमिनीवर मांडून ठेवलेले. त्या कॅबिनेटमधून कोणतही पुस्तक घ्यायचं झालं तर हे सगळं ओलांडून जावं लागे. पहिल्या दिवशी मला म्हणाला, “अनू, तुला हवे ते रेफरन्स मी नसतानाही येऊन घेतलेस तरी चालेल. फक्त हे अडथळे पार करावे लागतील. तुझे तुला.”
आणि खो खो हसला.
अनेक कोड्स आणि फॉर्म्युले पाठ होते स्टीव्हला.
 
आम्ही सात जण त्याला रिपोर्ट करत असलो तरीही आमच्या कामाची पूर्ण जबाबदारी आमची असे. शंका असतील तर त्याला विचारत असू आम्ही, पण त्याबद्दल इतर डिपार्टमेंटला किंवा क्लाएंटला काही लागलं तर ते सोडवणं ही आमची जबाबदारी असे. स्टीव्ह आमचा बॉस होता ते मुख्यतः डिपार्टमेंटमधील व्यवस्थापनापुरता. कोणता प्रोजेक्ट कोणाकडे द्यायचा हे ठरवणं आणि त्यातील तांत्रिक शंका दूर करणं इतकाच त्याचा सहभाग असे. एकदा मला जे काम दिलं होतं त्यातील शंका त्याला विचारायला गेले तेव्हा मला म्हणाला की, “तू हे माइकला विचार. तो यातला एक्स्पर्ट आहे. मी नाही.”
 
ही आणि अशी स्पष्टता असणं हा आपल्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीमधे मला जाणवलेला मोठा फरक. भारतात बॉस म्हणजे तांत्रिक बाबी आणि व्यवस्थापन हे दोन्ही तितक्याच चांगल्या प्रकारे सांभाळणारा सर्वेसर्वा असावा ही अपेक्षा असते. तसं निदान आमच्या अमेरिकेतील ऑफिसमधे तरी नव्हतं.
अजून एक जाणवलेली गोष्ट ही की, कोणत्याही मीटिंगमधे कधीही आवाज चढवलेला ऐकला नाही मी. चिडून बोलणं, आवाजाची पट्टी वाढवणं याऐवजी शांतपणे आपला मुद्दा समजावून देणं अधिक पाहायला मिळायचं. मीटिंगमध्ये एका वेळी एक जणच बोलत असे, त्यामुळे त्याचा मुद्दा सगळ्यांना नीट समजत असे. यामुळे एक तर एकमेकांच्या मताबद्दल आदर दिसत असे आणि निर्णयप्रक्रिया नक्कीच सोपी होत असे. या आणि अशा अनेक गोष्टी मला बरंच काही शिकवून गेल्या.
 
एकदा मी करत असलेल्या कामामध्ये मिळणारा रिझल्ट बघून मला हे कळत होतं की, काहीतरी चुकतंय. पण काय ते समजत नव्हतं. ५-६ फॅक्टर्स बदलून मी परत परत ॲनॅलिसिस करून रिझल्ट तपासले पण काही उमजेना. मग मी ते आउटपुट स्टीव्हला पाठवलं. मला जमत नाहीये याचं मलाच इतकं वाईट वाटत होतं. खरं तर अगदी याच प्रकारचं ॲनॅलिसिस आधी चार प्रोजेक्टमधे केलं होतं मी. त्याला भेटले आणि ४-५ वेळा सॉरी म्हणाले. यावर एक तर त्याने कोणत्या फॅक्टरमधे गडबड आहे हे सांगितलं आणि वर म्हणाला, “अनू, मी गेली ४० वर्षं हे करतो आहे तरीही आजही कधीतरी माझंही चुकतं. सॉरी नको म्हणूस.”
हे मला अनपेक्षित होतं.
 
तांत्रिक बाबींसोबतच हे असं बरंच काही शिकून आणि आमच्या भारतातील ऑफिसबद्दल अमेरिकेतील मुख्यालयाला विश्वास देऊन मी इकडे रुजू झालेे.
अंतर्गत कामे त्या ऑफिसकडून आमच्या ऑफिसला देताना ज्या अनेक अडचणी येत त्यामधे सर्वात मोठी अडचण कम्युनिकेशनची आहे हे मला माझ्या तिथल्या वास्तव्यात प्रकर्षाने जाणवलं. एक म्हणजे कल्चरमधला व ॲप्रोचमधला फरक.
 
संवाद फक्त ईमेलमधून. त्यामुळे एकत्र काम करताना सहवासाने समोरच्या माणसाची कार्यपद्धती आपण जितकी सहज समजून घेऊ शकू तितकी अर्थातच घेता येत नसे. येणाऱ्या मेलमधून आपल्या अंतर्गत क्लाएंटची नक्की काय अपेक्षा आहे हे समजत नसे. त्यात इकडून मेल पाठवणारे सगळेच मेल कम्युनिकेशनमध्ये तरबेज नव्हते. आणि मुळात आपण शिकतो ते राणीचं म्हणजे ब्रिटिश इंग्लिश. अमेरिकन इंग्लिशपेक्षा अंमळ वेगळं.
आणि समजा एखाद्याचं असेलही इंग्लिश चांगलं, तरीही ड्रॉइंगमधल्या शंका प्रत्येक वेळी शब्दांत सांगता येतातच, असंही नाही. मी तिकडे होते तोवर इकडच्या सहकाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन तिकडच्या सहकाऱ्यांना स्केच काढून प्रत्यक्ष समजावून द्यायचे. पण इकडे परत आल्यावर हे कसं करायचं?
 
मग यासाठी मी एक पर्याय काढला. जी काही शंका आहे ती स्केच स्वरूपातच विचारायची आणि त्यासोबतच आम्हाला त्यावरची जी उत्तरे सुचताहेत ती पण स्केच स्वरूपातच पाठवायची. हे केल्याने आमचा प्रश्न नक्की काय आहे ते आमच्या तिकडच्या सहकाऱ्यांना सहज कळायला लागलं. शिवाय आम्ही सोल्यूशन्स पण पाठवत असू. त्यामुळे त्यांचं काम सोप्पं झालं. हे अजून सोप्पं करण्यासाठी मग साप्ताहिक व्हिडियो कॉन्फरन्स सुरू केली, ज्यामधे हे प्रश्न आणि त्यावरची सोल्यूशन्स यांची चर्चा होऊ लागली.
 
माझे इकडचे सहकारी त्यातून शिकत गेले. शिवाय मेल कम्युनिकेशन करणारा चेहरा समोर दिसू लागला. कामाव्यतिरिक्तही काही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. मी आणि जिम हा तिकडचा माझा काउंटरपार्ट सहसा या व्हिडियो कॉन्फरन्सची सुरुवात थोडी अनौपचारिक करत असू. उदाहरणच द्यायचं तर इथे आमच्या ऑफिसमधे राजेश, शैलेश, उमेश, दीपेश या नावाचे सहकारी होते. त्यावरून जिमने एक साप्ताहिक कॉन्फरन्स सुरू होताना विचारलं की, तिकडे ही अशी नावे जास्त का आहेत? मग उमेशने त्याला याची फोड करून ईश म्हणजे ईश्वर, गॉड असं समजावलं.
या अशा अनौपचारिकतेमुळे दोन्ही ऑफिसेसचं बाँडिंग अगदी छान झालं. आणि त्यामुळे अर्थातच कामेही चांगली होऊ लागली.
 
 jayashree.anu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...